नागालँडमध्ये जवानांवर दहशतवादी हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

दोन जवान शहीद, चार जखमी 



मोन (नागालँड) : नागालँडमधील मोन जिल्ह्यामध्ये तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या आसाम रायफल्सवर दहशतवाद्यांकडून घात लावून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत. नागालँडमध्ये सक्रीय असलेल्या नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-के) या फुटीरतावादी संघटनेनी हा हल्ला केल्याचा दावा लष्कराने केला आहे. दरम्यान या हल्लेखोरांचा शोध घेतला जात असून जखमी जवानांवर देखील उपचार सुरु आहेत.


भारत-म्यानमार सीमेजवळ असलेल्या मोन जिल्ह्यात अबोई गावाजवळ हा हल्ला झाला. लष्कराच्या मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर जवान पिण्याची पाणी जमा करण्यासाठी म्हणून गेले असताना, याठिकाणी दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामधून सावरत असतानाच दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले. यानंतर हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या.



दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांपैकी दोन जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच शहीद झालेल्या जवानांची माहिती देखील लष्कराकडून जारी करण्यात आली असून यामध्ये हवालदार फतेह सिंग नेगी आणि शिपाई एच. कोनयाक हे दोघे शहीद झाले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@