बदलापूर पालिकेत सभापती निवडणुका बिनविरोध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |



भाजप पुन्हा सत्तेत सहभागी

बदलापूर: मागील वर्षी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून तणाव निर्माण झाल्याने सेना-भाजप यांची तुटलेली युती सभापती निवडणुकीत पुन्हा एकत्र आल्याचे पाहावयास मिळाले. बदलापूर पालिकेच्या मंगळवारी पार पडलेल्या विषय समिती निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेला चार तर भाजपला एक सभापती व एक उपसभापतीपद मिळाले आहे.

स्थायी समितीवर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे या दोन माजी नगराध्यक्षांची निवड करण्यात आली असल्याने यंदाची स्थायी समिती मजबूत झाली आहे. निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

बदलापूर पालिका विषय समिती सभापती निवडणूक उल्हासनगरचे उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी त्यांना सहकार्य केले. या निवडणुकीत सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या आरती जयप्रकाश टांकसाळकर, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील, नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी शिवसेनेचे तुकाराम म्हात्रे, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी शिवसेनेच्या निलिमा पाटील, पाणीपुरवठा व मलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या प्रमिला पाटील, तर महिला बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी भाजपच्या वैशाली प्रदीप गीते यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सदस्यपदी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे, शिवसेनेचे अरुण सुरवळ आणि भाजपचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांची निवड करण्यात आली. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत शिवसेना भाजपा युती नाही. चुरशीची निवडणूक होत आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आज पार पडलेल्या पालिकेच्या विषय समितीच्या निवडणुकीत शिवसेना- भाजप युती झालेली आहे. शहर विकासासाठी शिवसेना-भाजप एकत्र आल्याने शहरातील विकासकामे वेगाने होतील, असा विश्वास शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@