प्रकाश आंबेडकरांचीही ‘पगडी’वादात उडी, पवारांना पाठिंबा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

पुणे : गेले काही दिवस आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तसेच, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी सुरू केलेल्या ‘पगडी’वादातही उडी घेतली आहे. शरद पवार यांच्या पुणेरी पगडी नाकारण्याच्या भूमिकेचे आंबेडकर यांनी समर्थन केले आहे. तसेच, कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांनी मला नोटीस बजावल्यास मी त्यांना माझ्या वकिलीचा हिसका दाखवतो, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे.
 
 
पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ही वक्तव्ये केली. ते म्हणाले की, शरद पवार यांनी पुणेरी पगडी नाकारत फुलेंची पगडी स्वीकारली त्याचा आनंद आहे. आमचा विरोध पेशवाईला आहे त्यामुळे पुणेरी पगडीलाही आमचा विरोधच आहे, अशा शब्दांत त्यांनी शरद पवारांच्या भूमिकेला समर्थन दिले. शरद पवारांना आम्ही पुरोगामी समजतो पण त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी त्या त्यांनी सोडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायला आमचा नकार नसून काही अटींवर एकत्र येऊ शकतो, असे सांगत त्यांनी आगामी वाटचालीबाबत स्पष्ट दिले. जर भाजपविरोधात आघाडी करायची असेल, तर लोकसभेच्या दोन जागा धनगर, दोन जागा माळी आणि दोन जागा भटक्या विमुक्तांना देण्यात याव्यात, तर आम्ही एकत्र येण्यास तयार आहोत, असे प्रकाश आंबेकडर यांनी स्पष्ट केले.
 
 
पोलिसांना धमकी, ‘माझ्या वकिलीचा हिसका दाखवतो’
 
कोरेगाव-भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच पाच जणांना अटक केली होती. हे पाचही जण नक्षलसमर्थक असल्याचा आरोप असून, त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित काही उल्लेख सापडल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी प्रकाश आंबेडकर भलतेच अडचणीत आले आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी चक्क पोलिसांनाच धमकीवजा इशारा दिला. ‘पोलिसांनी नोटीस बजवल्यास मीच त्यांना नोटीस बजवणार आहे. त्यामुळे पोलिसांना माझ्या वकिलीचा कसा हिसका दाखवतो पहाच’ अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले. काही दिवसांपूर्वीच एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या निवेदकाला त्यांनी ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली होती, तसेच अर्वाच्च शब्दांत शिवीगाळदेखील केली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@