मॅसिडोनिया - नावात काय आहे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018   
Total Views |

 

 
अशीच एक लढाई तब्बल २७ वर्षांनी थांबण्याची चिन्हं दिसत आहेत. हा देश आहे मॅसिडोनिया आणि त्याचा वाद आहे शेजारी ग्रीसशी. सीमांवरून नाही तर देशाच्या नावावरून. १७ जूनला ग्रीसच्या उत्तर सीमेवर ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस त्सिपारास आणि मॅसिडोनियाचे पंतप्रधान झोरान झाइएव यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅसिडोनिया हा देश भविष्यात रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसिडोनिया म्हणून ओळखला जाईल.

 

“नावात काय आहे? गुलाबाला आपण दुसरे कोणतेही नाव दिले, तरी त्याचा सुवास तितकाच छान येणार,” असे विल्यम शेक्सपिअरने आपल्या रोमिओ अँड ज्युलिएट या नाटकात म्हटले होते, पण वास्तवात तसे होताना दिसत नाही. उत्तर प्रदेश सरकारने सरकारी दस्तावेजांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव बी. आर. आंबेडकरऐवजी भीमराव रामजी आंबेडकर असे लिहावे असा आदेश काढला असता त्यावर अकारण मोठा वाद झाला. पाकिस्तानसारख्या पुरुषप्रधान देशात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल यांना आपल्या वडिलांच्या झरदारी या आडनावाआधी आजोबांचे भुत्तो हे आडनाव लावावे लागते. भारतातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याची परिस्थिती तर याही पलिकडची आहे. महात्मा गांधींचे पणतू असलेल्या श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी एका पत्राद्वारे राहुल गांधींना सुनावले आहे की, ‘’स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी गांधी नावाचा उपयोग थांबवा. तुम्ही काही गांधी कुटुंबातील नाही. भारतीय लोकांना तुम्ही खूप वर्षं मूर्ख बनवले आहे. आता हे थांबवा.” आज हा विषय काढायचे कारण की, नावांवरून लढाई केवळ स्थानिकच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर, अगदी दोन देशांमध्येही चाललेली दिसते. अशीच एक लढाई तब्बल २७ वर्षांनी थांबण्याची चिन्हं दिसत आहेत. हा देश आहे मॅसिडोनिया आणि त्याचा वाद आहे शेजारी ग्रीसशी. सीमांवरून नाही तर देशाच्या नावावरून. १७ जूनला ग्रीसच्या उत्तर सीमेवर ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सिस त्सिपारास आणि मॅसिडोनियाचे पंतप्रधान झोरान झाइएव यांच्या उपस्थितीत झालेल्या करारानुसार फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅसिडोनिया हा देश भविष्यात रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसिडोनिया म्हणून ओळखला जाईल. दोन्ही देशांतील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता ते साध्य होईलच याची काहीही शाश्वती नाही.
 

प्राचीन ग्रीक संस्कृतीला मोठा इतिहास आहे. सुमारे २३५० वर्षांपूर्वी मॅसिडोनियाच्या प्रदेशातील राजा फिलिप्सने ग्रीसमधील विविध नागरी प्रजासत्ताकांचा पराभव करून तो प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला. त्याचा मुलगा ‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणजेच सिकंदर याने या साम्राज्याचा विस्तार थेट भारताच्या पश्चिम सीमांपर्यंत पोहोचवला. कालांतराने रोमन लोकांनी ग्रीक साम्राज्याचा पराभव केला. ग्रीक संस्कृती लयास गेली असली तरी आजही पाश्चिमात्य संस्कृतीचा मानबिंदू म्हणून ग्रीक संस्कृतीकडे बघितले जाते. रोमन साम्राज्याच्या पतनानंतर बायझेंटिन, स्लाविक, ओटोमन तुर्क अशा अनेक साम्राज्यांनी पादाक्रांत केलेला हा प्रदेश दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीस आणि युगोस्लाविया या देशांत वाटला गेला. शीतयुद्ध समाप्त होत असताना युगोस्लावियाचे पाच तुकडे पडले. पूर्वी ग्रीक साम्राज्याच्या मॅसिडोनियाचा भाग असलेला तुकडा १९९१ साली फुटून स्वतंत्र झाल्यावर त्यांनी आपल्या देशाचे नाव ‘रिपब्लिक ऑफ मॅसिडोनिया’ असे ठेवले. मॅसिडोनिया हा ग्रीसच्या उत्तर भागातील प्रांत असून मॅसिडोनिया हे नाव जर त्या देशास दिले तर भविष्यात तो ग्रीसचा मॅसिडोनिया हा प्रांत गिळंकृत करेल, तसेच ग्रीसच्या संस्कृतीवर दावा सांगेल, असा आरोप करत ग्रीसने संयुक्त राष्ट्रांत मॅसिडोनियाचे नाव अडवून धरले. संयुक्त राष्ट्रांनी १९९३ मध्ये त्या देशाचे ‘फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅसिडोनिया’ असे तात्पुरते नाव मंजूर केले. याच कारणास्तव नंतर ग्रीसने मॅसिडोनियाचा युरोपीय महासंघ आणि नेटोमधील प्रवेश स्वतःचा नकाराधिकार वापरून रोखून धरला. ग्रीसचा दावा अतिशयोक्तीपूर्ण आहे कारण ग्रीसच्या १ कोटी लोकसंख्येच्या तुलनेत मॅसिडोनियाची लोकसंख्या केवळ २० लाख आहेत. चहूबाजूंनी भूप्रदेशाने वेढलेल्या या प्रदेशाची युद्ध करण्याची क्षमता मर्यादित आहे. पण दुसरीकडे मॅसिडोनियानेही काही कमी कुरापती काढल्या नाहीत. स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनीही प्राचीन ग्रीसच्या झेंड्यावरील सूर्याचा आपल्या झेंड्यात समावेश केला. ग्रीसने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर त्यांनी राजधानी स्कोपयेमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ, महत्त्वाचे महामार्ग, मोठे चौक, बागा, मैदानं आणि सार्वजनिक इमारतींना सम्राट फिलिप्स, अलेक्झांडर, त्याची आई ऑलिम्पिया यांची तसेच अन्य प्राचीन ग्रीक नावं द्यायला सुरुवात केली. या हव्यासापायी मॅसिडोनियाच्या डोक्यावर कर्जाचा डोलारा वाढला. ग्रीसच्या बाबतीतही तीच गोष्ट घडली. लोकतंत्रांच्या जन्मभूमीत आधुनिक लोकशाही पद्धत रुजण्यासाठी विसाव्या शतकाचा उत्तरार्ध उजाडावा लागला. विनासायास युरोपीय महासंघाचा भाग झाल्याने ग्रीसला ऋण काढून सण साजरे करायची सवय लागली. कर्जाचा डोलारा पेलेनासा झालेला ग्रीस गेली १० वर्षं दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. नावासाठी असलेल्या अकारण वादामुळे ग्रीस आणि मॅसिडोनिया रशियाच्या हातची प्यादी बनू शकतील, या चिंतेपोटी अमेरिका आणि युरोपीय देशांनी त्यांच्यावर शांतता प्रक्रियेसाठी दबाव टाकायला सुरुवात केली.

