बचतगटापासून पर्यावरणापर्यंत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jun-2018
Total Views |



 

सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी नाशिकमधील सिंहस्थात कापडी पिशव्या वाटपाची चळवळ पुढे आली. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुकही झाले. या उपक्रमामागे मेहनत होती ती दीपाली कुलथे यांची.

 

सरकारने प्लास्टिकबंदी जाहीर केल्यापासून महाराष्ट्रांतील शहरांमधले वातावरण बऱ्यापैकी सुधारलेले दिसते. अनेक लोक आज प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या घेऊन बाजारहाट करताना दिसतात. खरे तर यापूर्वीही आपण कापडी पिशव्या वापरत होतोच. मात्र, उठसूठ प्लास्टिक पिशव्या कोणत्याही कारणाशिवाय वापरण्याची सवय कायमची जडली ती जडलीच आणि मग बघता बघता सगळेच बिघडून गेले. राज्य सरकारने प्लास्टिकबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी नाशिकमध्ये झालेल्या सिंहस्थात कापडी पिशव्या वाटपाची चळवळ पुढे आली. पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून त्याचे सर्वत्र कौतुकही झाले. या उपक्रमामागे मेहनत होती ती दीपाली वसंत कुलथे यांची. गेल्या पाच-सहा वर्षांपासून स्त्री शक्ती महिला बचतगट समूहात सचिव म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली कुलथे यांना मार्गदर्शन मिळाले ते बचतगट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम एकनाथ निकम आणि अध्यक्ष प्रज्ञा सुदाम निकम यांचे. हे सर्व काम न कंटाळता रात्रंदिवस करून त्यांनी पर्यावरण राखण्याच्या चळवळीला हातभार लावला असून आजही त्यांचे ते कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

 

एका बचतगटाच्या कामासाठी दिंडोरी नाका भागात असलेल्या स्त्री शक्ती महिला बचतगट समूहात आलेल्या दीपाली यांना सुदाम निकम यांनी संस्थेत काम करण्याची विनंती केली. त्यांनी त्यास होकार दिला आणि अवघे बी. ए. पर्यंत शिक्षण असलेल्या दीपाली यांनी तीन महिने कोणताही पगार न घेता आत्मीयतेने काम केले आणि ऑडिट,अकाऊंटंट वगैरे सर्व बाबी माहिती करून घेतल्या. सध्या त्या ऑडिटच्या परीक्षा देत आहेत. मात्र, व्यावहारिक बाबींमध्ये त्या तरबेज झाल्या आहेत. हजारो लोकांशी त्यांचा संपर्क येतो आणि कोणताही अहवाल त्यांनी पाहून घेतल्याशिवाय परिपूर्ण होत नाही. संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांना स्वावलंबी बनविताना देण्यात येणारे कर्ज पैशाच्या स्वरूपात दिले जात नाही तर वस्तूरूपात दिले जाते. त्यामुळे पैसे दिल्यास त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर होण्याचे टळते.

 

या संस्थेमार्फत विविध कामे होतात. संस्थांचे रजिस्ट्रेशन, ऑडिट, ऑनलाईन कामे संस्था करते. केवळ नाशिकच नव्हे तर नाशिकजवळ असलेल्या धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, ठाणे जिल्ह्यातील बचतगटांची कामेदेखील येथे केली जातात. हे काम करीत असतानाच पर्यावरणविषयक काम करण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी सिंहस्थात काम करण्याचे ठरले. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून त्याला पर्याय देण्याचे ठरले. कापडी पिशव्या वाटपाची कल्पना त्यातून पुढे आली. सिंहस्थात आलेल्या यात्रेकरूंकडील प्लास्टिक पिशव्या घेऊन त्यांना कापडी पिशव्या देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. बचतगटाच्या महिलांकडून या पिशव्या शिवून घेण्यात आल्या. संस्थेच्या नफ्यातील ४० टक्के रक्कम त्यांनी या उपक्रमासाठी खर्च करण्याचे ठरविले. आजसुद्धा महिन्याला तीन-चार हजार पिशव्या मोफत वाटप होतात. सुरुवातीला अनेकांनी विरोध केला. मात्र, मोफत वाटप म्हटल्यावर चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्यात सहभाग दिला. सुमारे सव्वा लाख कापडी पिशव्या सिंहस्थ काळात वाटण्यात आल्या. धर्मादाय आयुक्त, महसूल आयुक्त, सहकार निबंधक यांनी या उपक्रमाबद्दल सत्कार केला. इतकेच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील दीपाली कुलथे यांना गेल्या वर्षी दिवाळीपूर्वी मुंबईत बोलावून या उपक्रमाचे कौतुक केले. निकम आणि दीपाली कुलथे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत. मात्र, पुरस्कारांपेक्षा पर्यावरण कार्य महत्त्वाचे आहे, अशी दीपाली कुलथे यांची भावना आहे. त्यांचे पती वसंत कुलथे हे खासगी नोकरीत आहेत. त्यांनीदेखील पत्नीच्या या कार्यासाठी संपूर्ण सहकार्य केले आहे.

 

आतादेखील विविध प्रकारच्या पिशव्या त्यांनी दाखविल्या. गोणपाटापासून बनविलेल्या पिशव्या, जुन्या साडीपासून बनविलेल्या पिशव्या, पातळ कापडाच्या पिशव्या शिवून त्यांना लावलेले बंद असे नवे सोयीस्कर स्वरूप अशा अनेक जुन्या आणि आधुनिक रूपातील पिशव्या पाहायला मिळाल्या. आता तर व्यावसायिक स्तरावरून पिशव्यांच्या ऑर्डर मिळू लागल्या आहेत. त्यातून ३८ महिलांना रोजगारदेखील उपलब्ध झालेला आहे. भावी काळात प्लास्टिकमुक्तीसाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे. शहरात असलेले प्लास्टिकमुक्तीचे काम खेडोपाडी पोहोचवायचे आहे. प्रदूषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या गावांना सरकारने १० लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे. त्यांना या कापडी पिशव्यांचे महत्त्व समजावून सांगण्याचे उपक्रम राबविले जात आहेत. त्यायोगे पर्यावरण शुद्ध ठेवण्याची जाणीव गावकऱ्यांना होऊ शकेल.

 

आता स्त्री शक्ती महिला बचतगट समूहाबरोबरच गजराज सोलार पॉवर मॅनेजमेंट, गजराज वि. का. संस्था, गजराज कुशल-अकुशल कामगार सहकारी पतसंस्था या मार्फतदेखील काम सुरू करण्यात आले आहे. तसेच वटपौर्णिमेस वडाच्या झाडांचे वाटप, महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्हेजिटेबल डिहायड्रेशन, अकाऊंट राईटिंग अशी प्रशिक्षणे देखील दिली जात आहेत. अशाप्रकारे समाजाला अत्यंत उपयुक्त कामे दीपाली कुलथे यांच्याकडून होत असून भावी काळात अनेकांनी त्यांचा आदर्श घेतल्यास महिला स्वावलंबी तर होतीलच, पण त्याच बरोबर प्रदूषणमुक्तीचे ध्येयदेखील साध्य करता येईल.
 

पद्माकर देशपांडे

 
@@AUTHORINFO_V1@@