भुलला वर्म आहारेंची!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

 
मनातल्या विचारांचा आहारावर अन्न शिजवताना परिणाम होतो. पदार्थ तयार करणारा अस्वस्थ, अशांत असेल तर खाणार्‍यावर त्याचा तसाच परिणाम होतो. ते विचार आहाराद्वारे माणसाच्या मनाचा ताबा घेतात.
 

दहा इंद्रियांपैकी `रसना’ जिंकणं महत्त्वाचं आहे. विविध पदार्थांच्या आवडी आणि गोडी असणारी रसना लवकर ताब्यात येत नाही. सकस, सात्विक आहार रसनेला भावत नाही. सतत खाण्यासाठी रसना आसुसलेली असते. ती शांत होत नाही. समाधान, तृप्ती नसलेली, सदैव वखवख असणारी रसना त्रास देते. या रसनेला काबूत आणून तिला संयत करणं साधनेच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीनेदेखील योग्य आहे. मुखाने खाणं आणि बोलणं दोन्ही कामं केली जातात. संत तुकाराम रसना जिंकण्यास सांगतात. वाणी जपून वापरण्याचा उपदेश करतात. मोजकं खाण्याचा अंतस्थ शुद्धीसाठी लाभ होतो हे अभंगातून सांगतात.

 
 

वाणी वाटेल तशी बेलगाम उधळू लागली तर अनेकांची अंतःकरणं दुखावली जातात. दुसर्‍याचं मन दुखवणं हे पाप आहे. हे पाप मुखाने केलं जातं. कळत-नकळत मुखावाटे नको ते शब्द आले की, दुसर्‍याच्या मनाला जखमा होतात. शब्द उच्चारल्यानंतर विचारात पडण्यापेक्षा विचार करूनच बोलावं, हे केव्हाही योग्य. मोजकं, आवश्यक तेवढं बोललं की बोलणार्‍याच्या शक्‍तिचा अपव्यय टळतो.

 

“मुखाने राम आणि हाताने काम”

 

असं केलं तर वाणी शुद्ध, पवित्र होत जाते. केलेली कर्म बाधक ठरत नाहीत. परमार्थामध्ये आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वाट्टेल त्या स्थानी आणि वाट्टेल त्याच्या हातांनी तयार केलेला आहार त्रासदायक ठरतो स्वयंपाक करताना जशी वासना असेल, तशी वासना स्वयंपाक ग्रहण करणार्‍यामध्ये प्रविष्ट होते. आपल्या ते चटकन लक्षात येत नाही. स्वहस्ते किंवा स्वत:च्या घरी तयार केलेले भोजन सेवन करणे योग्य आहे. म्हणून ईश्‍वराचे नाम घेत केलेल्या अन्नाचा सुपरिणाम होतो. महाप्रसाद ग्रहण करण्यामुळे भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं.

 

ज्यास्थानी भक्ती...भजन चालू असतं ना त्या स्थानाच्या अन्नाला विशेष गोडी असते. सात्विकता वर्धित होते. सत्त्वगुण सामोरा येतो. इतर दोन तमोगुण, रजोगुण मागे सरतात. परंतु, धावपळीच्या, धकाधकीच्या आयुष्यात इतका खोलवर विचार कोणी करत नाही. रस्त्याच्या कडेला, हॉटेलमध्ये, कॅन्टीनमध्ये खाणारे खूप लोक आहेत. सगळ्यात उत्तम धंदा हॉटेलचा चालताना दिसतो. बाहेर खाण्याची आवड स्वयंपाक करण्याचा आळस यामागे असतो. सौम्य, साधे, घरातले अन्न खाल्‍ले तर माणसाचा स्वभाव चांगला राहतो. षड्रिपू जोर करत नाहीत. त्यामुळे भांडणं, मारामार्‍या, दंगे कमी होतात, म्हणजे व्यक्तिगत आरोग्य आणि मानसिक विकास साधला जातो. त्याचप्रमाणे सामाजिक तंटे कमी होऊन समस्या कमी निर्माण होतात.

 

दासबोध आणि श्रीगुरुचरित्र ग्रंथामध्ये सात्विक आहाराचं महत्त्व विशद केलेलं आहे. त्याचे नियम सांगितले आहेत. मितभूक साधकाला साधन करण्यास उपयुक्त ठरते. जिभेवर ताबा, संयम ठेवला की उपासना चांगली होते. ध्यानधारणेसाठीदेखील असा मोजका आहार लाभदायी ठरतो. सात्विक अन्न खाल्लं तर सात्विक वृत्ती तयार होते.हा नियम लक्षात ठेऊन अन्न, आहार कोठे आणि किती घ्यायचा ते ठरवणं आवश्यक आहे. संत एकनाथ महाराज लिहितात-

 

आहारालागी करी देवाचे भजन ।

मिळे मिष्टान्न भोजनासी॥

आहारालागीं करी तीर्थांचे भ्रमण।

आहारे जिंकिले मन सर्वपरी॥

आहाराच्या अभिलाषेने केलेलं देवाचं भजन आणि तीर्थयात्रांचं भ्रमण निरर्थक असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. आहारावर नियंत्रण आलं तर मनावर नियंत्रण येतं; अन्यथा भोजनासाठी भजन काय कामाचं? अशामुळे देव कदापि भेटत नाही.

जे खाण्याच्या अभिलाषेने पुजारीपण स्वीकारतात, त्यांच्याबाबतीत संत एकनाथ स्पष्टपणे सांगतात,

आहारालागी देवपूजा ।

आहारे खादलेंजी निजा॥

न कळेची हिताहित ।

आहारे खादली पंचभूते॥

आहारालागीं कर्म धर्म ।

भुलला वर्म आहारेंची॥

रसनेचे चोचले पूर्ण करण्याच्या हेतूने मंदिरातील देवपूजा करण्याला काहीही अर्थ नाही. स्वहित कळत नाही म्हणून अहित करतो. रसनेवर संयम, मोजका आहार घेण्यात हित सामावलेलं आहे.खालच्या पातळीवर उतरून होणारी देवपूजा भगवंतापर्यंत पोहोचणं शक्य नाही. स्वधर्म, स्वाभिमान, संयम या तीन ‘स’ वर तन आणि मनाचं आरोग्य अवलंबून आहे. यामुळे देहाला जगवण्यास आवश्यक असेल इतकंच खाणं योग्य आहे. तसंच मनाला भगवंताच्या प्राप्तीसाठी जागवण्यास माफक खाणं योग्य आहे.

जेणे जिंकिली रसना ।

तृप्त तयाची वासना।

इंद्रियावर विजय मिळवला की रसना आणि वासना शांत होतात म्हणून भगवंताच्या स्मरणात, चिंतनात भोजन करावं. आत्मचिंतनात मोजका, साधा आहार घेतला की भगवंतप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. जिव्हेवर, रसनेवर ताबा मिळवला की अर्धा परमार्थ हाती येतो.

कौमुदी गोडबोले

@@AUTHORINFO_V1@@