पेणच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

भोगावती नदीच्या पुरात 2 मुले वाहून गेली


पेण: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पेण तालुक्यात दुपारपासून गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेतकरीवर्ग सुखावला असून पेरलेल्या भाताला जीवदान मिळाले असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले असले तरी पेण कोळीवाड्यात दुःखाचे सावट पसरले असून पेण कोळीवाड्यातील दोन-चार मुले मच्छीमारीसाठी गेली असता भोगावती नदीपात्रातले पाणी अचानक वाढल्याने दोन मुले वाहून गेल्याने पेण नगरपालिकेचे अग्निशामक पथक, पेण पोलिसांचे जीवरक्षक पथक, कोळीवाड्यातील कोळी बांधव वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेत असून पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे. पेणच्या लांड्या पुलावरून पाच फूट पाणी वेगाने वाहत असून अंतोरा खाडीपर्यंत कोळीबांधवांचे शोधकार्य जोमाने सुरू आहे. पेण पूर्व भागातील धरणाचे पाणी सोडल्याची किंवा ढगफुटी झाल्याची चर्चा असून अचानक एवढा पाण्याचा प्रवाह वाढल्याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतो.

 

पावसाने गेल्या आठवड्यात हजेरी लावत नागरिकांचा उकाडा दूर केला. तसेच शेतकऱ्यांच्या पेरणीचे कामेही संपली. अधूनमधून पेणमध्ये तुरळक पाऊस पडत होता, मात्र अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग चिंतेत होता. शिवाय हवामान खातेही आठवडाभर पाऊस पडणार नसल्याचा अंदाज वर्तवित असल्याने दुबार पेरणीचे संकट येऊ नये, याकरिता शेतकऱ्यांमध्ये धाकधूक होती. मात्र दुपारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच समुद्रकिनारी व खाडीलगतच्या गावांना तसेच दरडीपासून धोका असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून पेण तहसील कार्यालयाचा आपत्कालीन विभाग सज्ज झाला आहे. याशिवाय ग्रामस्थांनी खाडीकिनार्यावर न जाण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

@@AUTHORINFO_V1@@