स्वातंत्र्यवीर सावरकर आणिराष्ट्रीय सुरक्षा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018   
Total Views |



विनायक दामोदर सावरकर म्हणजेच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’, भारताला मिळालेले एक रत्न, तसेच काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे क्रांतिकारक, संरक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य फक्त भारतभूमीची सेवा करण्यात खर्ची घातले. आज सावरकर हयात असते, तर त्यांनी आपल्यासमोर कोणती व्यूहरचना मांडली असती असा विचार सर्व राष्ट्रप्रेमींनी करावयास पाहिजे.

आज मी सांगतो ते लोकांना पन्नास वर्षांनी पटते. पन्नास वर्षे वाट पहाण्याची माझी सिद्धता आहे,” स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हे वाक्य.

२८मे... स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३५वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. त्या निमित्ताने त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील योगदानासह सामाजिक, राजकीय, वैचारिक संघर्षांचे, देशाच्या सुरक्षेचे सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. दधिची ऋषींच्या अस्थींपासून वज्र बनवल्यानंतर आता काय करावे, या विचारांत विधाता गुंतला असता, त्याला एक सुंदर स्वप्न पडले. त्या स्वप्नाचे नाव होते, विनायक दामोदर सावरकर.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या सुरक्षेच्या संबंधात अनेक विधाने वेळोवेळी केली. या सर्वांचे विश्‍लेषण करणे या लेखात शक्य होणार नाही, पण त्यांनी चीन, सागरी सुरक्षा आणि बांगलादेशी घुसखोरी या फक्त तीन विषयांवर आपण या लेखात अवलोकन करू.

सावरकरांचे सैनिकीकरण हे

भारताच्या स्वातंत्र्यासाठी...

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाहीर केले होते की, भारताच्या रक्षणासाठी आणि भविष्यकाळात स्वराज्याच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जे अत्यंत उपयुक्त व व्यवहारी साधन ठरणार आहे, ते सैनिकीकरणच होय. १८५७च्या स्वातंत्र्यसमरापासून राजकारण सैन्याबाहेर ठेवण्याचे ब्रिटिश सरकारचे धोरण आहे. ब्रिटिश सैन्यातील हे शस्त्रधारी सैनिक आज आपल्याला परकीय सरकारचे पगारी नोकर आहेत, असे वाटत असले, तरी योग्य वेळ येताच देशाशी एकनिष्ठ असलेले ते कणखर देशभक्त ठरल्याशिवाय राहणार नाहीत. एखादी पिस्तूल किंवा बंदूक जवळ सापडली तर तरुणांना तुरुंगात टाकणारे ब्रिटिश सरकार आज आपण होऊन तुमच्या हाती बंदुका, तोफा नाईलाजाने, पण विश्वासाने देत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन सैनिकी शिक्षण घ्या. हजारो तरुणांनी तोफा, बंदुका, विमाने, जहाजबांधणी, दारूगोळा आदी कारखान्यांत शिरून, तंत्रज्ञ म्हणून शिक्षण घेतले पाहिजे. भारतातील प्रजेला गुलाम करण्याची मेकॉलेची योजना, तेच शिक्षण घेऊन तुम्ही असफल केलीच ना? मग तुमच्या हिताच्या दृष्टीने याचा लाभ घ्या. तुमचे शत्रू कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहे. मी तुम्हाला सांगतो की, बंदुका हातात घ्या आणि संधी येताच त्यांचा स्वातंत्र्यासाठी उपयोग करा.”

सावरकरांच्या सैनिकीकरणाचा स्वातंत्र्यानंतर उपयोग

१९३९ साली ब्रिटिश भारतीय सेनेत शेकडा ३५ स्वधर्मीय आणि शेकडा ६५ विधर्मीय होते. सावरकरांच्या सैनिकीकरणामुळे ही प्रमाणे उलटी झाली आणि सावरकरांच्या विधानाची प्रचीती आली. आपल्याकडे असलेल्या ६५ टक्के सैन्यबळावरच काश्मीर, हैदराबाद वगैरे समस्यांचे निराकरण होऊन, ही संस्थाने भारतात विलीन होऊ शकली. दूरदर्शीपणा म्हणतात तो हाच! सावरकरांचे सैनिकीकरण हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि १९४७ नंतरच्या अनेक युद्धासाठी होते.

