अभिराम भडकमकर यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jun-2018
Total Views |



 

मुंबई: प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर तसेच नाट्य दिग्दर्शक सुनील शानभाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगना संध्या पुरेचा आणि तबलावादक योगेश समसी या महाराष्ट्रातील कलाकारांना २०१७ सालचा `संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे तर सावनी शेंडे आणि आदित्य खांडवे यांची उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कलाक्षेत्रात सर्वोच्च मानला जातो. मणिपूरमध्ये झालेल्या बैठकीत देशभरातील ४२ कलाकारांची तर उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारासाठी ३४ कलाकारांच्या नावांची निवड करण्यात आली आहे. यात नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर व नाट्यदिग्दर्शक सुनील शानभाग यांची निवड करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध तबलावादक योगेश समसी यांची तर लोककलेतील योगदानासाठी लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांची संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. १ लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे आपल्याला आनंद झाला असून हा केवळ माझाच नाही तर माझ्यासोबत काम करणार्‍या सर्वांचा सन्मान आहे. त्यांच्याच सहकार्यामुळे मला या पुरस्कारापर्यंत पोहोचता आले,” अशी प्रतिक्रिया नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांनी दै. मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली.

 

सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना युवा पुरस्कार

 

शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध गयिका सावनी शेंडे व आदित्य खांडवे यांना २०१७ सालचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

हा तर बालगंधर्वांचा आशीर्वाद

 

संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा कला क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मानला जातो. ज्या वर्षी या पुरस्काराची सुरूवात झाली तेव्हा सर्वप्रथम हा पुरस्कार बालगंधर्व यांना मिळाला होता. आज तोच पुरस्कार मला मिळत असून हा बालगंधर्वांचाच आशीर्वाद असल्याचे मी मानतो. माझ्यासोबत काम करणार्‍या प्रत्येकाच्या सहकार्यामुळे आज इथपर्यंत पोहोचता आले आहे. हा पुरस्कार त्या प्रत्येकाला मी समर्पित करतो.

अभिराम भडकमकर, नाट्यलेखक

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@