पारावरच्या गमजा आणि गप्पा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |




“मराठी माणसाच्या थडग्यावर तुमचे इमले उभे राहणार असतील तर ते पाडून टाकू,” असे उद्धवजी म्हणाले. बीकेसीच्या दिशेने उभा राहिलेला ‘मातोश्री २’ नोटाबंदीच्या काळातही झपाट्याने उभा राहिला. त्याचे मजले चढले ते जीएसटीच्याच काळात. आता मराठी माणसाच्या थडग्यावर कोणाचे इमले उभे राहिले ते २०१९च्या आधी करून दाखविलेले असेलच.

 

एखादी समस्या सोडवायची नसली आणि पारावरच आपल्याला तिच्यावर गप्पा हाणायच्या असल्या की मग काहीही बोलले तरी चालते. शिवसेनेचा कालचा मेळावा तसाच होता. नुसत्या वळवाच्या पावसाने गेल्या आठवड्यात मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडालेली असताना त्याच मुंबईत ‘मुंबई आमची आणि महापौर आमचाच’ असा दावा करणाऱ्या पक्षाचे पक्षप्रमुख काय काय दावे करू शकतात ते काल उभ्या महाराष्ट्राने पाहिले. काश्मीर काय? पाकिस्तान काय? शेतकरी काय? काय वाट्टेल ते उद्धव ठाकरे बरळले. एरव्ही बरळण्याचे काम शिवसेनेने संजय राऊतांकडे दिले आहेच. मात्र, कालचा दिवस खास उद्धव ठाकरेंचाच होता. जे उद्धव ठाकरे बोलू शकत नाहीत, ते काम संजय राऊत करीत असतात. काल संजय राऊत जे लिहू शकत नाहीत, ते उद्धव ठाकरेंनी ‘बोलून दाखविले.’ बाकी उद्धव ठाकरेंचे भाषण आणि त्यातली विधाने खासच होती. शिवसेनेच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते असणे साहजिकच आहे, कारण सत्तेत राहून विरोधी पक्षात असल्यासारखा वागणारा दुसरा पक्ष जगात कुठेही झालेला नाही. शिवसेनेला सत्तेचे सोन्याचे ताट हवे आहे. विधानसभेच्या निवडणुकांच्या त्यांच्या सगळ्याच भाषणांत त्यांनी या ताटाचा उल्लेख केला होता. भाजपने युती तोडल्याने हे सत्तेचे ताट गेले, असा कांगावा ते करीत होते. आता मुळात लोकांनीच यांना सत्तेच्या सोन्याच्या ताटामागे आजपर्यंत ताटकळत उभे ठेवले आहे, त्याला भाजप काय करणार?

 

इंदिरा गांधींचे सरकार जाऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले होते. मतभेद तेव्हाही होते. लोकशाहीत ते असणारही; मात्र त्या मंडळींनी सत्ता सोडली आणि आपापला मार्ग स्वीकारला. आजचा भाजपही तेव्हा तिथे होताच. शिवसेना तर त्याहूनही बत्तर निघाली. रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची भाषा उद्धव ठाकरेंनी केली आहे. खिशातल्या राजीनाम्यांवर लोकांनी विनोद करायचे सोडून दिले, पण अजूनही शिवसेनेचे मंत्री ठोंब्यासारखे मंत्रालयात आहेतच. सिरीयल्स रटाळ झाल्यात, सिनेमाही फारसे चालत नाहीत, त्यामुळे ‘मातोश्री’वरून चाललेला हा ‘बिग बॉस’ लोक आता मनोरंजनाचे उत्तम माध्यम म्हणून पाहू लागले आहेत. आपल्या मताला काहीतरी जबरदस्त राजकीय महत्त्व आहे, हे उद्धव ठाकरेंना वाटते ते या ‘बिग बॉस’च्या टीआरपीमुळे. अमित शाह यांंनी दिलेल्या ‘ऑफर’चा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला. तो किती खरा, किती खोटा हे तेच स्वत:च जाणोत. पण, आपल्याला ‘ऑफर’ येतात, हे सांगायला जे लागते ते मात्र उद्धव ठाकरेंनी मोकळेपणे सांगितले. उद्धव ठाकरेंनी पक्षाची सूत्रे ताब्यात घेतल्यानंतर अशा ‘ऑफर’वरच शिवसेना चालत आली आहे.