भारत-चीन संबंध आणि स्वा. सावरकर

सध्या चीन नियमित करणार्‍या घुसखोरीच्या संदर्भात स्वा. सावरकरांची तीव्रतेने आठवण होते. देशाच्या सीमांचं रक्षण करण्याबाबत त्यांनी अनेकदा सावधानतेचे इशारे दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी सर्वप्रथम केलेली सूचना होती. ‘देशाच्या सीमा निश्चित करा.’ पण राज्यकर्त्यांनी त्यांची उपेक्षा केली. त्यामुळं पुढच्या काळात चीननं सीमेसंबंधी वाद निर्माण केला.

आपल्या देशाच्या संरक्षणांसंबंधात सावरकरांनी दिलेले इशारे ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या घोषणांमध्ये विरून गेले. त्या काळात भारत आणि चीन यांच्या ‘शांततापूर्ण सहजीवना’ची कल्पना वारंवार मांडली जात होती. या कल्पनेची थट्टा करताना सावरकर म्हणाले, “सहजीवन दोन प्रकारचं असतं. एकमेकांशेजारी बसून, बरोबरीनं वागून होतं ते एक सहजीवन. एकानं दुसर्‍याच्या पोटात जाऊन होतं तेही सहजीवनच. वाघ जेव्हा शेळीला खातो तेव्हा संपूर्ण सहजीवन होतं.” त्यांनी पुढं ठामपणानं सांगितलं, ’‘न्याय वगैरे काही नाही या जगात. When the whole world is aggressive,you must be He wins half the war who aggresses- takes the defensive.

युद्धशास्त्रातलं एक महत्त्वाचं तत्त्व त्यांनी या संदर्भात सांगितले. ‘जेव्हा युद्ध अटळ आहे असं दिसतं, तेव्हा शत्रूवर आक्रमण करावं. He wins half the war who aggresses- takes the defensive.

‘संरक्षक सैन्य’ हा शब्दप्रयोगच त्यांना मान्य नव्हता. ‘’सैन्य हे आक्रमक असेल, तरच ते राष्ट्राचं संरक्षण करू शकेल,” असं ते म्हणत. भारतावर चीनचे आक्रमण होईल असा पहिला इशारा देणारे एकमेव पुढारी सावरकरच! १९५४ सालीच त्यांनी तशी गंभीर सूचना दिली होती. आठ वर्षांनंतर २० ऑक्टोबर, १९६२ ला चीनचे आक्रमण खरोखरच झाले.

स्वा. सावरकर एक सामरिकतज्ज्ञ

आजच्या जगात केवळ पंचशिलांचा मंत्र गाणारा भारत हा ‘बडे राष्ट्र’ समजला जात नाही. कारण, तुमची शिला हलकी आहे, पण त्यांच्या पंचशिला म्हणजे रणगाडे, पाणबुड्या, विमाने, तोफा आणि अणुध्वम आहेत. ‘युद्ध की बुद्ध’ या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी ‘युद्धसिद्धता’ हेच आहे.

केवळ उत्पादन वाढ व आर्थिक भरभराट ही लुटारूंना आक्रमणाचे निमंत्रण ठरेल. पण, या सुबत्तेच्या व शांततेच्या रक्षणासाठी समर्थ सैनिकी शक्ती सिद्ध असेल, तरच स्वातंत्र्यरक्षण शक्य होईल.

आधुनिक भारत युनायटेड नेशन्समध्ये शत्रूराष्ट्रांना जोडा दाखवू शकेल, असं समर्थ राष्ट्र झालं पाहिजे आणि तसं होण्यासाठीमहाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे’ असं स्वप्न पडतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच! साहित्यिकांना ‘लेखण्या मोडा, आणि बंदुका हाती घ्या..’ असं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सांगतात, त्या साहित्यिक स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वतंत्र आणि समर्थ भारत हे स्वप्न होतं.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणी सागरी सुरक्षा

