खरवडा टाळूवरचे लोणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

रोहितचे आत्महत्या प्रकरण जोपर्यंत धुमसत होते, त्याच्या चितेतल्या निखाऱ्यावर जोपर्यंत लीगचे राजकारण तापत होते, तोपर्यंत लीगने रोहितच्या आईचा गैरफायदा घेत आपल्या राजकारणाची खिचडी शिजवली.

 

कोणाचाही मृत्यू हा क्लेशकारक, मागे राहिलेल्यांना दुःख आणि अश्रू देणाराच असतो अन् तोच मृत्यू विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या आपल्या पोटच्या पोराचा असेल तर?... तर त्या आईच्या दुःखाची परिसीमाच राहत नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूचे दुःख पचवतच तिला आलेले दिवस कसेबसे ढकलावे लागतात. तिला त्या दुःखाची काळी छाया सोबत घेऊनच पुन्हा उभे राहावे लागते, जीवन जगावे लागते. पण, अशा तरुण मुलाच्या मृत्यूचे स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करणारी माणुसकीशून्य गिधाडे इथल्या राजकारणात नेहमीच घिरट्या घालताना दिसतात. रोहित वेमुला, हा देखील असाच हैदराबाद विद्यापीठात शिकणारा तरुण. नैराश्य आल्याने आत्महत्या केलेला आणि त्याच्या मृत्यूचे सोहळे साजरे करणाऱ्यांच्या राजकारणाला बळी पडलेली त्याची अभागी आई म्हणजे राधिका वेमुला. रोहितच्या आत्महत्येनंतर त्याचे भांडवल करून आपल्या मतलबी राजकारणाच्या पोळ्या भाजण्यासाठी इथल्या गिधाडांत स्पर्धाच लागली. गल्ली ते दिल्लीतल्या नेतेमंडळींनी रोहितच्या आईची भेट घेत त्यांना आधार देण्याचे नाटक चांगलेच रंगवले. पण, आता रोहित वेमुलाच्या आईनेच या नौटंकीबाजांच्या मुखवट्यामागचा भेसूर चेहरा उघडा पाडला आहे.

 

रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतरआम्हीच तुमचे दुःख जाणून घेऊ शकतो,’ अशी सहानुभूती दाखवत राजकारणातले शेकडो डोमकावळे तुटून पडले. मृताच्या टाळूवरचे लोणी खरवडण्यासाठी टपलेल्या याच जमातीतले एक नाव म्हणजे इंडियन युनियन मुस्लीम लीग. रोहितच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला भाड्याचे घर सोडून हक्काचे घर देण्याचे स्वप्न मुस्लीम लीगने दाखवले. त्यासाठी 20 लाख रुपये देण्याचे लीगने कबूलही केले. रोहितचे आत्महत्या प्रकरण जोपर्यंत धुमसत होते, त्याच्या चितेतल्या निखाऱ्यावर जोपर्यंत लीगचे राजकारण तापत होते, तोपर्यंत लीगने रोहितच्या आईचा गैरफायदा घेत आपल्या राजकारणाची खिचडी शिजवली. पण, आता रोहितच्या आईनेच घरासाठी 20 लाख रुपये देण्याच्या मुस्लीम लीगच्या दाव्यातला खोटारडेपणा जगासमोर आणत मुस्लीम लीगचा बुरखा फाडला आहे.

 

मुस्लीम लीगने रोहितच्या मृत्यूनंतरतुम्ही आता एकट्या नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत,” अशी साखरपेरणी करत हक्काचे घर देण्याचे आश्वासन दिले. केरळात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत नेऊन 40 हजार लोकांसमोर लीगने 20 लाख रुपये देण्याची जाहीर घोषणाही केली. पण, लीगने आजतागायत मला घरासाठी फुटक्या कवडीचीही मदत केली नाही. त्यांचे सांत्वनाचे-सहानुभूतीचे शब्द फक्त स्वतःच्या फायद्यासाठी-राजकारणासाठीच होते,” असा धडधडीत आरोप करत राधिका वेमुला यांनी लीगच्या आश्वासनांची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. रोहितच्या आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यूचे ताबूत नाचविणाऱ्यांचे खरे चेहरे नेमके कोणते होते, हेच राधिका वेमुलांच्या आरोपांवरून स्पष्ट होते. यातून एका आईला आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर कबूल केलेली रक्कम मिळत नाही, त्यासाठी माध्यमांसमोर येऊन टाहो फोडावा लागतो, हे मानवी मूल्ये पायदळी तुडवण्याचेच लक्षण म्हटले पाहिजे. म्हणूनच सगळी मूल्ये, नैतिकता, संवेदनशीलता पायदळी तुडवून स्वतःच्या फायद्यासाठी आत्महत्येचे राजकारण करणारी ही मंडळी मानवी मुखवटे पांघरलेली संधीसाधू जनावरेच असल्याचे यातून सिद्ध होते.

