‘मविप्र’च्या ताब्यावरून पाटील-भोईटे गट भिडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

नूतन मराठासमोर हाणामारी, दगडफेकीची घटना

 
 
जळगाव, १९ जून :
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचा ताबा घेण्यावरून मंगळवारी पाटील आणि भोईटे गट समोरासमोर आले. त्यांच्यात जोरदार हाणामारी होऊन दगडफेकही करण्यात आली. यात भोईटे गटातील चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावावर नियंत्रण मिळविले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात दोन्ही गटांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
 
 
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचा ताबा घेण्यावरून गेल्या वर्षापासून नरेंद्र पाटील व भोईटे गटात वाद सुरू आहे. जिल्हापेठ पोलिसांनी ताबा देण्याबाबत निर्णयासाठी सीआरपीसी कलम १४५ नुसार तहसीलदारांकडे प्रस्ताव पाठविला होता. तहसीलदार निकम यांनी हा प्रस्ताव फेटाळल्याने रविवारी (दि.१७) नरेंद्र पाटील गटाने संस्थेचा ताबा घेतला. मात्र, सोमवारी (दि.१८) तहसीलदारांनी संस्थेचा ताबा कोणाकडे द्यावा याबाबत कुठलेही आदेश काढले नसल्याचे जिल्हापेठ पोलिसांना पत्राद्वारे कळविले.
 
 
या पत्रामुळे संस्थेच्या ताब्यासाठी पुन्हा एकदा मंगळवारी नरेंद्र पाटील आणि भोईटे गट समोरासमोर आले होते. सुरुवातीला पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेतल्याने वाद टळला. नंतर संस्थेच्या कार्यालयात नरेंद्र पाटील गटाचे कामकाज सुरु असतांना भोईटे गटाचे काही कार्यकर्ते याठिकाणी आल्याने भोईटे व पाटील एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या मारहाणीत जयेश बाबूराव भोईटे (वय ३०, रा. भोईटेनगर), उमेश दगडू धुमाळ (वय ४०, रा. गणेश कॉलनी), गणेश दगडू धुमाळ (वय ३४), सुनील धोंडू भोईटे (वय ५२, रा. कल्याणीनगर), अजय देवीदास विसपुते (वय ३६, रा. भोईटेनगर) हे जखमी झाले. पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला.
 
दोन्ही गटाविरूध्द गुन्हा दाखल करणार : सांगळे
या घटनेप्रकरणी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हाणामारी व दगडफेक करणार्‍या दोन्ही गटाविरूध्द तातडीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. पुन्हा वाद होवून नये यासाठी संस्थेच्या कार्यालयाबाहेर बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचे डीवायएसपी सचिन सांगळे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@