दि. ४ जुलै, १९११ ला स्वा. सावरकरांच्या आगबोटीने पोर्ट ब्लेअर बंदरात शिरून नांगर टाकला. बंदिवान डोक्यावर वळकटी व हातात थाळीपाट घेऊन, कारागृहाच्या प्रवेशद्वारातून आत शिरताना भयाने कापत होते. त्यावेळी मात्र देशभक्ताची आकांक्षा, कवीची ध्येयदर्शी कल्पना आणि प्रेषिताची दूरदर्शी दृष्टी असलेले सावरकरांचे मन अंदमान-निकोबार द्वीपसमूहाचे मूल्यमापन करण्यात गुंग झाले होते. ते स्वत:शीच म्हणत होते, ”हे द्वीपसमूह म्हणजे भारताच्या पूर्व समुद्राची द्वारे आहेत. यांचा योग्य विकास केला, तर तीच स्वतंत्र भारताची नाकीबनतील. इथे प्रबळ लष्करी तळ उभारला, तर भारताच्या पूर्व किनार्‍यावर हल्ला चढविण्याची कोणा शत्रूची छाती होणार नाही.” केवढी ही अचूक भविष्यवाणी. सद्यस्थितीत तेथे भारताचा महत्त्वाचा लष्करी तळ बनला आहे. आपण येथून चीनचा मलक्का सामुद्रधुनीतून होणारा व्यापार थांबवू शकतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बांगलादेशी घुसखोरी

१९४१च्या नोव्हेंबरात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आसामचा दौरा केला. तेव्हा आसाममध्ये बांगलादेशी मुसलमानांची फार मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. या घटनेकडे जवाहरलाल नेहरूंचे लक्ष वेधले तेव्हा ते म्हणाले, “चालायचेच! निसर्गाला पोकळी सहन होत नाही.” त्यांना जाहीर सभेत उत्तर देताना स्वातंत्र्यवीर म्हणाले, “नेहरू हे तत्त्वज्ञही नाहीत, शास्त्रज्ञही नाहीत. त्यामुळे त्यांना हे माहीत नाही की निसर्गाला विषारी धूर सहन होत नाही.”

बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री फझलूल हक यांनीबंगालमध्ये बहुसंख्य असलेले मुसलमान हिंदूंना सतावतील’ अशी धमकी दिली होती.

महात्मा गांधी, नेहरूंपासून सर्वांनी आणि जनतेनेही स्वातंत्र्यवीरांकडे दुर्लक्ष केले. त्यांचे दूरदृष्टीचे धोरण अवलंबिले नाही. त्यामुळे केवळ बंगालचीच नव्हे, तर देशाची ही फाळणी झाली आणि आज पाच-सहा कोटी बांगलादेशींनी भारतात घुसखोरी केली आहे. देशभक्त नागरिकांनी सुरक्षा व्यवस्थांचे डोळे आणि कान बनून बांगलादेशी कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण घेऊन, त्यांना शोधले पाहिजे. Detect' करणे, त्यांची नावे मतदारयादीतून 'Delete'करणे o त्यांना बंग्लादेशात 'Deport' करणे हाच यावर उपाय आहे.

केवळ चर्चेच्या आश्वासनातून काही साध्य होणार नाही. बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवून, या समस्येवर समाधानकारक तोडगा काढणे हाच शांततेचा खरा मार्ग ठरेल. 2018-19च्या निवडणुकीआधी बांगलादेशी शोधा अशी मोहीम सुरू करून, सर्व राजकीय पक्षांना मोठ्या प्रमाणावर त्यांचे धोरण बदलायला लावण्याची गरज आहे. नाहीतर 2021 पूर्वी आसाम, प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी दोन बांगलादेशी विराजमान होणे आपल्याला बघावे लागेल.

स्वा. सावरकर काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे एक सामरिक, संरक्षणतज्ज्ञ

विनायक दामोदर सावरकर म्हणजेच ’स्वातंत्र्यवीर सावरकर’, भारताला मिळालेले एक रत्न, तसेच काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे क्रांतिकारक, संरक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य फक्त भारतभूमीची सेवा करण्यात खर्ची घातले. आज सावरकर हयात असते, तर त्यांनी आपल्यासमोर कोणती व्यूहरचना मांडली असती असा विचार सर्व राष्ट्रप्रेमींनी करावयास पाहिजे. सावरकरांच्या विचारांची एखादी पूजेची पोथी न बनविता तो तेजपुंज ऊर्जास्त्रोत आहे, असे मानून, त्यांच्या विचारांचा प्रकाश आपल्या हृदयांत धारण करून, आचरणांत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपणास गरज आहे सळसळणार्‍या रक्तामधील आवेशाची, नसानसातून वाहणार्‍या चैतन्य शक्तीची, पोलादी बाहूंची, लोहस्वरूप धमन्यांची. आपली महान मातृभूमी हेच आपले जागृत दैवत होय. तोच देव! सर्वत्र त्याचे हात, पाय, कर्ण आहेत. तेच दैवत सर्वत्र व्यापून राहू दे.

@@AUTHORINFO_V1@@