संघ, प्रणवदा, पोटशूळ वगैरे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018
Total Views |


 

 

कधीकाळी ज्यांनी संघाच्या नावाने बोटे मोडून, कायम त्या संघटनेचा तिरस्कार केला, त्या प्रणव मुखर्जींना संघाच्या यंदाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोप समारंभात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी रीतसर निमंत्रण दिले गेले, ते प्रणवदांनी स्वीकारले अन्‌ सर्वदूर पोटशूळ उठला... ज्या पक्षाच्या तमाम नेत्यांनी आयुष्यभर संघाचा दुस्वास केला, संघावर बंदी लादली, त्याच्या नेत्यांना अकारण कारागृहात धाडले, त्या कॉंग्रेसचे अध्वर्यू राहिलेल्या एका नेत्याने थेट संघाच्या मंचावर आसनस्थ व्हावे? छे! अनेकांसाठी आश्चर्यजनक होते, संघाचे निमंत्रणही आणि त्याचा झालेला सहर्ष स्वीकारही... पण, त्याहीपेक्षा कित्येकांच्या अस्वस्थतेला कारणीभूत ठरला प्रणव मुखर्जींचा तो निर्णय. त्यांनी संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे मान्य करणे हे जणू देशावरील सर्वात मोठे संकट असल्याचा आविर्भावात टीव्हीवर चर्चेची सत्रं सुरू झाली, सोशल मीडियावर लोक स्वत:च्या अकलेच्या निम्नस्तराचे जाहीर प्रदर्शन मांडू लागले. देशातले इतर सर्व विषय बाजूला सारून प्रणवदांच्या या निर्णयावर सर्वदूर लोक बोलू लागलेत. या निर्णयासाठी त्यांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न सुरू झाला. कसेही, काहीही करून त्यांनी त्यांच्या या निर्णयाबाबत फेरविचार करावा, यासाठी दबावतंत्राचा वापरही एव्हाना सुरू झाला आहे. यात आश्चर्य आणि दुर्दैव फक्त एवढेच की, ही तीच मंडळी आहे, जी कायम सहिष्णुतेचा धोशा उच्चरवात करीत असते. हे स्वयंघोषित शहाणे लोक तेच आहेत, जे कायम धर्मनिरपेक्षतेचे गोडवे गात असतात. संघाबाबत अस्पृश्यता पाळणारे हे तेच लोक आहेत, जे सातत्याने समानतेची भाषा बोलत असतात.
 
काही वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आहे. न्यूयॉर्कमध्ये महिलांसाठी चालणार्‍या एका वेब पत्रिकेच्या संपादिकेची प्रतिक्रिया सर्वदूर उमटली होती. भारत हा महिलांसाठी असुरक्षित देश असल्याने आपण या देशाचा पूर्वनियोजित दौरा रद्द करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यापेक्षा इस्लामाबादला जाणे आपण अधिक पसंत करू, अशी मल्लिनाथी करायलाही त्या विसरल्या नव्हत्या. पुरोगामित्वाचे बिरूद नावापुढे जोडले गेले असल्याने जमिनीपासून चार फूट उंचावरच वावरण्याची सवय त्यांना जडलेली. त्यामुळे वस्तुस्थिती खुंटीवर टांगून स्वत:च्या राजकीय विचारांची बैठक अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचे लेखनप्रयोग चाललेले असतात. स्वत:चे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अधिक मौल्यवान असल्याच्या गैरसमजात वावरताना, आपल्या लिखाणातून भारताची नाहक बदनामी झाली तरी त्यांना त्याची खंत नसते. मनात साठलेले गरळ ओकण्यात, भारतीय समाजाबद्दलचा द्वेष शब्दांतून व्यक्त करण्यात त्यांना भारी स्वारस्य...
 
संघाबाबतही अशीच स्थिती आहे. जे लोक कधीच शाखेत गेले नाहीत, ज्यांनी संघ कधी जवळून बघितला नाही, ज्यांना संघकार्य समजून घेण्याची गरज कधी जाणवली नाही, असे कित्येक लोक दूर बसून संघावर टीका करीत राहतात. कॉंग्रेस, कम्युनिस्टांचे तर काय, त्यांचा सारा उच्छाद राजकीय हितापोटी चाललाय्‌. ज्यांनी कित्येक वर्षे गांधी कुटुंबाच्या बरोबरीने कॉंग्रेस पक्षाची धुरा सांभाळली, त्या प्रणव मुखर्जींनी सारी बंधने झुगारून संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहणे, हा तर राजकीय पराभवच ना या तमाम मंडळींचा? कसा मानवेल तो पराभव त्यांना सहजासहजी? नेमकी याच्या उलट परिस्थिती संघाबाबतची आहे. ‘सब समाजको लिए साथ में आगे हैं बढते जाना’ हे गीत गाताना, सारे सूर एकदिलाने आळवले जातात. ती राजकीय नौटंकी थोडीच असते! मग संघशिक्षा वर्गातल्या भोजनाच्या पंगतीत सरसंघचालकांसह स्वयंसेवकही बसतात याचेही कुणाला अप्रूप नसते की, कुठे संकट उद्भवल्यावर मदतीला धावून गेले म्हणून बडेजावही नसतो कुणाच्याच मनात. आपण याच समाजाचा एक भाग आहोत, याची जाणीव जपत काम चाललेले सगळीकडे. संघशिक्षा वर्गाच्या समारोप समारंभाचे निमंत्रण दरवर्षी कुणाला तरी असतेच. यंदा ते भूतपूर्व राष्ट्रपतींना दिले गेले एवढेच. हो! सामान्य स्वयंसेवकांच्या लेखी ‘एवढाच’ आहे हा विषय. त्याबद्दलचे अप्रूप, आश्चर्य वगैरे संघवर्तुळाबाहेरील लोकांना.
 