 

सध्या दोन्ही देशांत डाव्या विचारांच्या हातात सत्ता आहे. जगभरात अन्य ठिकाणच्या डाव्या पक्षांप्रमाणेच त्यांनाही प्राचीन संस्कृतीशी असलेली नाळ तोडून टाकण्यात जास्त रस असल्यामुळे त्यांच्याही हे सोयीचे होते. मॅसिडोनियाने जानेवारी २०१८ मध्ये स्कोपयेचा आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच उत्तर-दक्षिण महामार्गाच्या नावातून ‘अलेक्झांडर द ग्रेट’ हे शब्द हटवले. मे महिन्यात युरोपीय महासंघाच्या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांचे पंतप्रधान एकमेकांना भेटले. गेल्या मंगळवारी टेलिफोनवरील प्रदीर्घ चर्चेनंतर दोघा पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. २८ जूनला होणाऱ्या युरोपीय महासंघाच्या बैठकीपूर्वी मॅसिडोनिया याबाबत ठराव करून त्याला संसदेची मंजुरी घेणार आहे. त्यानंतर ग्रीस युरोपीय महासंघाकडे आपला मॅसिडोनियाला महासंघात घ्यायला विरोध नसल्याचे पत्र देणार आहे. तशाच प्रकारचे ना हरकत पत्र ग्रीस नेटोलाही देणार आहे. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरच्या सुमारास मॅसिडोनिया या ठरावावर सार्वमत घेणार असून जनतेने कौल दिल्यास देशाच्या घटनेत बदल करून अधिकृतरित्या ते ‘रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅसिडोनिया’ असे करण्यात येणार आहे. मॅसिडोनियाचे राष्ट्रपती जॉर्ज इवानोव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या करण्यास नकार दिला आहे. अर्थात संसदेने पुन्हा विचार करायला सांगितल्यास त्यांना स्वाक्षऱ्या कराव्या लागतील. दुसरीकडे ग्रीसमध्येही या निर्णयाला विरोध करण्यासाठी महत्त्वाच्या शहरांत मोर्चे निघू लागले आहेत. सध्याच्या मॅसिडोनियात राहाणारे लोक खरे मॅसिडोनियन नसून वंशाने स्लाव आणि अल्बानियन आहेत, असा त्यांचा आक्षेप असून त्यात तथ्यही आहे. पण तीच परिस्थिती थोड्याफार प्रमाणात आधुनिक ग्रीसलाही लागू पडते. भारताच्या फाळणीतही पंजाब आणि बंगाल या प्रांतांचे विभाजन झाले, पण फक्त आमच्याकडील प्रदेशालाच पंजाब किंवा बंगाल म्हटले जावे, असे काही झाले नाही. कालांतराने पूर्व बंगालचा बांग्लादेश झाला तर २०१६ साली पश्चिम बंगालच्या विधानमंडळानेही ठराव करून आपल्या नावातील पश्चिम हा शब्द काढून त्याला स्टेट ऑफ बेंगॉल किंवा बांग्ला असे नाव केले. या ठरवाला काँग्रेस, भाजप तसेच कम्युनिस्ट पक्षांनी विरोध केल्यामुळे हा ठराव एकमताने मंजूर होऊ शकला नाही. तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्याबद्दल थयथयाट केला होता. असं म्हणतात की, ज्या देशांचे भविष्य उज्ज्वल असते ते आपला इतिहास विसरत नाहीत आणि ज्यांचं भवितव्य अंधःकारमय असते ते इतिहासातील रम्य आठवणींतून बाहेर पडू शकत नाहीत. ग्रीस आणि मॅसिडोनिया या दोन्ही देशांची स्थिती या प्रकारात मोडते.

@@AUTHORINFO_V1@@