गुन्ह्याचे सबळ पुरावे असतानाही दमानियांना अटक का नाही?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |

पोलिस दबावात असल्याचा नाथ फाउंडेशनचा आरोप

 
जळगाव : माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अंजली दमानिया आणि गजानन मालपुरे यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. यात सबळ पुरावे उपलब्ध असल्याने संशयित आरोपींना त्वरित अटक करावी, अशी मागणी बुधवारी नाथ फाउंडेशनतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली.
 
 
या गुन्ह्यात साडेनऊ कोटी व दहा कोटी रुपये मूल्याच्या बनावट चेकबाबत उल्लेख आहे. हा चेक वटविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आ. खडसे यांनी २०१७ मध्ये दिलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी तपास करून हे चेक, डी.डी. व दस्तऐवज बनावट असल्याचा निष्कर्ष नोंदवून तसे पत्र आ. खडसे यांना दिले आहे.
 
 
या गुन्ह्यासाठी पाच वर्षांपेक्षा जास्त ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे. या प्रकरणात सबळ पुरावा उपलब्ध असल्याने संशयितांच्या अटकेसाठी १४ जूनला पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. परंतु पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. दमानिया यांनी बुधवारी जळगावमध्ये पत्रपरिषद घेतली. संशयित आरोपी पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याने त्यांना तातडीने अटक करावी. या गुन्ह्यातील संशयित आरोपी अविनाश पाटील फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. पोलिसांच्या दिरंगाईमुळे संशयित आरोपी फरार होत असतील, पुरावे नष्ट करण्यास त्यांना मदत होणार असेल तर पोलीस प्रशासन त्यांना मदत तर करीत नाही नां? असा प्रश्‍नही निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत आ. खडसे यांना बदनाम करण्यामागे एका मंत्र्याचा हात असल्याचे म्हटले आहे. या मंत्र्याच्या दबावात येऊन पोलीस प्रशासन संशयित आरोपींना पाठीशी घालत नाही नां? अशीही शंका उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
अटक करा, अन्यथा उपोषण
गुन्ह्यातील सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अन्यथा नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी सोमवारपासून आमरण उपोषण करतील. या दरम्यान, काही बरे-वाईट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांवर राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@