प्रणवदांच्या उपस्थितीवरून सारे चर्वितचर्वण त्यांचेच चालले आहे. खरंतर, सार्‍या समाजाला संघाच्या संपर्कात आणण्यासाठी, संघ समजावून सांगण्यासाठी, गैरसमज दूर करून संघाचे वास्तविक स्वरूप त्यांच्या ध्यानात आणून देण्यासाठीचा प्रयत्न अविरत चाललाय्‌. प्रणवदांनी नागपूरच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठीचे निमंत्रण स्वीकारणे, हा त्याच प्रयत्नांना आलेल्या यशाचा एक छोटासा भाग आहे. म्हणूनच, यंदा प्रणवदांसारख्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीचा आनंद स्वयंसेवकांच्या मनात आहेच, पण त्या आनंदाला गर्वाची पुसटशीही किनार नाही. मुखर्जींचा होकार मिळवून आपण यशाचा खूप मोठा टप्पा गाठल्याचा आभिर्वाव नाही. गैरसमज नाही. भ्रम तर अजीबातच नाही. उलट, अजून भारतीय समाजातील खूप मोठा वर्ग संघाबद्दल केवळ गैरसमजच नव्हे, तर राग, द्वेष, मत्सर बाळगून आहे, तो दूर करत त्यांच्या मनातही संघाबद्दल आस्था निर्माण करण्याचे महत्कठीण कार्य भविष्यात आपल्याला करायचे असल्याची जाणीव स्वयंसेवकांच्या मनात आहे. महात्मा गांधींपासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि डॉ. झाकीर हुसैन यांच्यापासून तर जयप्रकाश नारायण यांच्यापर्यंत, अनेक मान्यवरांनी आजवर संघस्थानाला भेट दिली आहे. त्यात प्रणवदांची भरच पडणार आहे. पण संघविश्वाबाहेरील लोकांना, विशेषत: राजकारण आणि माध्यमजगतातील संघविरोधकांना याचे नेमके आश्चर्य वाटते आहे, की पोटदुखी सुरू झाली आहे त्या सर्वांना, हा खरा प्रश्न आहे.
 
पंडित नेहरूंना संघाची ताकद नाकारता कधीच आली नाही. पण संघाचे कार्य वाढणे, याचा सरळ सरळ अर्थ त्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका असल्याची जाणीव त्यांना पुरेपूर होती. त्यामुळेच संघाला ‘चिरडून’ टाकण्याची भाषा आपसूकच नेहरूंच्या तोंडी आली होती. नंतरच्या काळात त्या पक्षातील शिलेदार त्याच ताठर भूमिकेची री ओढत राहिलेत. संघ सर्वमान्य झाला, त्याची शक्ती दुणावली तर आपले अस्तित्व पणाला लागेल, याची जाण असलेल्या डाव्या विचारांच्या राजकीय पक्षांनी तर संघाला बदनाम करण्याचा विडा उचलल्यागत षडयंत्रं रचली. केरळ, बंगालात स्वयंसेवकांना जिवानिशी संपविण्याचे कारस्थान काय उगाच अंमलात येतेय्‌ इतकी वर्षे? आपल्याला न पटणार्‍या विचारांच्या माणसांचं अस्तित्वच नामशेष करण्याची त्यांची रीत कुठे अन्‌ इतकी वर्षे विरोध करणार्‍यांना प्रणवदांना, वैचारिक परिवर्तनाचे सारे प्रयत्न पणाला लावून संघाच्या मंचावर ससन्मान विराजमान करण्यासाठीचे निमंत्रण त्यांनी मनापासून स्वीकारावे इतका वैचारिक बदल त्यांच्यात घडवून येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचे सौजन्य कुठे?
 
विरोधकांना या ताकदीचीही कल्पना आहे, संघकार्याची सर्वसमावेशक पद्धतही त्यांना व्यवस्थितपणे ज्ञात आहे, निरपेक्ष भावनेने चाललेले प्रयत्न दाद देण्याजोगे असल्याबाबतही त्यांची खात्री आहे. तरीही संघ न स्वीकारणे, विरोध करीत राहणे, शिव्याशाप देणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यता आहे. लोकांमध्ये संघाबाबत भ्रम पसरविण्याचा त्यांचा उपद्व्याप तेवढ्यासाठीच चाललेला असतो. आताही, मुखर्जींनी संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यात यश कुणाचे आहे, हे ठाऊक असणार्‍यांना या घटनेचे भविष्यातील परिणामही पुरेपूर ठाऊक आहेत. हे जर असेच सुरू राहिले, संघाचे लोक याच तर्‍हेने विरोधी विचारांच्या लोकांचे मतपरिवर्तन घडविण्यात यशस्वी ठरले तर आपले काय होईल, याची चिंता ज्यांना सतावतेय्‌... सध्या जी कोल्हेकुई ऐकू येतेय्‌ ना, हा त्यांचाच पोटशूळ आहे...
 
सुनील कुहीकर
 
9881717833
 
@@AUTHORINFO_V1@@