श्री संत मुक्ताई पालखीचे आज प्रस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानाने श्रीगणेशा

 
 
मुक्ताईनगर :
सुमारे ३०९ वर्षांची अखंड परंपरा असलेल्या आषाढी वारीसाठी श्री संत मुक्ताबाई पालखीचे सोमवार, १८ जून रोजी श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथून सकाळी १० वाजता प्रस्थान होत आहे. संत मुक्ताबाई पालखी सोहळा सर्वात जास्त अंतराचा प्रवास असल्याने सर्वात आधी प्रस्थान करतो मात्र यंदा अधिकमासामुळे उशिराने प्रस्थान होत आहे. संस्थानकडून पूर्व तयारी करण्यात आली असून राज्यभरातील वारकरी मुक्ताईनगर दाखल होत आहेत.
 
 
आषाढी वारीत ‘निर्मल वारी संकल्पना’
यंदाच्या वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आषाढीवारीमध्ये ‘निर्मल वारी हरीत वारी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यात महाराष्ट्रातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव महाराज, श्री संत निवृत्तीनाथ महाराज, श्री संत एकनाथ महाराज व मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई या मानाच्या प्रमुख पालखी सोहळ्यातील दिंड्याना ‘निर्मल वारी, हरित वारी’ अभियानांतर्गत पुरस्कार देण्यात येणार आहे. शासकीय निवड समिती सदस्य शिवाजीराव मोरे, प्रकाश बुवा जवंजाळ, माधवी निगडे, सुर्यकांत भिसे हे अभियानांचा शुभारंभ मुक्ताईनगरातून करणार आहेत.
 
 
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोख पुरस्कार देऊन होणार गौरव
अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेले पालखी सोहळे दिवसेंदिवस मोठे होत असून तरुणांचा सहभाग वाढत आहे. असे सोहळे अधिक स्वच्छ, निरोगी, निरामय राखणे त्याचे पावित्र्य राखणे, प्लास्टिकमुक्ती, वृक्षसंवर्ध व स्त्री भ्रृणहत्या या संवेदनशील विषयावर काम करणारे दिंड्याना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरला रोख पुरस्कार देवून गौरवण्यात येईल.
 
आ.एकनाथराव खडसे आणि परिवाराची उपस्थिती
सोमवारी श्री क्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथून सकाळी १० वाजता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, महानंदच्या अध्यक्षा मंदाताई तसेच खासदार रक्षाताई खडसे आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे आणि परिवार उपस्थिती देणार आहे.
 
सकाळी किर्तनाने प्रारंभ
सोमवार, १८ रोजी प्रस्थान सोहळ्यापूर्वी सकाळी सात वाजता हभप.किशोर महाराज, तळवेलकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. सकाळी नऊ वाजता ‘निर्मल वारी हरित वारी’ अभियानांतर्गत शुभारंभ कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता पादूका पूजन, भजन, आरती होवून प्रस्थान होईल. भाविकांनी हजारोंच्या संख्येने प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानची अध्यक्ष ऍड.स रवींद्र पाटील सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी केले, असे उद्धव जुनारे कळवितात.
 
@@AUTHORINFO_V1@@