राहुल गांधींना बालहक्क आयोगाची नोटीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



भिवंडीप्रमाणे जामनेर प्रकरणही भोवणार

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला व भारतीय जनता पक्षाला पाण्यात पाहण्याची एकही संधी न सोडणारे काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी आपल्या या सवयीमुळे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथील अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी राहुल यांनी केलेल्या ट्विटबाबत बाल हक्क आयोगाने त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी राहुल यांनी ट्विटरवरून घटनेचा व्हिडिओ प्रसारित केला होता. या प्रकरणी राहुल गांधी यांना बाल हक्क आयोगाने नोटीस बजावली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमोल जाधव यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बाल हक्क आयोगाने ही नोटीस बजावली आहे. वाकडी येथील तीन अल्पवयीन मुलांवर काही समाजकंटकांनी केलेल्या अत्याचाराच्या घटनेची व्हिडिओ क्लिप राहुल यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यामुळे देशभरात सदर मुलांची बदनामी झाली व त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले असल्याचा आरोप भाजयुमो कार्यकर्त्यांनी केला आहे. व्हिडिओतील पीडित मुलांचे चेहरे अंधुक करून सांकेतिक पद्धतीने हा व्हिडिओ ते प्रसारित करू शकले असते, पण केवळ सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याची तक्रार अमोल जाधव यांनी राज्य बाल हक्क आयोगाकडे केली व पॉस्को कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईची मागणी केली. तसेच, सदर कायद्यानुसार असा मजकूर प्रसिद्ध करणारे माध्यमही तितकेच दोषी असल्याने राहुल गांधी यांच्यासह ट्विटरवरसुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी अमोल जाधव यांनी केली.

अमोल जाधव यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत बाल हक्क आयोगाने राहुल गांधी यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावत कारवाईचे संकेत दिले आहेत. आयोगाने राहुल यांच्याकडे १० दिवसांच्या आत स्पष्टीकरण मागवले असून पॉस्को कायद्यांतर्गत तुमच्यावर कारवाई का होऊ नये?, असा सवालही विचारला आहे. त्याचबरोबर बाल हक्क आयोगाने ट्विटरलासुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेमुळे राहुल गांधी पुन्हा एकदा अडचणीत सापडले असून त्यांना पुन्हा एकदा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी भिवंडी येथील सभेत महात्मा गांधींच्या हत्येचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीनुसार भिवंडी न्यायालयात खटला चालविण्यात येत असून राहुल यांच्यावर या वक्तव्याबाबत आरोपही निश्चित करण्यात आला आहे.

समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य

राहुल गांधी यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओबाबतच नव्हे तर त्यांनी त्यासोबत केलेल्या वक्तव्यावरही कारवाई व्हायला हवी. कारण ते समाजामध्ये तेढ निर्माण करणारे आहे. राहुल यांच्याकडून १० दिवसांत उत्तर आल्यावर आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांकडे राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत.

-अमोल जाधव

सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश, भाजयुमो

@@AUTHORINFO_V1@@