महड गावात जेवणाच्या विषबाधेतून ३ बालकांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jun-2018
Total Views |

 

 
 
 
अनेकजण अत्यवस्थ

खोपोली : खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील सुभाष माने (माळी) यांनी महडच्या गावठाण मध्ये बांधलेल्या नवीन घराच्या वास्तू शांतीचे सोमवारी आयोजन केले होते. दुपारी दीड वाजणाच्या सुमारास जेवण तयार झाले. दुपारी दीड नंतर पंगती बसायला सुरूवात झाली. रात्री नऊ पर्यंत जेवणे सुरु होती. साधारणता २५० लोकांचे जेवण बनविले होते त्यापैकी १०० एक लोकांचे जेवण बाकी होते.

रात्री अकरा वाजताचे सुमारास माने यांची मुलगी आणि पत्नी यांना उलट्या व जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने खोपोलीतील डॉ. रणजीत मोहिते यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. त्या दरम्यान महड गावात हाहाकार उडाला होता. महड, साजगाव , देवन्हावे, खोपोली येथून वास्तूशांतीसाठी गेलेली पाहुणे मंडळी एकामागून एक अशी खोपोलीतील विविध हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ लागली. परंतु एकंदर परिस्थिती पाहता सर्वांनाच विष बाधा झालेली असल्याने त्यांना तातडीने मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे गरजेचे होते. डॉ.रणजीत मोहिते यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सारेच पेशंट तपासून प्रथोमपचार केले व जे अत्यव्यस्थ होते त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु मध्यरात्री सर्व पेशंटवर इलाज करणे शक्य नसल्याने खोपोलीतील सर्व डॉक्टर्स त्या ठिकाणी एकत्र आले आणि संयुक्त रित्या आपत्ती वर मात करण्याचा प्रयत्न केला. साधारण १५ ते १६ गंभीर रुग्णांची नाजूक परिस्थितीतून सुटका करून त्यांना पनवेल येथील एमजीएम डी वाय पाटील, अष्टविनायक, गांधी, लाइफ लाईन, प्राची, उन्नती, सायन या हॉस्पिटल मध्ये पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. या विषबाधेमुळे कल्याणी शिंगोले (७) ऋषिकेश शिंदे (१२) प्रगती शिंदे (१३) या तीन लहानग्याचा दुर्दैवी अंत झाला.

प्रभारी तहसीलदार पुरूषोत्तम थोरात, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, उप नगराध्यक्ष राजू गायकवाड, देवन्हावेचे सरपंच अंकित साखरे, सदस्य संदेश चौधरी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि खोपोलीतील सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे या संकटाचा सामना केला. शल्य चिकीत्सक डॉ अजित गवळी यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने उर्वरित सर्व जेवण सीलबंद करून पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रांत परदेशी यांनी पनवेल व इतरत्र दाखल केलेल्या रुग्णाच्या उपचारासाठी प्रयत्न केले.

@@AUTHORINFO_V1@@