ठाण्यात पर्यटन विकासासाठी पर्यटन विभागाची पसंती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांनी दिली भेट

ठाणे : ठाणे शहरांतर्गत उपवन येथे निर्माण करण्यात आलेल्या अ‍ॅम्फी थिएटर अंतर्गत जलवाहतूक तसेच येऊर येथील प्रस्तावित आदिवासी संस्कृती आणि कला केंद्राच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणार्‍या संधी निर्माण करण्यास राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी व्यक्त केले. यावेळी गौतम यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पर्यटन विभाग, ठाणे महानगरपालिकेस सर्वतोपरी सहकार्य करेल, असे स्पष्ट केले.

दरम्यान गौतम यांनी महापालिका मुख्यालयामध्ये ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणार्‍या महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमोर अंतर्गत जलवाहतूक, चेंजिंग फेस ऑफ ठाणे अंतर्गत असलेले महत्वाचे प्रकल्प, पारसिक, नागला बंदर चौपाटी आदी महत्वाच्या प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत ठाणे शहरामध्ये निर्माण होत असलेल्या अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पांतर्गत उभ्या करण्यात येणार्‍या जेटींवर पर्यटकांसाठी माहिती केंद्रे आणि त्या माध्यमातून ठाणे शहर आणि परिसरामधील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती पर्यटन विभागाच्यावतीने दर्शविण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची सूचना गौतम यांनी केली. त्याचबरोबर कोलशेत येथे निर्माण करण्यात येणार्‍या बहुउद्देशीय वाहतूक हबच्या ठिकाणी ठाणे शहरातील आणि परिसरातील महत्त्वाची पर्यटन स्थळे, तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती देणारे केंद्र उभे करण्याची शक्यताही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

या बैठकीनंतर गौतम यांनी महापालिका आयुक्त यांच्यासमवेत येऊर येथील प्रस्तावित आदिवासी कला व संस्कृती केंद्राच्या जागेची पाहणी करून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपवन येथे उभारण्यात आलेल्या अ‍ॅम्फी थिएटर आणि सिंधू घाट या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र पर्यटन विभागाच्यावतीने पुढाकार घेतला जाईल, असे सांगितले. याबाबत महापालिकेकडून पर्यटन विभागास प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी नागला बंदरच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठाणे शहरामध्ये पर्यटनाच्या संधी निर्माण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे प्रतिपादन प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी केले.

@@AUTHORINFO_V1@@