दयाळू चेहऱ्यामागचे नाझी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

संपूर्ण जगाला ख्रिस्ती करण्याची लालसा बाळगून उधळलेल्या लाखो पाद्य्रांनी जगभरातल्या सर्वच देशांत जाऊन तिथली संस्कृती, तिथला मूळ धर्म नष्ट करण्यासाठी धुमाकूळ घातला.

 

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हा सिद्धांत मांडणाऱ्या कोपर्निकस आणि गॅलिलिओला त्यांच्या मृत्यूपर्यंत विरोध करणाऱ्या, पाच-सहाशे वर्षांपूर्वींच्या कुलुपबंद करुन ठेवण्याजोग्या धर्मग्रंथांना प्रमाण मानणाऱ्या मागास पोपइतकीच आपल्या बुद्धीची झेप असल्याचे सध्याचे पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. व्यंग वा विकार असलेल्या भ्रूणांचा गर्भपात करणे, हे नाझींनी वंशश्रेष्ठत्वासाठी केलेल्या लाखो ज्यूंच्या हत्येइतकेच क्रूर कृत्य असल्याचे तारे पोप फ्रान्सिस यांनी तोडले. युरोपात प्रबोधन चळवळीची सुरुवात झाली तेव्हापासून आजतागायत दररोज वैद्यक, खगोल, रसायन, जीव आदी शास्त्र व क्षेत्रात लाखो नवनवीन शोध लागले-लागत आहेत. यातूनच जुन्या मान्यता, निष्कर्षांना उभ्या-आडव्या छेद देणाऱ्या संकल्पनांचा जन्म होऊन विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती झाली. माणसाने प्लेग वा देवीसारख्या रोगांना पटापट बळी पडण्यापासून ते अशा रोगांचा कायमचा नायनाट होईपर्यंत आधुनिक वैद्यकशास्त्राने झेप घेतली. विज्ञानाचा गाडा जसजसा पुढे सरकत होता, तसतसे वैद्यकशास्त्रातही नवनव्या शोधांच्या साहाय्याने आमुलाग्र बदल होत होते. पुढे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संयोगातून वैद्यकशास्त्रात सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, दुर्बिणीतून शस्त्रक्रिया अशी नवनवी तंत्रे विकसित झाली. सोनोग्राफीच्या तंत्रातून डॉक्टरांना मानवी शरीरातील गुंतागुंत समजून घेता आली, त्यातून कित्येक आजारांचे अचूक निदान करता येऊ लागले. अचूक निदानामुळे रुग्णावरील उपचार अधिक नेमके आणि परिणामकारक झाले. याच सोनोग्राफी तंत्राचा वापर करून डॉक्टरांना गर्भातल्या भ्रूणाची, त्याच्या हालचालींची आणि मुख्य म्हणजे त्याला काही व्यंग, विकार तर नाही ना, याची तपासणी करता येऊ लागली. ज्या भ्रूणांंना जन्मतःच विकार, असाध्य आजाराने ग्रासले जाऊ शकते, त्यातून भविष्यात अशा भ्रूणांचा-व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता वाटली, त्यांचा गर्भपात केला जाऊ लागला. व्यक्तीच्या संगोपनाच्या आणि जीवन जगण्याच्या संघर्षाच्या दृष्टीने हे योग्यच म्हटले पाहिजे. पण, आता ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी आपण आजच्या विज्ञानयुगातही कालबाह्य झालेल्या जुन्यापुराण्या संकल्पनांना कवटाळणारे, अंधश्रद्धांना खतपाणी घालणारे भोंदूच असल्याचे दाखवत अशा गर्भपाताला आक्षेप घेत त्याची तुलना थेट नाझींच्या ज्यू वंशविच्छेदाशी केली. अशक्य गोष्टींना चमत्काराचे लेबल लावून मदर तेरेसांसारख्या धर्मांध प्रचारक असंतांना संत ठरवण्याइतकेच हे बिनडोकपणाचे आहे. त्याचबरोबर इथे नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार निदान उघड-उघड दिसत तरी होता, हे पोप फ्रान्सिस विसरल्याचेही लक्षात येते. मात्र, ‘आकाशातल्या बापा’चे नाव घेऊन चर्चमधल्या पोप, पाद्री, कार्डिनल व मिशनऱ्यांनी जगभरातले ख्रिश्चन धर्मीय वगळता इतर धर्मानुयायांवर केलेल्या छळाच्या, अत्याचाराच्या कहाण्या नाझींपेक्षाही भयंकर असल्याचे ते विसरले. त्यामुळे दयाळू चेहऱ्यामागे दडलेल्या या छुप्या नाझींचा आणि खोट्यानाट्या ज्ञान विज्ञानाची कास धरल्याचा देखावा मांडणाऱ्याचा बुरखा फाडणेही अगत्याचे ठरते.

 

