पंतप्रधानपद नाकारलेला माजी राष्ट्रपती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2018   
Total Views |



 

भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याची राजकीय आत्मकथन सांगणारी 'The Coalition Years' , 'The Dramatic Decade : The Indira Gandhi Years', 'The Turbulent Years : 1980-1996' ही तीन पुस्तके आहेत. या लेखात त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा थोडा परिचय आपण करून घेणार आहोत. सध्या प्रणवदाचा विषय वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यावर चांगलाच गाजतो आहे. वाचकांना त्याचे कारण माहित आहे. प्रणवदाचे हे पुस्तक त्यांच्या व्यक्तित्वाची ओळख करून देणारे आहे.

प्रणवदा चाळीसहून अधिक वर्षे काँग्रेसमध्ये आहेत. तसे ते जननेते नाहीत. त्यांना सफाईदार हिंदी बोलता येत नाही. ते कुशल राजकारणी आहेत. व्यूहरचनाकार आहेत. राजकीय निर्णय घेण्यात तज्ज्ञ आहेत. बुद्धिमान आहेत. पंतप्रधानपदावर बसण्यासाठी पूर्णपणे लायक होते. पण त्यांचे पंतप्रधानपद हुकले. त्याचा किस्सा आपण पुढे बघू.

प्रणवदा यांचे पुस्तक पूर्ण वाचून काढल्यानंतर काँग्रेस पक्ष कसा चालतो, हे वाचकाला थोडेबहुत समजते. काँग्रेसमध्ये लोकशाही नाही, तर घराणेशाही आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांची मानसिकता नेहरू-गांधी घराण्याच्या वारसदाराच्या नेतृत्वाखाली काम करण्याची असते. प्रणवदा त्याला अपवाद नाहीत. त्यांनी आपल्या निष्ठा काँग्रेसला म्हणजे नेहरू-गांधी घराण्याला अपर्ण केलेल्या आहेत. १९९९ पासून काँग्रेसची सर्व सूत्रे सोनिया गांधी यांच्या हातात आली. २००४ साली काँग्रेस सरकार बनविण्याच्या स्थितीत आली. यावेळी सर्व निर्णय सोनिया गांधी करीत होत्या. पंतप्रधान कोण असावा, मंत्रिमंडळातील कोणते खाते कोणाला द्यावे, याचा निर्णय सोनिया गांधी करीत होत्या. प्रणवदा यांची इच्छा संरक्षणमंत्री बनण्याची नव्हती. सोनिया गांधींना तसे त्यांनी सांगितलेही होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या वेळी त्यांना समजले की, आपल्याकडे संरक्षण खाते देण्यात आले आहे. सोनिया गांधी हे संविधानाला अभिप्रेत नसलेले संविधानबाह्य सत्ताकेंद्र निर्माण झाले. त्यावेळेस राज्यघटनेचे काय झाले, याची चर्चा प्रणवदादेखील करीत नाहीत आणि अन्य कोणी काँग्रेसीदेखील करीत नाहीत.

प्रणवदा म्हणतात, “२००४ च्या निवडणुकीनंतर सर्वांची अशी अटकळ होती की, पंतप्रधान म्हणून माझी निवड केली जाईल. सोनिया गांधीनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला होता. माझ्याविषयी असे अनुकूल मत बनण्याविषयी कारण की, मला सरकारातील विविध खाती चालविण्याचा दांडगा अनुभव होता. मनमोहन सिंग यांना सनदी नोकरीचा अनुभव होता आणि सुधारणावादी अर्थमंत्रिपदाचा पाच वर्षाचा अनुभव होता.” परंतु, सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जी यांची निवड केली नाही, त्यांनी मनमोहन सिंग यांची निवड केली. प्रणवदा पुढे म्हणतात, “माध्यमांत चर्चा सुरू झाली की, मी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सामील होणार नाही, कारण ते मला कनिष्ठ आहेत. माझी ही मंत्रिमंडळात सामील होण्याची इच्छा नव्हती. सोनिया गांधींनी मी मंत्रिमंडळात सामील झाले पाहिजे असा आग्रह धरला.” त्यानंतर प्रणव मुखर्जी मंत्रिमंडळात सामील झाले. मला का डावलण्यात आले? यात सोनिया गांधींचा हेतू कोणता होता? मनमोहन सिंग यांना का निवडण्यात आले? या प्रश्‍नांची उत्तरे प्रणवदा देत नाहीत. मनमोहन सिंग यांना का निवडण्यात आले आणि त्यांना सोनिया गांधींनी कसे नाचविले, हे जाणण्यासाठी आपल्याला संजय बारू यांचे ’The Accidental prime minister ’ हे पुस्तक वाचायला पाहिजे.

