जम्मू काश्मीर येथे राजकीय भूकंप : भाजप सत्तेतून बाहेर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथे दहशतवादी कारवायांचे संकट उभे असतानाच आता आणखी एक राजकीय भूकंप आला आहे. जम्मू काश्मीर येथे आज भारतीय जनता पक्षाने पीडीपी पक्षासोबत असलेली युती तोडली आहे, तसेच भारतीय जनता पक्ष आता सत्तेतून बाहेर पडला आहे. आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी पत्रकार परिषद आयोजित करून ही माहिती दिली. जम्मू काश्मीर येथे वाढत चाललेल्या दहशतवादी कारवाया, त्याकडे मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे दुर्लक्ष आणि संपूर्ण सत्ता हातात नसल्या कारणाने आलेली बंधनं लक्षात घेता पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचे राम माधव यांनी सांगितले आहे.
 
 
 
 
 
राज्य सरकारचे प्रमुख नेतृत्व ज्यांच्या हातात आहे त्या परिस्थिती हाताळण्यास सक्षम नाही :

राज्य सरकारचे प्रमुख नेतृत्व ज्यांच्या हातात आहे, त्या परिस्थिती हाताळण्यास सक्षम नाहीयेत, अशी टीका देखील यावेळी राममाधव यांनी मेहबूबा मुफ्ती यांचे नाव न घेत केली. तसेच आम्ही त्यांच्या हेतूवर शंका घेत नाही, मात्र काश्मीर घाटीत शांतता प्रस्थापित करण्यास राज्य सरकार सक्षम नाहीये, असेही ते यावेळी म्हणाले.
 

दहशतवादी कारवाया प्रमुख कारण :

जेव्हा भारतीय जनता पक्ष पीडीपी सोबत युती करून सत्तेत आला त्यावेळी आमच्या समोर दोन प्रमुख उद्येश्य होते. पहिले उद्येश्य काश्मीरच्या घाटीत शांतता स्थापित करणे तर दुसरा उद्येश्य जम्मू काश्मीर येथील प्रमुख तीन भाग जम्मू, काश्मीर घाटी आणि लद्दाख येथे जलद गतीने विकास करणे. मात्र पीडीपी सोबत युतीकेल्यानंतर गेल्या तीन वर्षात आम्ही अनेक प्रयत्न करून देखील या उद्येशांची पूर्णत: प्राप्ती होऊ शकली नाही. केंद्र सरकारने नेहमीच मदत केली मात्र राज्य सरकारच्या नेतृत्वामुळे दहशतवादी कारवाया थांबवण्यास आम्हाला यश आले नाही, असेही ते यावेळी म्हणाले. 

 
रमजानच्या काळात शस्त्रसंधी करणे हा आमच्या मनाचा मोठेपणा होता, नाइलाज नाही :

मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी रमजानच्या काळात कोणत्याही प्रकारच्या दहशतवादविरोधी कारवाया करायचा नाही यासाठी मागणी केली होती, ती मागणी केंद्र सरकारने मान्य करत शस्त्रसंधी देखील केली. मात्र तो आमच्या मनाचा मोठेपणा होता, नाइलाज नाही. आमच्या या मोठेपणाचा फायदा दहशतवाद्यांनी आणि जम्मू काश्मील येथील हुर्रीयत सारख्या फुटीरतावादी संघटनांनी उचलला आहे. अद्यापही काश्मीर घाटीत शांतता स्थापित करता आलेली नाही, हे दुर्दैव आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
 
 
शुजात बुखारी यांच्या हत्येचा कठोर शब्दात निषेध :  
 
यावेळी राम माधव यांनी ज्येष्ठ पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येचा कठोर शब्दात निषेध व्यक्त केला. बुखारी यांची हत्या दिवसा ढवळ्या काश्मीर शहरात अत्यंत व्हीआयपी भागात करण्यात आली. यावरुन लक्षात येतं की जम्मू काश्मीर येथे माणसाच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत आहे. त्यांच्या विचारांची गळचेपी करण्यात येत आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचे हे देखील एक कारण आहे, असेही ते यावेळी म्हणाले.  
 
 

 
 
 
त्वरित राज्यपाल शासन लागू करण्यात यावे :

आता सरकार पडले असल्याने राज्यात राज्यपालांचे शासन लागू करण्यात यावे, अशी मागणी राम माधव यांनी यावेळी केली. सत्तेच असलेल्या सर्व भाजपच्या मंत्र्यांने आपले राजीनामे राज्यपालांकडे पाठवले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे पाठविला असून, आता राज्यात पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@