रामदासी मठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

 
 
मुसलमान धर्मातील सूफी संप्रदाय हा गूढवादी पंथ म्हणून ओळखला जातो. सूफी पंथात अनेक श्रेष्ठ कवी आणि संत होऊन गेले आहेत. तथापि, नंतर या पंथात राजकारणाचा शिरकाव झाला. त्यामुळे तत्कालीन मुस्लीम समाजात सुफींचे फार प्रस्थ माजले होते.
 

इसवी सन १२९६ मध्ये ज्ञानेश्‍वरांनी समाधी घेतली. त्यानंतर अवघ्या सहा-सात वर्षांत बाकीची भावंडे ब्रह्मपदी विलीन झाली. ज्ञानेश्‍वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर मुसलमानी आक्रमणाच्या घटनांची सुरुवात झाली. इ. स. १४९८ मध्ये मुसलमानांनी पंढरपुरावर स्वारी करून तेथील महाद्वाराची मोडतोड केल्याची नोंद आढळते. त्यानंतरच्या काळात हे प्रकार वाढत गेले. रामदासस्वामींच्या तीर्थयात्रेच्या काळात सर्वत्र मुसलमानांच्या असल्या कारवायांना ऊत आला होता. त्या काळात राजकीय, सामाजिक अत्याचारांच्या अनेक घटना रामदासांनी पाहिल्या असतील आणि खात्रीलायक विश्‍वासू माणसांकडून ऐकल्या असतील. हे आक्रमण नुसते राजकीय असते, तर त्याचा प्रतिकार करणे शक्य होते, पण ते तसे न राहता सांस्कृतिक आक्रमणही त्याबरोबर चालू होते. त्यामुळे हिंदू धर्म व हिंदू संस्कृती धोक्यात आली होती, हे सुज्ञ रामदासांच्या लक्षात आले. मुसलमानी सूफी पंथाच्या लोकांनी या आक्रमणात पुढाकार घेतला होता.

 

धर्मप्रचार करणे आणि हिंदूंना बाटवून मुसलमान करणे यात सुफींचा वाटा मोठा आहे. शिवाय त्यांच्या पाठिशी राजकीय बळ असल्याने त्यांना कसलीच चिंता नव्हती. सर्व मुस्लीम आणि सूफी ज्याला आपला गुरू मानतात तो मोईनोद्दिन ख्वाजा चिस्ती हा शहाबुद्दीन घोरीच्या फौजेबरोबर हिंदुस्थानात आला. त्याने धर्मप्रसाराचा सपाटा लावला. दिल्ली ते अजमेर या प्रवासात त्याने सातशे हिंदूंना मुसलमान बनवले. तो अजमेरला पोहोचला तेव्हा अजमेर शहरात एकही मुसलमान नव्हता. ते हिंदूंचे शहर होते, परंतु हा चिस्ती तेथे आल्यावर त्याने किती हिंदूंना बाटवले याचा हिशेब नाही. कय्यूम आणि मासूम या दोन सूफी संतांशी औरंगजेबाचा संबंध आला. या मासूमच्या सांगण्यावरून औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लादला. याच सूफी संतांनी मुस्लीम राज्यकर्त्यांत धार्मिक कट्टरपणा निर्माण केला, असे म्हणतात. प्रसिद्ध साहित्यिक सेतुमाधव पगडी त्यांच्या ‘सूफी संप्रदाय’ या ग्रंथात लिहितात की, ‘’या सूफी संतांचे तत्कालीन मुस्लीम राज्यकर्त्यांशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनीच हिंदुस्थानात इस्लामी वर्चस्वाला स्थैर्य प्राप्त करून दिले. मुसलमानी सत्तेच्या हद्दी विस्तृत करण्यात सुफींची कामगिरी नजरेआड करता येत नाही.” सेतुमाधव पगडी पुढे लिहितात, “मंदिरे व मठांचा बळजबरीने ताबा घेणे, मूर्तींचा विध्वंस करणे, मंदिराच्या जागेवर मशीद उभारणे, मंदिरांचे दगड व मूर्ती मशिदीच्या बांधकामात घालणे या सर्व प्रकारात सूफींनी भाग घेतलेला दिसून येतो.”

