मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर माथाडी कामगारांचे उपोषण मागे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |




मुंबई : माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाशी संबंधित असलेल्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याच्या व त्याबाबतच्या अधिसूचना त्वरित काढण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सोमवार दि. १८ जून २०१८ पासून आझाद मैदान, मुंबई येथे सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले.

माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत हे आदेश दिलेले आहेत. बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सह पोलीस आयुक्त देवेन भारती, कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम, सह कामगार आयुक्त (माथाडी), लाखस्वार, सहायक कामगार आयुक्त वि. रा. जाधव, विविध माथाडी बोर्डाचे अधिकारी, माथाडी कामगार नेते आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, आ. शशिकांत शिंदे, सेक्रेटरी व पीआरओ पोपटराव देशमुख आणि नऊ कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

माथाडी कामगारांच्या मागण्या मान्य करताना वडाळा व चेंबूर येथील जमिनीवर माथाडी कामगारांची घरकुल योजना तातडीने होण्यासाठी सुनावणी घेऊन कायदेशीर बाबी पूर्ण करण्याच्या आणि जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने करण्याचे मान्य करण्यात आले. माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळे आणून बेकायदेशीर कामे करणार्‍यांवर पोलीस यंत्रणेकडून कडक कारवाई करण्याचे व खर्‍या माथाडी कामगारांना हक्काचे काम करण्यास संरक्षण देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला दिल्या. नाशिक, कोल्हापूर, लातूर, पुणे व कळंबोली येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची सोडवणूक करण्याचे निर्णय घेतले, त्याबद्दल मुख्यमंत्री व शासनाचे माथाडी कामगार नेत्यांनी आभार व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@