युती आणि गती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |



 

पोटनिवडणुका हरल्याच्या आवईपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढती संख्या दुर्लक्षित करता येणार नाही. याउलट स्थिती सेनेची आहे. युतीत असूनही गती कायम राखण्याची किमया भाजपला साधता आली आहे. शिवसेनेचे काय याचा विचार शिवसेनेनेच करावा.
 

पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत जे व्हायला नको होते ते झाले. दिवंगत चिंतामण वनगांचे घर फोडून शिवसेनेने त्यांच्या मुलाला लोकसभेचे तिकीट दिले. याचा परिणाम जो व्हायचा तोच झाला. लोकांनी शिवसेनेला नाकारले आणि भाजपच्या उमेदवारालाच आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. यावेळी शिवसेनेकडून एक आवई पिकविली गेली ती म्हणजे, युती तोडण्याची. युती तोडणार याचा अर्थ देवेंद्र फडणवीसांचे सरकार पडणार, असा अर्थ लावून माध्यमांनीही तोच विषय दिवसभर चालविला. सगळीकडचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात युती तुटणे, सरकारमधून बाहेर पडणे अशा कुठल्याही विषयावर भाष्य करणे टाळले. पालघरची निवडणूक एका अर्थाने राजकीय अवकाशात अनेक इशारे देणारी होती. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक अत्यंत चाणाक्षपणे जिंकली, त्याचे मुख्य कारण जर शिवसेना ही निवडणूक जिंकली असती तर उद्या शिवसेनेच्या बरोबर राजकारण करताना शिवसेनेचे वाढीव उपद्रवमूल्य सहन करावे लागले असते. ‘पोटनिवडणुकीत भाजप हरते’ या समजाला काही प्रमाणात का होईना तडा देण्याचे कामही या निर्णयामुळे झाले. राजकारणात कुणीही सरळ नसते, या उक्तीनुसार यात आता जे काही घडत आहे तो काळाचा महिमा म्हणूनच पाहिले पाहिजे. शिवसेनेला योग्य वागणूक दिली जात नाही, असा जो काही समज शिवसेना नेत्यांनी शिवसैनिकांत दूरवर पसरविला आहे, त्याचे बरेवाईट परिणाम शिवसेनेला भोगावेच लागणार आहेत. ज्याला कस्पटासमान वागणूक दिली जाते, त्याला कुणीही नेता मानत नाही. खरे तर शिवसेना-भाजप ही या देशातली मुद्द्यांच्या आधारावर झालेली सर्वात पहिली व सर्वाधिक काळ टिकलेली युती. शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे आणि भाजपकडून प्रमोद महाजन अशा नेत्यांनी ही युती केली आणि बराच काळ चालविलीदेखील. या काळात शिवसेनेलाही मनाजोगत्या अनेक गोष्टी मिळाल्या आणि त्याचा उपयोगही शिवसेनेने उत्तम करून घेतला. मनोहर जोशींना लोकसभेचे अध्यक्षपदही मिळाले, ते याच काळात. मराठीचा मुद्दा मागे पडल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला. रा. स्व. संघाच्या जिव्हाळ्याच्या विषयावर शिवसेना उघडउघड भूमिका घेऊ लागली आणि हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा म्हणून शिवसेनेची प्रतिमा निर्माण झाली. प्रतिमा निर्मितीचे कसब उत्तम जाणून असलेल्या बाळासाहेबांनी आपल्या संपूर्ण हयातीत या तंत्राचा उत्तम वापर करून घेतला. अर्थोअर्थी शिवसेना भाजपबरोबर असली तरीही प्रसंगी आगळीक करण्याची संधी शिवसेनेने कधीच सोडली नव्हती. आज जो आक्रमकपणाचा आव संजय राऊत यांनी आणला आहे, त्याचे मूळ तिथे आहे. प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देताना शिवसेनेला त्यात मराठीचा मुद्दा दिसत होता. नंतर मात्र प्रणव मुखर्जींनाही शिवसेना पाठिंबा देऊन मोकळी झाली. त्याचे कुठलेही समर्थन शिवसेनेला करता आले नाही. लहान-मोठे रुसवे फुगवे लक्षात ठेऊन शिवसेनेचे हे उद्योग सुरूच होते.