प्रणवदा यांचे पुस्तक वाचताना सोनिया गांधींच्या जबरदस्त प्रभावाचे दर्शन सर्व पुस्तकभर होत जाते आणि एक गोष्ट लक्षात येते की, बहुतेक सगळ्या काँग्रेस नेत्यांनी एक गोष्ट मनाने मान्य केली आहे, ती म्हणजे पक्षाच्या प्रमुखपदी नेहरू-गांधी घराण्यातील एखादी व्यक्ती हवीच. त्या व्यक्तीच्या आज्ञेखालीच सर्वांनी राहायचे. तिचा निर्णय मान्य करायचा. त्याविरुद्ध शक्यतो आवाज उठवायचा नाही. प्रणवदा यांनी सोनिया गांधी यांचे नेतृत्व कसलीही खळखळ न करता मान्य केले, असे ते जरी लिहित नसले तरी विविध प्रसंगांतून हाच अर्थ काढावा लागतो.

सोनिया गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचे काम शरद पवार, पी. ए. संगमा, तारिक अन्वर, या तिघांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीतच आव्हान दिले. प्रणव मुखर्जी यांच्या भाषेत, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत पी. ए. संगमा म्हणाले, “आम्ही तुमच्याविषयी फार कमी जाणतो. तुमच्या आई-बापांविषयी आम्हाला माहिती नाही. शरद पवार संगमाचा विषय पुढे नेत म्हणाले, (सोनिया गांधींना उद्देशून) तुम्ही पक्षात ऐक्य निर्माण करून, नवचैतन्य निर्माण केलेत, परंतु तुमच्या विदेशी मूळाविषयी भाजपने जो प्रचार चालविला आहे, त्याला उत्तर देता येत नाही. याचा आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे.” यानंतर शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केली, हा इतिहास झाला.

प्रणवदांच्या पुस्तकातील सोनिया गांधी संदर्भातील ही सर्व विधाने वाचताना मनात प्रश्‍न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही की, प्रणवदांनी हा सर्व विषय आपल्या पुस्तकात का आणला? सर्व पुस्तकात सोनियांविरुद्ध एक शब्ददेखील त्यांनी लिहिलेला नाही, राजकारणी माणूस जे मनात आहे ते वेगळ्या प्रकारे व्यक्त करीत असतो. प्रणवदांनी हेच केले आहे का? असा प्रश्‍न माझ्या मनात आल्यावाचून राहिला नाही. शरद पवार यांना पंतप्रधान बनण्याची महत्त्वाकांक्षा काल होती आणि आजही आहे. १९९९ साली ते विरोधी पक्षनेते होते. संसदीय पद्धतीत विरोधी पक्षनेता पुढील पंतप्रधान असतो. तो मान सोनिया गांधी यांनी शरद पवार यांना दिला नाही. प्रणवदा या सर्व गोष्टी सांगतात. परंतु हे सांगत नाहीत की, सोनिया गांधींनी शरद पवारांना का डावलले? त्या मागची कारणे कोणती? तसा सल्‍ला त्यांना कोणी दिला? का दिला?

सोनिया गांधी यांच्या हाती सर्व सत्ता येताच तामिळनाडूच्या जयललिता यांनी कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना खोट्या खुनाच्या आरोपावरून अटक करून तुरूंगात पाठविले. हा एक जबरदस्त धक्का होता. हिंदू समाजावरील आघाताचा हा अत्यंत वाईट विषय होता. या अटक प्रकरणात सोनिया गांधींचा काही हात होता का? प्रणव मुखर्जींचा पुस्तकात याचे प्रत्यक्ष उत्तर मिळत नाही, पण पृष्ठ २०९ वर प्रणवदा लिहितात, “माझ्या रागाची परीक्षा पाहणारा प्रसंग १२ नोव्हेंबर २००४ रोजी घडला. कांची कामकोठी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना अटक करण्यात आली. सगळा देश तेव्हा दिवाळीचा पहिला दिवस साजरा करत होता. कॅबिनेट मीटिंगमध्ये मी हा प्रश्‍न उपस्थित केला. मी कठोर टीका केली आणि अटक करण्याच्या वेळेवर प्रश्‍न उपस्थित केले. मी प्रश्‍न उपस्थित केला की, सेक्युलॅरिझमचे पायाभूत विषय फक्त हिंदू साधुसंतांनाच लागू होतात काय? ईदच्या दिवशी एखाद्या मुस्लीम धर्मपंडिताला अटक करण्याची हिंमत राज्य सरकार करील का? एम. के. नारायणन तेव्हा पंतप्रधानांचे विशेष सल्‍लागार होते, त्यांनाही माझे म्हणणे पटले. मी शंकराचार्यांना जामिनावर सोडण्याच्या सूचना दिल्या.” प्रणवदांच्या या प्रांजळ वक्तव्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस ५४ जागांवर आली, याचे कारण हिंदू मतदाराने काँग्रेसकडे पाठ फिरविली. सोनियाची काँग्रेस हिंदू विरोधी आहे, हा संदेश सामान्य हिंदू माणसांपर्यंत शंकराचार्यांच्या अटकेने फार पूर्वीच नेऊन पोहचविलेला होता.

