प्रेरणादायी प्रांजल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018   
Total Views |



 

प्रांजल पाटील हे व्यक्तिमत्व रुढार्थाने वेगळे आणि प्रेरणादायी आहे. खरी परीक्षा आता सुरू झाली आहे, पण ती देण्यासाठी प्रांजल सज्ज आहेत. अगदी नेहमीसारख्याच...

 

प्रांजल पाटील नुकत्याच सहायक जिल्हाधिकारी म्हणून केरळमधल्या एर्नाकुलममध्ये रुजू झाल्या. हे वाक्य एका नियमित बातमीसारखे वाटू शकते. परंतु, प्रांजल पाटील हे व्यक्तिमत्व रुढार्थाने वेगळे आणि प्रेरणादायी आहे. कारण, प्रांजल पाटील दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत आणि अशा परिस्थितीत प्रचंड हिमतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर त्या प्रशासनात एक महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रांजल मूळच्या उल्हासनगरच्या. जन्मत: त्यांची दृष्टी अधू होतीच. त्यांची दृष्टी कधीही जाऊ शकते, असे डॉक्टरांनी त्यांच्या पालकांना सांगितले होते. एके दिवशी डोळ्यात पेन्सिल गेल्याचे निमित्त झाले आणि आठव्या वर्षी त्यांची दृष्टी कायमची गेली. शस्त्रक्रिया करून दृष्टी परत आणण्याचा प्रयत्न झाला, पण यश मिळाले नाही. असे होऊनसुद्धा एक वर्ष त्या नियमित शाळेत गेल्या. मात्र, नंतर गोष्टी अशक्य झाल्या आणि मग त्यांना अंध विद्यार्थ्यांच्या शाळेत घालण्यात आले. पुढे अकरावीत त्यांनी नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. तेव्हा त्यांची आई त्यांना महाविद्यालयामध्ये सोडायची. या सगळ्या काळात प्रांजलने धीर सोडला नाही. पण, इंग्रजी माध्यम असल्यामुळे तिचा धीर कधी कधी खचायचा. पण, अभ्यासाचे साहित्य कॅसेटमध्ये रेकॉर्ड करून प्रांजल ऐकायच्या. असा अभ्यास करत तिने बारावीत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. बारावीनंतर प्रांजल यांनी मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे अंध विद्यार्थ्यांसाठी सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या. आतापर्यंत त्यांनी आपल्या परिस्थितीशी जुळवून घेतले होते. पदवीचा अभ्यास जोमाने सुरू केला होता. एका विषयात त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या. पुढच्या शिक्षणासाठी दिल्लीतले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ गाठले. दिल्लीला एकटे कसे राहणार, याबाबत वडिलांना साशंकता होती. पण, हळूहळू प्रांजल तिथे रुळल्या आणि आठ वर्षं त्या दिल्लीत राहिल्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी एम. फिलचा आणि पीएचडीचा प्रबंध पूर्ण केला. इतकंच काय, ‘नेट’ आणि ‘सेट’ परीक्षासुद्धा उत्तीर्ण केली.

 

या संघर्षाच्या काळाबद्दल प्रांजल सांगतात, ”मी एम.फिलनंतर नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. सुरुवातीचा काळ कोणती पुस्तके वाचायची, हे कळण्यातच गेला. मी माझ्या कॉम्प्युटरवर स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले. या सॉफ्टवेअरमुळे स्क्रीनवरच्या गोष्टी ऐकता येतात. मग मी अभ्यासाचे साहित्य पीडीएफ स्वरूपात संगणकावर लोड केले. ‘NCERT' ची पुस्तके ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे तितकी अडचण आली नाही. असे साहित्य ऐकून त्यांनी अभ्यास केला. अनेकदा हेडफोन लावून प्रांजलचे कान दुखायचे. तेव्हा डोळे गेले, आता कानांना तर काही होणार नाही ना, अशी चिंता त्यांना सतावायची. पुढे एम. फिलचा शोधप्रबंध लिहिल्यानंतर अभ्यास सुरू केला. त्यांनी दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे त्या सांगतात. पूर्व आणि मुख्य परीक्षेला त्यांना लेखनिक मिळाला होता. त्यांची जेएनयुमधली एक मैत्रीण त्यांच्याबरोबर यायची. त्याविषयी त्या म्हणतात, “परीक्षेचे प्रेशर खूप होते, पण खरं सांगायचं तर सांगण्यापेक्षा लिहिण्याचं प्रेशर माझ्यावर जास्त असतं. मला फक्त सांगायचं काम होतं. माझं आणि माझ्या मैत्रिणीचं चांगलं ट्युनिंग जुळलं होतं. कधी माझा स्पीड कमी झाला तर ती मला सांगायची. असं करत मी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलाखत दिली आणि पहिल्या प्रयत्नात मी ७७३ वा क्रमांक मिळवला,” असे त्या सांगतात.

 

प्रांजल यांचा कोमल पाटील यांच्याबरोबर तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. कोमल तसे बघितले तर प्रांजलपेक्षा कमी शिकलेले आहेत, पण एका अंध मुलीला पत्नी म्हणून स्वीकारण्याचा डोळस निर्णय त्यांनी घेतला. प्रांजल यांना प्रत्येक टप्प्यावर कोमल यांनी साथ दिली आणि देत आहेत. ते भुसावळला राहतात. त्यांची आणि प्रांजलची अनेक दिवस भेटही होत नाही. असे असले तरी ते आपल्या पत्नीला सतत साथ देतात. सासरच्या लोकांचीसुद्धा त्यांना खंबीर साथ मिळाली आहे. खरी परीक्षा आता सुरू झाली आहे, पण ती देण्यासाठी प्रांजल सज्ज आहेत. अगदी नेहमीसारख्याच.

@@AUTHORINFO_V1@@