पंचवीस लाखांचा ‘पंतप्रधान पुरस्कार’ नाशिकच्या मंडलिक यांना जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

पद्माकर देशपांडे

 

नाशिक : “प्राथमिक स्तरावर सक्तीचे योगशिक्षण दिल्यास सर्वांगीण उन्नती शक्य होईल, समाजात आरोग्य, सदाचार, विधायक बाबी वाढून सात्विक समाजाची निर्मिती होईल,” असे प्रतिपादन गेल्या पन्नास वर्षांपासून योग शिक्षणाचे कार्य करीत असलेले ऋषी धर्मज्योती तथा गुरुवर्य विश्वासराव वसंत मंडलिक यांनी केले.

 

नवी दिल्ली येथून २५ लाख रुपयांच्या मानाच्या पंतप्रधान पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर त्यांची खास मुलाखतमुंबई तरुण भारतने घेतली, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयामार्फत २०१८ च्या पुरस्कारासाठी मंडलिक यांची निवड झाली आहे. ‘आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येस ही घोषणा झाली. योगाचे लाभ मिळण्यासाठी वाट पाहावी लागेल. लगेच त्याचे परिणाम दिसून येणार नाहीत. अष्टांग योग म्हणजे ध्यानधारणा, आहार, प्रत्याहार अशा आठ बाबी असून त्यांचे पालन केल्यास आरोग्यमनःशांती, कामावर लक्ष केंद्रित होणे अशा अनेक बाबी साध्य होऊ शकतील. यमनियमांचे पालन जितक्या प्रमाणात कराल तितक्या प्रमाणात फळ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

जागतिक स्तरावर आता योग दिन साजरा होत आहे, याचा आनंद आहे. आता देशातील योगसंस्थांची असोसिएशन तयार करण्यात आली आहे. योगगुरू स्वामी रामदेव, श्री श्री रवीशंकर तसेच अनेक महान व्यक्तींनी या क्षेत्रात मोठे कार्य केले असून त्याचा लाभ निश्चित होणार आहे. आम्ही राज्यातील सर्व प्रमुख शहरांत योगाचा प्रसार केला आहे. मात्र लहान गावे आणि खेडी यातदेखील योगाचे कार्य पोहोचविण्याची गरज असून त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. पुण्यात योगाचा परिचय झाल्यावर त्यांनी तेथील योग विद्या धाममध्ये योग शिकत असतानाच योग प्रसारकार्य सुरू केले. त्यानंतर नाशिकला आल्यावर त्यांनीयोग विद्या धामयाच नावाची संस्था सुरू करून व्यापक कार्य सुरू केले. ज्या काळात योगगुरू बाबा रामदेव यांचे नावदेखील कोणाला माहिती नव्हते, त्या काळात त्यांनी देशात आणि परदेशात योग पोहोचविला.

 

आजमितीस केवळ राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळूनयोग दिनाच्या निमित्ताने सुमारे ४० हजारांवर आबालवृद्ध योग साधना करतात तर सिंगापूर,थायलंड, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान अशा अनेक ठिकाणी योग गुरुकुलच्या माध्यमातून तयार झालेले योग शिक्षक योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत आहेत. त्र्यंबकेश्वर येथे २५ एकर जागेत त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रात दर महिन्याला विविध देशांतील ३०-४० विदेशी प्रतिनिधी येतात आणि योग शिक्षणाची माहिती घेऊन आपल्या देशात योग शिकविण्याचे कार्य करतात. असे ११५ देशांतील १५ हजार योगशिक्षक त्यांनी घडविले आहेत, तर नाशिकरोड येथे योग निसर्गोपचार केंद्र उभारले असून तेथे शेकडो रुग्णांवर मधुमेह, दमा, रक्तदाब, सायटिका अशा अनेक रोगांवर औषधाविना उपचार केले जातात. अशा ३३ हजारांहून अधिक रुग्णांवर आतापर्यंत यशस्वी उपचार केल्याची माहिती त्यांनी दिली.

 

योगात पदवी शिक्षण

 

नागपूरच्या महाकवी कालिदास विद्यापीठातर्फे योग पदवी आणि पदव्युत्तर वर्ग योग गुरुकुलमार्फत चालविले जातात. त्यातदेखील अनेकांनी भाग घेऊन बीए, एमए या पदव्या संपादन केल्या आहेत.

 

योगक्षेत्रात अतुलनीय कार्य

 

नाशिकमध्ये योग विद्याधाम तसेच देशात आणि परदेशात कार्यरत असलेल्या योग गुरुकुलचे संस्थापक विश्वासराव मंडलिक तथा ऋषी धर्मज्योती यांचे या क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे. १९४४ मध्ये नाशिक येथेच जन्म झालेल्या मंडलिक यांनी आपले शिक्षण पुणे येथून १९६७ मध्ये पूर्ण केले. इलेक्ट्रिकल इंजिनियरची पदवी संपादन केलेल्या मंडलिक यांचा ओढा प्रथमपासून योगाकडे होता. १२ वर्षे अभियंता म्हणून काम केल्यानंतर त्यांनी १९७८ मध्ये योग विद्या गुरुकुल (तेव्हाचे नाव योगविद्या धाम ) ची स्थापना केली. नाशिकमध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा विस्तार त्यांनी पुढे औरंगाबाद, पुणे येथे केला. सकाळी आणि संध्याकाळी योगाचे वर्ग घेणे, असे त्याचे स्वरूप होते. १९९५ मध्ये त्यांनी पूर्णपणेयोग मिशनला वाहून घेतले. आजमितीस योग विद्या गुरुकुल हे भारतातील एक सर्वात मोठे योग शिक्षणाचे केंद्र बनले आहे. आतापर्यंत त्यांनी योग शिक्षणासाठी १८ पुस्तके लिहिली असून त्यांच्या ५० पेक्षा जास्त ध्वनिफितीदेखील प्रसृत झालेल्या आहेत. महिला, मुले, समाजातील विविध घटक यांना योग कसा उपयुक्त ठरू शकेल, हे त्यांनी त्यात सांगितले आहे. गेल्या ४० वर्षांपासून योग शिक्षणपरयोग सुगंधहे मासिकदेखील ते चालवित आहेत. योगाचा उपचारपद्धती म्हणून उपयोग यावर देखील त्यांनी कार्य केले आहे. हजारो योगसाधक आणि शिक्षक यांची निर्मिती त्यांनी केली असून त्यांच्या या कार्याबद्दल गेल्या ५० वर्षांत अनेक पारितोषिके प्राप्त झालेली आहेत. पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिलेला जीवन गौरव पुरस्कार, नाशिकच्या कैलास मठाने दिलेला सरस्वती सन्मान याबरोबरच जगातील योगाचे पहिले विद्यापीठ असलेल्या बिहार योग भरतीच्या परमहंस निरंजनानंद सरस्वती यांनी त्यांना योगाचार्य म्हणून गौरविले. तसेच त्यांना बोलावून ऋषि संन्यास दीक्षा देऊनऋषी धर्मज्योतीअशी उपाधी त्यांना दिले. ऋषि संन्यास दीक्षा गृहस्थधर्म पाळून कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिली जाते. मंडलिक यांच्या पत्नी पौर्णिमा मंडलिक आणि मुलगा गांधार हेदेखील योग गुरुकुलच्या कार्यात सक्रिय सहभागी असून त्यांचे सर्व कुटुंब योग प्रसारकार्यात अग्रेसर असते.

@@AUTHORINFO_V1@@