 

रोहितच्या आत्महत्येनंतर आम्हीच एकमेव संवेदनशील असल्याचे दाखवत देशभरातल्या पुरोगामी धेंडांनी, आंबेडकरवादी, मुस्लीम संघटनांनी, राजकीय पक्षांनी सर्वत्र धुमाकूळ घातला. रोहितने केलेली आत्महत्या केंद्रातल्या मोदी सरकार, तत्कालीन मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, भारतीय जनता पक्ष आणि रा. स्व. संघाच्या धोरणांमुळेच झाल्याचे आरोप करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. रोहित वेमुला हा अनुसूचित जाती-जमातीतला असल्याचे त्याच्या आत्महत्येमुळे भाजप संघाला अनुसूचित जाती-जमातविरोधी ठरविण्यासाठी या लोकांनी जंग जंग पछाडले. यातून फुले-शाहू-आंबेडकरांचा नामजप करत हे लोक माणुसकीलाच काळिमा फासत होते. कारण, रोहितच्या आत्महत्येचा, त्याच्या मृत्यूचा फायदा घेणारी, ही मंडळी माणुसकीच्या नात्याने वा दुःखावेगाने त्रासलेल्या मातेला आधार देण्यासाठी जमलेली नव्हतीच. यापैकी कोणाच्याही मनात रोहित वा त्याच्या आईप्रति कसलीही आत्मीयता वा आपलेपणा नव्हता, तर सहानुभूतीच्या देखाव्यातून भाजप संघाला लक्ष्य करण्याची संधी मिळणार, हा विचार करणारी घाणेरडी विकृती होती. याच विकृतीच्या भरणपोषणासाठी या लोकांनी रोहितला न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ठिकठिकाणी बैठका, मोर्चे आणि आंदोलनांचा सपाटा लावला. रोहितच्या आत्महत्येने मला, माझ्या पक्षाला, संघटनेला कसा आणि किती फायदा होईल, याची गोळाबेरीज करत जातीय मानसिकता घेऊन मिरवणारी सडक्या मेंदूची ही माणसे होती. रोहित आणि राधिका वेमुला हे कथित ब्राह्मणी अन्यायाचे बळी ठरल्याचे सांगत या मंडळींनी मनुवादाच्या नावाने गळे काढण्याची सोंगेदेखील केली. जेएनयुतीलभारत तेरे तुकडे होंगेच्या कांडानंतर ज्याप्रमाणे देशातल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या तथाकथित राखणदारांनी कन्हैय्या कुमार, उमर खालिद यांना एखाद्या खेळण्यासारखे सगळीकडे नाचवले, तसेच रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे ताबूतही याच नतद्रष्टांनी नाचवले. विशेष म्हणजे, अशा आत्महत्येचे राजकारण करणाऱ्या पाषाणहृदयी लोकांच्या कार्यक्रमांना राधिका वेमुला यांनीही हजेरी लावली. आता मात्र आपण इतक्या दिवस ज्या लोकांच्या मागे मोठ्या आशेने, विश्वासाने धावत पावले झिजवली, त्या लोकांची जातकुळी भामटेगिरी करणाऱ्यांचीच असल्याचे त्यांना उशिरा का होईना समजले, हे एकाअर्थी बरेच झाले.

 

दुसरीकडे रोहित वेमुलाची आत्महत्या ही जातीचा उल्लेख करता येण्याजोगीच घटना असल्याचे त्यावेळीही आणि आताही लक्षात येते. रोहित हा अनुसूचित जाती-जमातीतला विद्यार्थी असल्याने त्याचा विद्यापीठात छळ झाला आणि त्या अन्यायातून त्याने आत्महत्या केल्याची कोणतीही गोष्ट नव्हती. कारण, रोहितच्या आत्महत्येनंतर न्या. रुपनवाल चौकशी समितीने केलेल्या तपासात ही बाब समोर आली. रोहितने वैयक्तिक कारणाने, जगाला कंटाळून, निराश मानसिकतेने आत्महत्या केल्याचे या चौकशीतून निष्पन्न झाले. याच चौकशीत रोहित वेमुला अनुसूचित जाती-जमातीतला नव्हे, तर अन्य मागास वर्गातला होता, हेही स्पष्ट झाले. म्हणूनच रोहितच्या आत्महत्येनंतर ज्या ज्या लोकांनी त्याने विद्यापीठ प्रशासन, भाजप संघाच्या धोरणांमुळे आत्महत्या केल्याचे, तो अनुसूचित जाती-जमातीतला असल्याने आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे आरोप केले, ते स्वतःच्या स्वार्थासाठीच केल्याचे लक्षात येते. शिवाय या सगळ्या घडामोडींमध्ये मुस्लीम लीग, आंबेडकरवादी संघटना, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षांसह सर्वांनीच रोहित वेमुलाच्या आईच्या भावनांचा, मुलगा गेल्याच्या दुःखाचा सहानुभूतीचा देखावा रंगवत गैरवापरच करून घेतला. एका आईच्या भावभावनांचा या लोकांनी आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी खेळ मांडला आणि स्वतःचे क्षुद्र हेतू साध्य झाल्यानंतर कोण कुठला रोहित वेमुला अन् राधिका वेमुला? असा सवाल करत हात वर केले. एका आईच्या भावभावनांचे भांडवल करत तिच्या मुलाच्या आत्महत्येतून स्वहित साधणाऱ्या ही मंडळी म्हणजे बिनकाळजाचीच माणसे. कारण, यांना काळीज असते, तर असे घृणास्पद कृत्य करण्यासाठी त्यांचे मन धजावलेच नसते. आता राधिका वेमुला यांनीच या लोकांचे खरे रुप चव्हाट्यावर आणल्याने या लोकांचा बाजार लवकरच उठेल, याची खात्री वाटते.

@@AUTHORINFO_V1@@