सर्वप्रथम हे समजून घेतले पाहिजे की, पोपने विज्ञानाला धाब्यावर बसून एखादे अंधश्रद्धाळू विधान वा कृती करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पोप फ्रान्सिस यांचे पूर्वसुरी पोप बेनेडिक्ट यांनीदेखील निरोध (कंडोम) हे लोकस्वास्थ्य धोक्यात घालणारे व एचआयव्ही-एड्सचा प्रसार करणारे असल्याचे विचित्र विधान केलेच होते. आता पोप फ्रान्सिस यांनीही आपण बावळटपणात पोप बेनेडिक्ट यांच्यापेक्षा कुठेही कमी नसल्याचे दाखवत गर्भपाताची तुलना थेट नाझींनी केलेल्या ज्यूंच्या कत्तलीशी केली. पोप फ्रान्सिस यांनी या आधीही आपल्या कर्मठपणाचे दर्शन घडवत चर्चमध्ये महिला पाद्री होणे कधीही शक्य नसल्याचे विधान केलेच होते. ज्याला पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या दस्तावेजांचा ते हवाला देत होते, पण जग जसे बदलते तसे मनुष्यानेही बदलणे गरजेचे असते, हे पोप फ्रान्सिस विसरले. बदल ही काळाची गरज आहे, पण आपल्या अज्ञानाच्या डबक्यात गटांगळ्या खाणाऱ्या पोपना हे मंजूर नाही, म्हणूनच ते आजच्या विज्ञानयुगातही अत्यावश्यक कारणांसाठी केला जाणारा गर्भपातही चुकीचा मानतात. यामागे कुठलीही गोष्ट धर्माच्या चष्म्यातून पाहण्याची जशी पोपची व चर्चची सवय दिसते, तशीच स्वतः अविवाहित राहून विवाहितांना सल्ला देण्याचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकारही दिसतोच.

 

दुसरीकडे पोप आणि त्याची धर्मसत्ता, त्यातून निर्माण झालेली पोपची राजकीय सत्तेची भूक याच्या कितीतरी काळ्या कहाण्या आजही जगभरात चर्चिल्या जातात. व्हॅटिकन सिटीत बसून युरोपसह जगभरातल्या सर्वच छोट्या-मोठ्या देशांवर सत्ता गाजवण्यासाठी पोपनी आपल्या धर्मसत्तेचा यथेच्छ गैरवापर केला. धर्मसत्ता ही पोपच्या हाती एकवटलेली असल्याने व धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ असल्याचे राज्यकर्त्यांच्या मनात बिंबवण्यात यशस्वी झाल्याने चर्चने अमाप संपत्ती गोळा केली. हाती आलेल्या संपत्तीतून चर्चमधल्या पाद्री व धर्मगुरूंमध्ये रगेल आणि रंगेलपणा, लैंगिक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला. व्हॅटिकनचे विशेष सार्वभौमत्व टिकावे, ख्रिस्ती धर्माचे जागतिक वर्चस्व राहावे म्हणून पोप पायस ११ वे यांनी तर एखाद्या राज्यकर्त्याप्रमाणेच प्रयत्न केले. एवढेच नव्हे तर आपला धर्म मानवाच्या कल्याणासाठी-सौख्यासाठी, त्याचे दुःख-दैन्य निवारण्यासाठी असल्याचे भासवत चर्चमधल्या पांढरे डगलेवाल्यांनी लाखो लोकांच्या रक्ताचे पाटही वाहवले. संपूर्ण जगाला ख्रिस्ती करण्याची लालसा बाळगून उधळलेल्या लाखो पाद्य्रांनी जगभरातल्या सर्वच देशांत जाऊन तिथली संस्कृती, तिथला मूळ धर्म नष्ट करण्यासाठी धुमाकूळ घातला. गरिबी, दारिद्य्राने गांजलेल्या लोकांना पैसा, संपत्तीची आमिषे-प्रलोभने दाखवून, जे याला बळी पडणार नाहीत त्यांचे बळाचा वापर करून धर्मांतर केले. जन्माला आलेल्या नवजात शिशुंपासून ते घरातल्या वृद्ध व्यक्तींपर्यंत कोणालाही ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी, मिशनऱ्यानी यातून सोडले नाही. जे धर्मांतरासाठी झुकले नाही, त्यांची कुटुंबे नष्ट केली, स्त्रियांवर अत्याचार केले, जमिनी बळकावल्या. आता पोप महाशय तुम्हीच सांगा, हे लाखो-कोट्यवधी लोकांचे धर्मांतर फक्त ख्रिश्चन धर्माच्या श्रेष्ठत्वासाठी, त्या त्या धर्मानुयायांच्या मूळ धर्माचे, संस्कृतीचे केलेले गर्भपातच होते ना? हिटलरने नाझी वर्चस्वासाठी लाखो ज्यूंची कत्तल केली, पण तुम्ही तर संपूर्ण जगाला ख्रिस्ती करण्यासाठी माणसाच्या मन, बुद्धी, मेंदू, हृदय नासवून त्यांच्या स्वत्वाचीच कत्तल केली ना? जी गेल्या दोन हजार वर्षांपासून आजही तशीच सुरू आहे, मग ही तुमची कत्तल त्या नाझींपेक्षाही भयंकर ठरते ना? कारण तुम्ही माणसाचा स्वाभाविक, नैसर्गिक धर्मच नष्ट केला. शिवाय हिटलरचा साथीदार मुसोलिनी याच्या इटलीत ज्यू लोकांना दुय्यम नागरिकाची वागणूक देण्याबद्दल कोणतीही तक्रार न करणारे, पण त्यातून आपल्या ‘मानुष’ चेहऱ्याला डाग लागू नये, अशी इच्छा बाळगणारेही तुमचे चर्चच होते ना? या स्वतःच्याच लोकांनी जगभरातल्या माणसांवर केलेल्या अन्याय, अत्याचार आणि छळाला तुम्ही कोणती उपमा देणार, पोप फ्रान्सिस? नाही, तुम्ही कोणतीही उपमा देऊ शकणार नाहीत वा त्याबद्दल माफीही मागू शकणार नाहीत, कारण हे सर्व तुमच्या वा तुमच्या पूर्वसुरींच्याच आदेशाने होत होते!! पोप फ्रान्सिस, हाच तुमचा दयाळू चेहऱ्यामागे दडलेला छुपा नाझीवाद आहे, जो काही अत्यावश्यक कारणांनी केल्या जाणाऱ्या गर्भपातापेक्षा, आणि नाझी अत्याचारांपेक्षाही भयंकर आहे!

@@AUTHORINFO_V1@@