 
 

त्या काळात सूफींचे मठ हिंदुस्थानात सर्वत्र होते. धर्मप्रचार करणे, हिंदूंना बाटवणे हे त्यांचे काम होते. राज्यसभेचे बळ त्यांच्या पाठिशी होते. ही त्यांची मठ उभारणी पाहून तीर्थाटनाच्या काळात रामदासांच्या मनात आपणही असेच हिंदूंचे मठ स्थापन करावे, असे आले असेल. असे काही टीकाकारांचे म्हणणे आहे. पण ते बरोबर वाटत नाही. समर्थांसारखा स्वतंत्रप्रज्ञ पुरुष अशी दुसर्‍याची कल्पना अनुसरेल, हे शक्य वाटत नाही. हिंदू धर्मावरचे, संस्कृतीवरचे आक्रमण रामदासांनी वेळीच ओळखले होते. ते थोपवून हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी हिंदूंचे संघटन करणे आवश्यक वाटल्यामुळे त्यांच्या मनात मठ स्थापनेची गरज निर्माण झाली असावी, अशी शक्यता आहे. रामदासांनी म्हटले आहे की, ‘म्लेंच्छ दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड ॥’ हे म्लेच्छांचे दुर्वर्तन बरेच दिवसांचे जुने आहे. ते मोडून काढले पाहिजे. कारण परिस्थितीच अशी होती की-

 

तीर्थक्षेत्रे मोडिली ।

ब्राह्मणस्थाने भ्रष्ट झाली ।

सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥

 

असा हृदयाचा आक्रोश करून रामदास थांबले नाहीत, तर त्यासाठी उपाय शोधण्यामागे ते लागले. त्यांनी निरीक्षण केले की, हिंदू शूर आहेत, पण ते विखुरलेले आहेत. हिंदू दुर्वर्तनी नाहीत, पण त्यांच्यात एकोपा नाही. त्यांच्यात कर्मठपणा आहे. खर्‍या धर्माचे मर्म त्यांना समजलेले नाही. निवृत्तीवादाचा त्यांच्यावरील पगडा अजून दूर झाला नाही. थोडक्यात, हिंदू संघटित नाहीत. तेव्हा नैतिक पातळीवर संघटना उभारून ती सज्जनांच्या राज्यसत्तेसाठी उपयोगी पडावी, या भावनेतून रामदासांनी हिंदुस्थानभर मठ उभारण्याचे ठरवले असावे आणि ते त्यांनी केलेही.

 

असे म्हणतात की, रामदासांनी त्याकाळी हिंदुस्थानभर अकराशे मठ स्थापन केले होते. शंकरराव देवांच्या जवळ मिळालेल्या टिपणातील मठ स्थापित गावांची संख्या १०२९ आहे. म्हणजे ती अकराशेच्या जवळपास आहे. समर्थशिष्य गिरीधरस्वामींनी त्यांच्या ‘समर्थप्रताप’ ग्रंथात या मठांची आणि महंतांची यादी दिली आहे. त्यातील बरेचसे महाराष्ट्रात आहेत. ते साहजिक आहे. तसेच कर्नाटकात मन्यारगुडीला मौनीस्वामींचा मठ, तेलंगणात शिवराम, सुरतला जनार्दन, द्वारकेला हरिस्वामी, गोमंतकात गोविंद, काशीला रामचंद्र, रामेश्‍वरला हनुमान, बद्रिकेदारला दयाळ इत्यादिकांच्या मठांचा उल्लेख आहे. मुख्य मठ चाफळचा होता. मठाचा कारभार भिक्षेवर चाले. कुणाचीही मदत घेण्यास मनाई होती. मठाधिपतींना स्वतःची संपत्ती करण्याची परवानगी नसे. मठाची शिस्त कडक होती. जवळच्या मठपतींना तीन वर्षांतून एकदा, तर दुसर्‍या मठपतींना अकरा वर्षांतून एकदा चाफळला येऊन समर्थांना आपल्या कामाचा आढावा द्यावा लागत असे. आज काळाच्या ओघात आणि विपरीत राजकीय परिस्थितीत अनेक मठ नाहीसे झाले आहेत. तथापि गिरिधरस्वामींनी उल्लेखलेले मठ त्याकाळी असले पाहिजेत आणि समर्थांनी त्यावर महंत तयार करून पाठवले असतील, यावर विश्‍वास ठेवायला हरकत नाही. जेथे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध नसतात, तेथे अनुमानाचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

 

सुरेश जाखडी

@@AUTHORINFO_V1@@