भारतीय रुपयाचे आणखी अवमूल्यन शक्य?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

गेल्या महिनाभरात रुपयाच्या किंमतीत झाली १३ पैशांनी वाढ!
अमेरिकन डॉलरच्या मजबुतीचा फटका बसणार भारतीय रुपयाला...

 
 
प्रति डॉलर ६९ रुपयांपर्यंत अवमूल्यन होणे शक्य
चीनच्या धमकीमुळे क्रूडच्या भावात घट
गेल्या महिनाभरात प्रति डॉलर ६७ रुपये ७७ पैशांवरुन ६७ रुपये ६४ पैशांपर्यंत भारतीय रुपयाचे उर्ध्वमूल्यन झालेले असले तरी आगामी काळात रुपया आणखी घसरणार असल्याचे भाकित तज्ञांनी केले आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणेच्या पार्श्‍वभूमिवर अमेरिकन फेडरल बँक या वर्षात आणखी दोनदा व्याजदर वाढविणार असल्याने त्याचा परिणाम डॉलर मजबूत तर येत्या जुलैैअखेर रुपया रुपया कमकुवत होण्यावर होईल असे तज्ञांना वाटत आहे. त्यामुळे आयातीचा खर्च व व्यापार तूटही वाढणार आहे.
 
अमेरिकेच्या बॉण्ड यील्डमध्येही गेल्या तीन वर्षात झालेली मोठी वाढ, कच्च्या खनिज तेला(क्रूड)च्या सतत वाढत्या किंमती व त्यामुळे त्याच्या आयातीवरील वाढता खर्च आणि विदेशी गुंतवणुकदारांकडून मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यात येत असलेली भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूक यासह अनेक घटक रुपयाच्या घसरणीला कारणीभूत आहेत. क्रूडच्या आयातीत गेल्या एप्रिल २०१७ मधील आयातीच्या तुलनेत ४१.४५ टक्क्यांनी वाढ होऊन ती १० अब्ज ४० कोटी डॉलर्स इतकी झालेली आहे. तसेच भारतीय शेअर बाजारातील ५३७ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक काढून घेण्यात आली आहे.
 
 
चलनफुगवट्या(इन्फ्लेशन) चा मुकाबला करण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने गेल्या चार वर्षात प्रथमच व्याजदर ०.२५ टक्क्यांनी वाढविले आहेत. नवे दर आता ६.२५ टक्के इतके झाले आहेत. तसेच नाणे धोरणविषयक तटस्थ भूमिका घेत बँकेच्या नाणेधोरणा वरील समितीने २०१८ च्या पहिल्या सहामाहीत ग्राहक किंमत निर्देशांक ४.८ ते ४.९ टक्के तर दुसर्‍या सहामाहीत ४.७ टक्के इतका राहण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.
 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवरील घटकही भारतीय रुपयाला अनुकूल नाहीत. याचे कारण म्हणजे अमेरिकन डॉलर निर्देशांकात झालेली सुमारे दोन टक्के वाढ होय. अमेरिकेतील चलनफुगवटाही फेडरलच्या २०१८ मधील दोन टक्क्यांच्या अंदाजाच्याही वरच राहिलेला आहे. याबरोबरच अमेरिकेतील नोकर्‍यांच्या संख्येत गेल्या वर्षी(२०१७)च्या जानेवारी ते जून या सहामाहीतील प्रतिमाह १ लाख ७७ हजारांनी वाढीच्या तुलनेत या वर्षी(२०१८)च्या याच कालावधीतील १ लाख ९१ हजारांपर्यंत वाढ नोंदवली गेली आहे.
 
 
या सर्व कारणांमुळे भारतीय रुपया येत्या जुलैैअखेरीपर्यंत प्रति डॉलर ६९ रुपयांपर्यंत गडगडण्या ची भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र याच काळात क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत मोठी घट झाल्यास भारताला थोडा दिलासा मिळू शकतो. तशीच घटना आज सोमवारी घडली असून अमेरिकेच्या टेक्सास इंटरमिजिएट क्रूडची किंमत प्रति पिंपामागे १.९ टक्क्यां(१ डॉलर २२ सेंट्स)नी घटून ६३ डॉलर्स ८४ सेंट्स इतकी झाली आहे. याचे कारण म्हणजे अमेरिका व चीनदरम्यान व्यापारी युद्धा(ट्रेड वॉर)चा परिणाम होय. चीनने अमेरिकन क्रूडच्या आयातीवर शुल्क लावण्याची धमकी दिली आहे.
 
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी चीनसह आपल्या भागीदार देशांशी असलेली वाढती विदेशी व्यापारी तूट (ट्रेड डेफिसीट) पाहता गेल्याच आठवड्यात चीनमधून येत्या ६ जुलैपासून होणार्‍या आयातीवर ५० अब्ज डॉलर्सचे शुल्क लादणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ब्रेण्ड क्रूडसह सर्व प्रकारच्या क्रूडच्या आंतरराष्ट्रीय किंमती घसरलेल्या आहेत. ब्रेण्टची किंमत ७९ सेंट्नी म्हणजे १.१ टक्क्यांनी कमी होऊन ती आता ७२ डॉलर्स ६५ सेंट्स इतकी झाली आहे. रशिया आणि सौदी अरेबिया या क्रूडच्या सर्वात मोठ्या पुरवठादार देशांकडून कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविले जाणार असल्याच्या वृत्तांमुळे त्याचे भाव घसरले आहेत.
 
 
येत्या २२ जून रोजी पेट्रोलियम निर्यातदार देशां (ओपेक)ची महत्वपूर्ण बैठक होणार असून तीत क्रूडचे उत्पादन वाढविण्यात येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. पण हे उत्पादन किती प्रमाणात व केव्हापासून वाढविण्यात येईल हे मात्र अजून अनिश्‍चितच आहे. भारताला मात्र या क्रूड उत्पादन वाढीचा कितपत लाभ व्यापार तुट कमी करण्याच्या दृष्टिने होतो ते या बैठकीतील निर्णयानंतरच समजणार आहे.
दिवसभरातील चढउतारात निर्देशांकांमध्ये घट
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज सोमवारी शेअर बाजारातील चढउतारांत निर्देशांकांमध्ये घट झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) शुक्रवारच्या बंद ३५ हजार ६२२ बिंदूंवरुन आज सकाळी ३५ हजार ६९८ बिंदूंवर उघडून ३५ हजार ५१८ बिंदूंच्या खालच्या तर ३५ हजार ७२१ बिंदूंच्या वरच्या पातळीवर जाऊन दिवसअखेरीस ७३ बिंदूंनी घटून ३५ हजार ५४८ बिंदूंवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निदर्र्ेशांक (निफ्टी)देखील मागील बंद १० हजार ८१७ बिंदूंवरुन सकाळी १० हजार ८३० बिंदूंवर उघडून १० हजार ८३० बिंदूंच्या उच्च तर १० हजार ७८७ बिंदूंच्या खालच्या पातळीपर्यंत जात दिवसअखेरीस १७ बिंदूंनी कमी होऊन १० हजार ७९९ बिंदूंवर बंद झाला.
 
@@AUTHORINFO_V1@@