नगरसेवकांचीही लागणार बायोमेट्रिक हजेरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |
 

प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी
लवकर गेल्यास तासानुसार भत्त्यामध्ये कपात

 
 
  
 
मुंबई : मुंबई महानगरपालिका सभागृह सुरु झाल्यानंतर काही नगरसेवक काही वेळ बसून आणि मस्टरवर सही करून निघून जातात. केवळ सही केली तरी त्यांना दिवसभराचा भत्ता लागू होतो. पण आता नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. या निणर्यामुळे दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे.
 
पालिका सभागृहात महत्वाच्या विषयांवर चर्चा करून मंजुरी घेतली जाते. विकास कामे व अनेक धोरणात्मक निर्णय़ येथे घेतले जातात. यावेळी निर्णय घेताना नगरसेवकांची उपस्थिती महत्वाची ठरते. सभागृहात अनेक वेळा महत्त्वाचे प्रस्ताव, ठराव मंजूर केले जातात. यासाठी नगरसेवकांची पुरेशी संख्या असणे गरजेचे आहे. मात्र अनेक नगरसेवक सभागृहाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. सभागृहाच्या बैठकीस केवळ हजेरीची स्वाक्षरी करण्यापुरते उपस्थित राहणाऱ्या नगरसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महत्त्वाच्या प्रस्तावांच्या मंजुरीसाठी व्हिप काढावा लागत आहे. त्यामुळे अशा उशिरा येऊन लवकर पळ काढणाऱ्या नगरसेवकांना वेसण लावण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती.
 
या मागणीला गटनेत्यांच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याने आता दांडीबहाद्दर नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. बायोमेट्रिक यंत्रणा महापालिका सभागृहाच्या दरवाज्यांवर लावली जाणार आहे. तेथे सीसीटिव्ही कॅमेराही बसवला जाणार आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे नगरसेवकांना सभागृहात प्रवेश करतेवेळी व जाताना हजेरी बंधनकारक राहणार आहे. तसे न केल्यास अशा नगरसेवकांच्या तासानुसार त्यांच्या त्या दिवसाच्या भत्त्यात कपात केली जाणार आहे. मात्र यावर सविस्तर प्रस्ताव आणून ठरवले जाणार आहे. त्यानंतर भत्त्यात किती कपात करणार किंवा अजून काय़ शिक्षा असणार याबाबत लवकरच ठरवून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@