आयुष्याचा ‘खेळ’ मांडणारे व्यसन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018   
Total Views |




उदास फिरता है अब

मोहल्ले में बारिश का पानी

कश्तियाँ बनानेवाले बच्चे

मोबाईल से इश्क कर बैठे

 

पावसाळा सुरू झाल्यापासून कित्येकांच्या व्हॉट्सअप अकाऊंट, ग्रुप आणि फेसबुक वॉलवरून फिरणारा हा शेर. कदाचित या चार ओळींमुळे अनेकांना आपल्या बालपणीचे दिवस आठवले असतील, तर अनेकांनी टाईमपास म्हणूनही याकडे दुर्लक्ष केले असेल. पण, आता जागतिक आरोग्य संघटनेनेच एक धक्कादायक खुलासा केला असून रोगांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या यादीमध्ये मुलांच्या मोबाईल, व्हिडिओ तसेच डिजिटल गेम्सच्या आहारी जाण्याच्या समस्येचा-व्यसनाचा समावेश केला आहे. “मोबाईल वा डिजिटल गेम्सच्या आहारी जाणे हा एक मानसिक आजार असून अशा प्रकारच्या मुलांना-व्यक्तींना आपण मनोरुग्ण म्हणू शकतो,” असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. “गेमचे व्यसन असणारे लोक त्यामध्ये इतके गुंतून जातात की, त्यांना दैनंदिन जीवनातील आवश्यक काम करण्याचेही भान राहत नाही, त्यांचे संपूर्ण लक्ष गेममध्येच असते,” असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे आणि हे म्हणणे खरे ठरेल अशा कितीतरी घटना नजीकच्या काळात घडल्याही. मध्यंतरी ‘ब्ल्यू व्हेल’ नामक मोबाईलवरील गेमने भारतासह सर्वत्र मोठाच धुमाकूळ घातला होता. या गेमच्या वेडापायी शाळकरी, कॉलेजवयीन मुला-मुलींनी आत्महत्या केल्याचा आरोपही करण्यात आला. ‘ब्ल्यू व्हेल’ गेमवर बंदी घालण्याचीही मागणी केली गेली, तर दुसरीकडे शाळा, कॉलेज अगदी कार्यालयीन वेळात कर्मचारीही या मोबाईलवरील गेमच्या वेडापायी आपली जबाबदारी विसरल्याचे पाहायला मिळाले. म्हणजेच, जागतिक आरोग्य संघटनेने मोबाईल व डिजिटल गेम्सबद्दलचा दावा त्याच्याशी संबंधित बऱ्यावाईट घटना घडल्यानंतरच केल्याचे लक्षात येते. शिवाय गेमिंगच्या व्यसनाचा आजारांच्या यादीत समावेश करण्यामागे आरोग्य जपण्याबरोबरच गेमिंगशी संबंधित अन्य यंत्रणांनाही याबद्दल सावध करण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा हेतू आहे. ज्यामुळे गेमिंगच्या आहारी गेलेल्यांना कोणकोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते, त्याची जाणीव-जागृती तर होईलच, पण त्याचबरोबर अशा लोकांपर्यंत लवकरात लवकर वैद्यकीय मदतही पोहोचवता येईल.

 

पर्याय ‘डिजिटल डिटॉक्स’चा

 

मोबाईलवरील गेमिंगचे व्यसन सध्याच्या काळात भलतेच वाढल्याचे दिसते. आता जागतिक आरोग्य संघटनेने या व्यसनाचा आजारांच्या यादीत समोवश केला आहेच, पण त्यासोबतच या आजाराची लक्षणेही सांगितली आहेत. ज्यावेळी मुले वा एखादी व्यक्ती गेम खेळते, तेव्हा त्यालाच वारेमाप महत्त्व दिले जाते, ज्यामुळे अन्य कामे पूर्ण होत नाही. म्हणजे मुले बऱ्याचदा अभ्यासाच्या नावाखाली कित्येक तास गेम खेळण्यातच वाया घालवतात. ज्यामुळे अभ्यास पूर्ण होत नाही व परिक्षेतही काही आठवत नाही. गेमिंगमुळे व्यक्तीवर एवढा ताण येतो की, त्यामुळे तिच्या खाजगी, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनावर विपरित परिणाम होतात. गेमिंगच्या व्यसनामुळे झोप कमी होते, जेवण कमी होते आणि शारीरिक हालचालीही मंदावतात. यातील झोप कमी होण्याचा जो परिणाम आहे, तो धोकादायक वळणदेखील घेऊ शकतो. कमी झोपेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजार बळावू शकतात. जेवण कमी झाल्याने वजन कमी होणे व त्यामुळे उत्साहाचा अभाव असे परिणाम संभवतात. त्यातूनच अशक्तपणाही उद्भवू शकतो. म्हणजेच या सगळ्या गोष्टी केवळ मोबाईल व त्यातील गेमच्या व्यसनामुळे होऊ शकतात. जे टाळणे आपल्याच हातात आहे. गेमिंगच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स’ अर्थात ‘डिजिटल संन्यास’ हा उपाय असल्याचे यासंबंधी अभ्यास करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितले आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, मोबाईलसारख्या इलेक्ट्रिक उपकरणांवर लोक अधिकाधिक वेळ खर्च करत असल्याने एकमेकांमधील संवाद पुरता खुंटला. आज विज्ञान-तंत्रज्ञानामुळे जग जवळ आल्याचे, जग एक खेडे झाल्याचे म्हटले जात असले तरी त्यामुळे घराघरातील, लहान मुले व मोठ्या वडीलधाऱ्या मंडळींमधील आपली सुख-दुःखे, आनंदाचे क्षण प्रत्यक्षात कोणाशी शेअर करणे थांबले, प्रत्येकजण आपापल्या व्हर्च्युअल जगात हरवला. म्हणूनच ‘डिजिटल डिटॉक्स’च्या माध्यमातून अशी उपकरणे दूर सारून माणसांना माणसांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे झाले. सुरुवातीला जसे म्हटले, सध्या पावसाळा असूनही पूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात लहान मुले पावसाचा आनंद घेताना, पावसाच्या पाण्यात होड्या सोडताना दिसायची तशी आता दिसत नाहीत. तसे ते दिसावे, त्यांनी मोबाईल वा डिजिटल-व्हिडिओ गेम खेळणे टाळून मैदानी खेळ खेळणेही वाढावे, यासाठी घरातल्या मोठ्यांनीही त्यांना त्यापासून परावृत्त केले पाहिजे.

@@AUTHORINFO_V1@@