 

प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या तेव्हा मराठीचा मुद्दा उचलून प्रतिभाताईंच्या पदराला माती लागू नये म्हणून शिवसेना कार्याध्यक्षांच्या आदेशानुसार कार्यरत झाली होती. प्रतिभाताईंनंतर प्रणव मुखर्जींच्या वेळी कोणी काय ‘ऑफर’ दिली होती आणि त्या बदल्यात काय मिळाले, हे आता उद्धवजींनी तितक्या निधड्या छातीने सांगून टाकावे. ५२ वर्षे शिवसेनेने, शिवसैनिकांनी खस्ता खाल्ल्या हे खरेच, पण तुम्ही काय केले? त्यांच्या निष्ठांची सौदेबाजीच केली. सेनेचे लढवय्ये नेते हळूहळू बाहेर काढले. मान्य न होणारा योगायोग असा की, या मेळाव्यापूर्वी पैठणी वाटप कार्यक्रमाचे प्रमुख असलेल्या ‘वहिनीफेम’ आदेश बांदेकरांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला. आता जिथे जिथे बांदेकरांना सेनेने जबाबदारी दिली, तिथे त्यांना पैठणी वाटपाव्यतिरिक्त कुठल्याही कार्यक्रमात कसलेही यश मिळालेले नाही. दादरसारख्या सेनेच्या बालेकिल्ल्यातूनही हे महाशय पराभूत झाले, पण ५२ वर्षे खस्ता खाणारे सैनिक खाली आणि बांदेकर व्यासपीठावर उद्धवजींसमोर हे चित्र बरेच बोलके होते. बाळासाहेबांच्या काळापासून सेनेवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना यातून काय संदेश मिळाला ते शिवसैनिकांनाच ठाऊक!

 

पवारांच्या ‘पगडी’ प्रकरणावर उद्धवजींनी टीका केली, हे उत्तमच. पण, पवारांची तिसरी आघाडी कोणती? हा जो काही प्रश्न विचारला, त्याचे उत्तर खुद्द त्यांनाच माहीत आहे. इथे शिवसेना जसे सत्तेत असून नसल्याचे नाटक करते, तसेच नाटक केजरीवाल दिल्लीत करत असतात. काही करता आले तर ‘करून दाखविले’ आणि काहीच करू शकले नाही की ‘ते भाजपमुळे...’ असा या जुळ्या जायफळांचा शिरस्ता. केजरीवालांच्या या नौटंकीला पाठिंबा द्यायला जे महाभाग पोहोचले होते, तीच पवारांची संभाव्य तिसरी आघाडी. मात्र, खुळ्यांच्या जत्रेत येडे, असा तो प्रकार असल्याने अद्याप ती जमलेली नाही आणि पवारांनाही अजून त्यातली खिचडी जमल्याचा अंदाज आलेला नाही. या सगळ्या प्रकरणातला ताजा कलम शिवसेनेचा केजरीवालांना पाठिंबा हाच होता. त्यामुळे उद्योग संधी मिळाली तर शिवसेना या येड्यांच्या जत्रेत सहभागी होणार, यात शंका नाही. पण, कुमारस्वामी, ममता, हिंदूद्वेष्टा पिनराई विजयन ही सगळी मंडळी किमान आपल्या बाण्यावर तरी ताठ आहेत. आपल्या सत्तेचेच मुखत्यार आहेत. सेनेच्या बाबतीत तर सगळाच सावळा गोंधळ. राज ठाकरेंच्या फोडीव नगरसेवकांच्या संख्याबळावर सेनेची दारोमदार आहे. “भाजप वांझोटी स्वप्ने दाखविते आणि लादते,” असे उद्धवजी म्हणाले. वस्तुत: मागील लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचा जो काही पाळणा हलला तो मोदींचेच नाव वापरून! पण, एकदा का कानात वारे शिरले की शिंगरू कसे वागते त्याचा नमुना काल उद्धवजींनी दाखविला.

 

“मराठी माणसाच्या थडग्यावर तुमचे इमले उभे राहणार असतील तर ते पाडून टाकू,” असे उद्धवजी म्हणाले. वस्तुत: मराठी माणासाला एककलमी गंडविण्याचे काम ठाकरे बंधुंचेच. बीकेसीच्या दिशेने दार उघडणारा उभा राहिलेला ‘मातोश्री २’ नोटाबंदीच्या काळातही झपाट्याने उभा राहिला. त्याचे मजले चढले ते जीएसटीच्याच काळात. आता मराठी माणसाच्या थडग्यावर कोणाचे इमले उभे राहिले ते २०१९च्या आधी ‘करून दाखविलेले’ असेलच. कोकणचा मुद्दा त्यांनी काढला, हे बरेच झाले. मतांची भीक मागायला जाणारी शिवसेना कोकणसाठी काय भरीव केले, याची ग्वाही कधीच देऊ शकत नाही. लहानमोठ्या जुन्या कढींना ऊत आणण्याचे कामही उद्धवजींनी केले खरे, पण त्यात काही दम नव्हता. तेच ते भाषण ऐकून पेंग आवरणारे शिवसैनिक हेच या मेळाव्याचे खरे चित्र होते.

@@AUTHORINFO_V1@@