सोनिया गांधी यांचा दुसरा किस्सा असाच आहे. २०१२साली काँग्रेस पक्षाने प्रणवदा यांची राष्ट्रपती पदासाठी निवड केली. राष्ट्रपती पदासाठी आमदार आणि खासदार हेच मतदार असतात. त्यांची मते मिळविण्यासाठी उमेदवाराला वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करावा लागतो. आपल्या प्रवासासाठी प्रणवदा महाराष्ट्रात आले. शिवसेना तेव्हा भाजप युतीत होता. तरीदेखील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा जाहीर केला होता. शरद पवार यांनी प्रणव मुखर्जींना सुचविले की, त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेबांची भेट घ्यावी. काँग्रेसचे नेते इतर कोणालाही म्हणजे मुल्‍ला, मौलवी, फादर, बिशप यांना सहजपणे भेटू शकतात, परंतु हिंदू राजकीय नेत्याला, धार्मिक नेत्याला भेटण्याचा विषय आला की त्यांचा सेक्युलॅरिझम आडवा येतो.

प्रणव मुखर्जी यांनी ठाकरे यांना भेटू नये. काहीही करून ही भेट टाळावी, अशा सूचना सोनिया गांधींनी पाठविल्या. प्रणव मुखर्जींना शरद पवारांनी सांगितले की, “यावेळी जर भेट घेतली नाही, तर ठाकरे यांना आपला अपमान झाला असे वाटेल. काँग्रेसने न मागताच शिवसेनेने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. विमानतळावरून तुम्ही सरळ बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला या, मीदेखील तेथेच असेल.” प्रणव मुखर्जी लिहितात की, शरद पवारांचा सल्‍ला मी मानण्याचे ठरविले. शरद पवार काँग्रेस गठबंधनाचे सदस्य होते, त्यांना नाराज करून चालणार नव्हते. म्हणून विमानतळावरून प्रणवदा बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेले.” बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत सांगितले की, “मराठी वाघाने बंगाली वाघाला पाठिंबा देणे अगदी स्वाभाविक आहे.” सोनिया गांधी यांना ही भेट आवडली नाही. काँग्रेसच्या नेत्या गिरिजा व्यास यांच्या मार्फत त्यांनी आपली नाराजी प्रणव मुखर्जी यांच्याकडे कळविली. प्रणवजी लिहितात की, “मी त्याकडे दुर्लक्ष केले.”

प्रणव मुखर्जी देशाचे संरक्षणमंत्री असतानाच मुंबईवर पाकिस्तानचा दहशतवादी हल्‍ला झाला. हा हल्‍ला झाल्याबरोबर अमेरिकेच्या तेव्हाच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांचा प्रणव यांना दूरभाष आला. अमेरिकेला पाकिस्तानची चिंता खूप असते. हा हल्‍ला जबरदस्त होता आणि त्याला उत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर चढाई केली तर काय होईल? हा प्रश्‍न अमेरिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. प्रणव मुखर्जी कोंडोलिसा राईस यांना म्हणाले, “आमच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत. तुम्ही पाकिस्तानला आधुनिक शस्त्रे देता, पाकिस्तान त्याचा उपयोग आमच्या विरोधात करतो.” कोंडोलिसा राईस त्यावर म्हणाल्या की, “ही शस्त्रे आम्ही दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाकिस्तानला देतो.” प्रणव मुखर्जी यांनी यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला. पुस्तकातील हा सर्व किस्सा राष्ट्रीय स्वाभिमान व्यक्त करणारा आहे.

पहिल्या दर्जाच्या राजकीय नेत्याचे पुस्तक अगदी प्रांजळपणे लिहिलेले असले, तरी अनेक विषय पुरेसे स्पष्ट होत नाहीत. काही रहस्यमय गोष्टींवरील पडदा थोडा किलकिला झाल्यासारखा वाटतो, परंतु पडदा पूर्ण बाजूला सारला जात नाही. सीताराम केसरी यांना बाजूला सारून सोनिया गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा झाल्या. प्रणवदांनी हा किस्सा पुस्तकात दिला आहे, परंतु एवढ्या सहजासहजी हा बदल झालेला नाही, त्यामागे हिंदीत ज्याला ‘लंबी सोच’ म्हणतात, ते राजकारण आहे. प्रणवदा ते सांगत नाहीत. संपुआ सरकारात एका पाठोपाठ एक एक घोटाळे होत गेलेले आहेत. त्याबद्दल प्रणवदांनी मौन बाळगलेले आहे. रामदेव बाबा यांना रामलीला मैदानावरच ठार करण्याचे कारस्थान रचण्यात आले. मध्यरात्री पोलिसांनी त्यांच्या अनुयांयावर हल्‍ला केला. हे कारस्थान कुणाचे? यावर प्रणवदा काही सांगत नाहीत. अशा अनेक झाकलेल्या गोष्टी असल्या तरी भाषाशैलीच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रसंगाच्या मांडणीच्या दृष्टीने आणि इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने हे पुस्तक चांगले झालेले आहे.

- रमेश पतंगे

 
 
@@AUTHORINFO_V1@@