खोटी तक्रार देणार्‍या आ. खडसेंच्या निलंबनासाठी अंजली दमानिया करणार अर्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |
 
 
जळगाव, २० जून :
राज्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी जळगाव येथे पत्रपरिषदेत केला. खडसे यांच्या निलंबनासाठी विधानसभेचे सभापती आणि उच्च न्यायालय यांच्याकडे अर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
दमानिया म्हणाल्या की, आ. खडसे यांनी मुक्ताईनगर पोलिसात माझ्यासह सहा जणांविरुध्द न्यायालयातून गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची चौकशी व जबाबासाठी पोलीस निरीक्षक कडलग हे फौजफाट्यासह मुंबईला आले होते. पण त्यावेळी तक्रारीचे कागद माझ्याकडे नव्हते. त्यामुळे प्रमाणित प्रतींचा अभ्यास करून आज (दि.२०) मी स्वत: जळगावला पोलीस अधीक्षकांकडे लेखी जबाब घेऊन आले आहे. या गुन्ह्यात दोषी आढळल्यास पोलिसांनी तत्काळ आम्हाला अटक करावी. आम्ही जामीन घेणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
 
 
न्यायालयात सादर केलेल्या दस्ताऐवजांतील दोन डिमांड ड्राफ्ट (डी.डी.) चोरीचे असल्याचे आ. खडसे सांगतात. मग संबंधित बँकेने डी. डी. चोरीप्रकरणी तक्रार का दाखल केली नाही? असा प्रश्‍न दमानियांनी उपस्थित केला. आ. खडसे यांनी न्यायालयाची दिशाभूल करून न्यायालयाच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोपही दमानियांनी केला. या प्रकरणी आ. खडसे यांना निलंबित करावे यासाठी विधानसभा सभापती आणि उच्च न्यायालयात ९ जुलै रोजी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
दहा खडसे,  दहा भुजबळ एकत्र आले तरी पुरून उरेल
आ. खडसे आणि आ. भुजबळ यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविरूध्द मी लढत आहे. खडसे आणि भुजबळ एकत्र येणार आहेत. त्यामुळे दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी एकत्र आले तरी त्यांना पुरून उरेल. मी मनीष भंगाळे नाही. माझ्या विरूध्द २६ खटले दाखल करण्यात आले आहेत. अजामीनपात्र दोन वॉरंट काढण्यात आले. ऍण्टी करप्शन ब्युरोने आ. खडसे यांना क्लीनचिट दिलेल्या अहवालाच्या विरोधात अर्ज सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ. खडसेंना घाबरत असावे किंवा खडसेंनी पक्ष सोडून जावू नये किंवा जळगाव जिल्ह्यातील मते फुटू नये म्हणून त्यांनी खडसेंना क्लीनचिट दिली असावी, असेही दमानिया म्हणाल्या.
 
साधना महाजन, ऍड. रोहिणी खडसे यांच्या नावावर भूखंड
आ. खडसे यांनी ‘दमानिया एक प्यादे आहे. यामागे एक मंत्री आहे’ असल्याचे मध्यंतरी सांगितले होते. त्याचाही दमानिया यांनी खरपूस समाचार घेतला. जेवढा राग आ. खडसेंबद्दल आहे तेवढाच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्याबद्दलही आहे. एस. टी. महामंडळाच्या जमिनीचा गट पांझरपोळ संस्थेला, तसेच खटोड यांना देण्यात आला. यातील काही भूखंड साधना महाजन यांच्या नावावर तर पाच भूखंड ऍड. रोहिणी खडसेंच्या नावावर असल्याचा उल्लेखही दमानिया यांनी केला. रवी पुजारीचे आपल्याला फोन येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला गजानन मालपुरे आणि रोशनी राऊत उपस्थित होते.
दमानियांच्या विरोधात २६ न्यायालयात खटले दाखल आहेत. त्यांनी त्यांचे म्हणणे तेथे मांडावे. त्यांना २६ ठिकाणी म्हणणे सादर करण्याची संधी मिळाली आहे.
- आ. एकनाथराव खडसे
अंजली दमानिया यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत.
- गिरीश महाजन, जलसंपदामंत्री
 
@@AUTHORINFO_V1@@