महापालिकेत सहजसत्ता अन्यथा ‘कॉंटे की टक्कर’!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |
 

 
 
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकत्याच केलेल्या जळगाव दौर्‍यात महापालिका निवडणुकीसाठी समविचारी पक्षांबरोबर युती करण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यांनी स्पष्टपणे कुणाचेही नाव घेणे टाळले. मनातले ओठावर येऊ दिले नाही तरीही ‘समविचारी कोण?’ हे सर्वजण जाणतात. माजी गृहनिर्माणमंत्री सुरेशदादा जैन हे भाजपसोबत घरोबा करण्यास इच्छुक आहेत. जैन हे शिवसेनेचे माजी आमदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेली खान्देश विकास आघाडी आज महापालिकेत सत्तारूढ आहे. सभागृहात भाजपचे १६ आणि महानगर विकास आघाडीचा एक सदस्य सत्ताधार्‍यांच्या विरोधात आहे तर उर्वरित राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे व जनक्रांती खाविआसोबत आहेत.
 
 
चंद्रकांतदादांचे समविचारी पक्षांबरोबर जाण्याचे संकेत हे सुरेशदादांच्या इच्छेला अनुकूल असल्याचे गृहित धरून खाविआमध्ये सत्तास्थापनेचे स्वप्नरंजन सुरू झाले आहे. राज्य पातळीवर शिवसेना आणि भाजपचे पटत नाही पण तो अडसर स्थानिक पातळीवर उद्भवणार नाही. स्थानिक राजकारण, आराखडे, प्रश्‍न गृहित धरून शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेण्याचा अधिकार सुरेशदादांवर सोपविला जाऊ शकतो. पण युती शक्य न झाल्यास खाविआने भाजपसोबत जाण्याचा पर्यायही असू शकतो का? यावरही आता खाविआचे सदस्य विचार करीत असावेत. यातून पक्षश्रेष्ठींना न दुखावताही सत्ता स्थापनेचे स्वप्न सत्यात येऊ शकते.
 
 
शहर विकासासाठी राज्यात व केंद्रात सत्ताधारी असलेल्या भाजपसोबत जाणे गरजेचे असल्याचा मतप्रवाह सुरेशदादांच्या गटात असला तरी निवडणुकीत काही जागा त्यांना मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागतील. अर्थातच, यात निवडून न येणार्‍या जागा असू शकतात किंवा ज्यांचे पंख छाटायचे आहेत असेही उमेदवार असू शकतात किंवा जागा सोडूनही अपक्ष आणि अन्य आघाडीतूनही आपल्या उमेदवारांची सोय लावून देण्याची चाल खेळली जाऊ शकते. युतीच्या बदल्यात कुणाला काय मिळेल हे येणारे दिवसच सांगतील.
 
 
महापालिकेत नवीन प्रभाग रचनेतून निवडून येणार्‍या सदस्यांचे संख्याबळ ७५ असणार आहे. भाजपने मध्यंतरी ‘मिशन ५० प्लस’चा नारा दिला होता. पण समविचारी पक्षांसोबत युती केल्यामुळे स्वबळावर ‘मिशन ५० प्लस’ कितपत शक्य होईल याची भाजपमधील निष्ठावंतांनाही शंका असणे स्वाभाविक आहे. त्यांनाही मित्रपक्षासाठी जागा सोडाव्या लागतील. युती झाल्यानंतर सत्तावाटपाचा फॉर्म्युला काय असू शकतो? महापालिकेत महापौरपद आणि स्थायी समितीचे सभापतीपद महत्त्वाचे आहे.
 
 
समजा खाविआ/शिवसेना आणि भाजप असे गणित जमले नाही तर भाजपला महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी वेगळे गणित मांडावे लागेल. राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष हे खाविआसोबत जाण्यास आतुर आहेत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने घराणेशाहीची घंटा बडवत नेत्यांच्या घरातही उमेदवारी देण्याचे जाहीर केले आहे. खाविआ, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, समाजवादी, एमआयएम भाजपच्या विरोधात रिंगणात राहतील. त्यांना फोडावे लागेल. अर्थात हे फार काही कठीण नसेल. अशावेळी सुरेशदादांपासून दुरावलेले ‘मातब्बर’ भाजपासाठी सहाय्यभूत ठरू शकतात. भाजपमधील अभ्यासूंना अजूनही वाटते की, बुथरचना आणि अचूक नियोजनावर भाजप स्वबळावर बहुमत नक्कीच मिळवू शकते. अर्थातच नेते काय निर्णय घेतात यावरच ‘सहजसत्ता अन्यथा कॉंटे की टक्कर’ अवलंबून असणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@