मात्र, अडचण आली ती, २०१४ नंतर नरेंद्र मोदींचा उदय ही अनेकांना न पचणारी गोष्ट होती. तशीच शिवसेनेलाही मोदी इतकी मोठी मुसंडी मारतील, असे वाटले नव्हते. त्यामुळे हिंदुत्वाचा आव आणून शिवसेना त्यांना हवे ते करीत राहिली, पण पहिल्या मंत्रिमंडळ वाटपाच्या वेळीच सेनेचा रडारडीचा डाव सुरू झाला होता. आता यातून मार्ग काय हा सेनेलाही पडलेला प्रश्‍न आहे. महानगरपालिका असो किंवा विधानसभा, प्रत्येक वेळी शिवसेना युती तोडते आणि मग भाजपशीच त्यांना जुळवून घ्यावे लागते. गेले अनेक दिवस हा खेळ सुरू आहे. खरे तर शिवसेना-भाजप युतीचा पोपट केव्हाच मेला आहे. मात्र, आता दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज ही सत्तेसाठी आहे. भारतीय जनता पक्षाने यासाठी स्वत:ची मानसिक तयारी करून ठेवली आहे. मात्र, शिवसेनेचा सरंजामी डौल काही केल्या उतरायला तयार नाही. आपल्याकडे संख्याबळ नाही याची सेनेला पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्रात युती करून ज्या पक्षाला आपण कस्पटासमान लेखले त्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आपल्याला काम करावे लागते, हेच शिवसेनेचे खरे दुखणे आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस हे काही मिनतवार्‍या करण्यासाठी ‘मातोश्री’वर धावत जाणारे नेते नाहीत. त्यांनी त्यांचा आब उत्तम राखला आहे. त्याला कर्तृत्वाची जोडही दिली आहे. मोठा आवाज करून आपण मोठे आहोत, हे दाखविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न म्हणजे एखाद्याने सोईच्या सूर्यप्रकाशात उभे राहून आपलीच सावली उंच करून दाखविण्यासारखा प्रकार आहे. ज्यावेळी युती तुटली त्यावेळी उद्धव ठाकरेंना असे वाटले होते की, आपण खूप मोठे नेते होऊ, कारण भाजपने युती तोडली, असा कांगावा करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रकार होता. युती तुटल्यामुळे हिंदुत्वाचे नुकसान झाले, असा कांगावादेखील त्यावेळी करण्यात सेनेकडून करण्यात आला होता. हिंदुत्वाची मते आपल्या पदरात पडतील, असे उद्धव ठाकरेंना वाटत होते, मात्र झाले उलटेच. लोकांनी शिवसेनेला नाकारून भाजपला निवडले व देवेंद्र फडणवीसांचे नेतृत्व त्यामुळे महाराष्ट्रासमोर आले. आताची युती ही केवळ आकड्यांची गरज झालेली आहे. स्वबळावर सत्ता मिळविण्याचे शिवसेनेचे स्वप्न जोपर्यंत आकडे नाहीत तोपर्यंत कधीही पूर्ण होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना व भाजपच्या जागा आता निश्‍चित झाल्या आहेत. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने स्वत:च्या जागा तर वाढविल्या आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या प्रभावही वाढवला आहे. पोटनिवडणुका हरल्याच्या आवईपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील वाढती संख्या दुर्लक्षित करता येणार नाही. याउलट स्थिती सेनेची आहे. युतीत असूनही गती कायम राखण्याची किमया भाजपला साधता आली आहे. शिवसेनेचे काय याचा विचार शिवसेनेनेच करावा.

@@AUTHORINFO_V1@@