जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



नाशिक : जून महिना संपायला आता केवळ दहा दिवस शिल्लक आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी काही ठिकाणी पाऊस झाला पण, तरीही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. गेल्यावर्षी जूनच्या सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर थेट जुलैमध्येच त्याने हजेरी लावली होती. त्यावेळी सुरुवातीला पडलेला पाऊस पेरणीयोग्य असल्याने शेतकरी फारसे चिंतेत नव्हते. यावर्षी मात्र सुरुवातीपासून पाऊस लांबला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

 

२५ जूननंतर दमदार पावसाचे भाकीत हवामान खात्याने वर्तविले असल्याने त्यानंतरच खऱ्या अर्थाने पेरण्यांना सुुरुवात होईल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. खरीप हंगामातील सहा लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रांवर विविध पिकांच्या पेरण्या होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार रासायनिक खते, बियाणे परवानाधारक विक्रेत्यांकडे उपलब्ध करून ठेवण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनीही शेतीची मशागत करून बियाणे, खते खरेदी करून ठेवली आहेत पण, २० दिवसांत जिल्ह्यात अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाल्याने पेरण्यांना अद्याप सुरुवात झाली नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

 

जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस


मंगळवारी सायंकाळी सिन्नर तालुक्यात विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पूर्व भागातील पाथरे, वावी, वडांगळी, देवपूर, नांदूरशिंगोटेसह सिन्नर शहर व डुबेरे परिसरात पाऊस पडला. काही ठिकाणी वादळ झाले तर सर्वत्र विजा कडकडण्याचे प्रमाण अधिक होते. वावीजवळील मिठसागरे येथील प्रवीण गणपत कासार हा तरुण अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडल्याची घटना सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. पावसाला सुरुवात झाल्यावर घरासमोर साचलेले पाणी काढून देण्यासाठी प्रवीण गेला असताना त्याच्या अंगावर कडाडणारी वीज पडली. त्याला उपचारासाठी तातडीने वावी येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, तो मयत झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यात पावसाला सुरुवात झाल्यावर संपूर्ण तालुक्यात महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजा कडाडण्याचे प्रमाण अधिक असल्यानेही खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. बुधवारीही पावसाने जोरदार हजेरी लावली.

@@AUTHORINFO_V1@@