महड गावात जेवणातून विषबाधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |



खोपोली : खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील एका घरातील वास्तूशांती सोहळ्याचे जेवण केल्याने शंभर लोकांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. सुभाष माने (माळी) यांनी महडच्या गावठाणमध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तूशांतीचे सोमवारी आयोजन केले होते. रात्री नऊपर्यंत जेवणे सुरू होती. साधारणतः २५० लोकांचे जेवण बनविले होते. त्यापैकी १०० एक लोकांचे जेवण बाकी होते. रात्री अकराच्या सुमारास माने यांची मुलगी आणि पत्नी यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने खोपोलीतील डॉ. रणजीत मोहिते यांच्या पार्वती रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे महड गावात हाहाकार उडाला होता. महड, साजगाव, देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध रूग्णालयामध्येे दाखल होऊ लागली, परंतु एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विषबाधा झालेली असल्याने त्यांना तातडीने मोठ्या रूग्णालयामध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ. रणजीत मोहिते यांनी पार्वती रूग्णालयामध्ये जवळजवळ सारेच रूग्ण तपासून प्रथमोपचार केले व जे अत्यावस्थ होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व रूग्णांवर इलाज करणे शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्तरित्या आपत्तीवर मात करण्याचा प्रयत्न केला. साधारण १५ ते १६ गंभीर रुग्णांची नाजूक परिस्थितीतून सुटका करून त्यांना पनवेल येथील एमजीएम डी. वाय. पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफलाईन, प्राची, उन्नती, सायन या रूग्णालयामध्येे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या विषबाधेमुळे कल्याणी शिंगोले (७) ऋषिकेश शिंदे (१२) प्रगती शिंदे (१३) या तीन लहानग्यांचा दुर्दैवी अंत झाला.

 

प्रभारी तहसीलदार पुरुषोत्तम थोरात, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, देवन्हावेचे सरपंच अंकित साखरे, सदस्य संदेश चौधरी, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी’ या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला. शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्ययंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उर्वरित सर्व जेवण सीलबंद करून पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रांत परदेशी यांनी पनवेल व इतरत्र दाखल केलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्न केले.

 

या दुर्दैवी घटनेनंतर मंगळवारी सकाळी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी अभय यावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी व इतर शासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वास्तूशांती झालेल्या घराची व तेथे स्वयंपाक केलेल्या व्यवस्थेची सखोल पाहणी केली. त्यानंतर खोपोलीतील विविध रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची पाहणी करून उपचार व्यवस्थेसंबंधी संबंधित डॉक्टर्सबरोबर चर्चा केली.

 

पाहणी केल्यावर अभय यावलकर यांनी, विषबाधा झालेल्या अन्नपदार्थांचे नमुने अन्न व औषधी विभागाकडे तसेच फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगितले. स्वयंपाक शिजवला त्या ठिकाणचे पाण्यासाठी वापरलेल्या २०० लिटरचे प्लास्टिक पिंप व इतर साहित्य चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगून स्वयंपाक करणारी संबंधित व्यक्ती व इतर सर्व संबंधितांचीही पोलीस यंत्रणा सखोल चौकशी करीत असल्याची माहिती दिली. विषबाधा कशामुळे झाली याबाबत अंतिम माहिती अन्न व औषधी विभाग तसेच फॉरेन्सिक लॅबकडील अहवाल प्राप्त झाल्यावर मिळणार असल्याने त्यानंतर या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मृत्यु पावलेल्यांबाबत संवेदना व शोक व्यक्त करून संबंधित सर्व रुग्णांवरील उपचारांसाठीचा खर्च व इतर आर्थिक मदतीबाबत लवकरच शासनाकडून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

@@AUTHORINFO_V1@@