नव्या ठाण्याचा चेहरा बदलणारा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



अनेक धोरणात्मक बदल करणे आवश्यक : पाटणकर

ठाणे: नागरीकरणाच्या वेगात अनेक शहरांचा विकास हा नियोजनबद्ध होऊ शकला नाही. अनधिकृत बांधकामे, झोपडपट्ट्या, काही ठिकाणी झालेली अतिक्रमणे अशामुळे नियोजनबद्ध शहराच्या दिशेने वाटचाल करण्यास अडचणी भासत होत्या. आघाडी सरकारच्या काळात क्‍लस्टरचा अर्थात समूह विकासाचा विषय रेंगाळत राहिला. युती सरकारच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय ऐरणीवर घेत क्‍लस्टरच्या विषयाला गती दिली.

ठाणे महापालिकेने इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार करून शासनाकडून क्लस्टरच्या अधिसूचनेस मंजुरी मिळवली आहे. या अधिसूचनेनुसार महापालिकेने अर्बन रिन्युअल प्लान अर्थात सुधारित नागरी आराखडा तयार केला आहे. त्याआधारे हरकती व सूचना मागवून ठाणेकरांना क्लस्टरचे स्वप्न साकार होण्यासाठी आता वेगाने पावले उचलली जात आहेत. मूळच्या गाव, गावठाणातील रहिवाशांवर क्लस्टर योजनेमुळे अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी तेथील विषयाला स्थगिती दिली आहे.

क्लस्टरच्या निमित्ताने अनेकांना अधिकृत आणि सोयीसुविधांनी युक्त घर तसेच परिसरात राहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याचबरोबर नियोजनबद्ध पद्धतीने विकास होणार असल्याने सार्वजनिक सुविधांवरील ताण देखील या निमित्ताने कमी होणार आहे. ठाणे शहरात क्लस्टर योजना ४३ सेक्टरमध्ये राबवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ती पाच सेक्टरमध्ये राबवली जाईल. त्याअंतर्गत तब्बल २३ टक्के जागा विकसित केली जाईल. ठाणे शहरात सध्या पाच हजार ९०३ हेक्टर जमीन विकासासाठी उपलब्ध आहे. नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत त्यातील एक हजार २९१ हेक्टर जमिनीवर क्लस्टर प्रस्तावित आहे. २३ टक्के शहरातील जागा विकसित झाल्यास ठाण्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक सुविधा उपलब्ध होतील. यात क्रीडा, सांस्कृतिक, सुरक्षा, दळणवळण, प्रत्येक समाजाची केंद्रे, महिला बचतगटांसाठी स्वतंत्र जागा, समाजाच्या सर्व दैनंदिन गरजा पुरवणारे कम्युनिटी सेंटर, सिटी सेंटर, टाऊन सेंटरची सुविधा यांचा समावेश आहे. या योजनेत ३०० चौरस फुटांपर्यंत मोफत घर मिळेल. त्यानंतर बाजारभावानुसार जागा विकत घ्यावी लागणार आहे.

योगायोगाने नगरविकास आणि महसूल, एमआयडीसी आणि वन विभाग या चार महत्त्वाच्या विभागांच्या ताब्यात बहुतांशी जमीन असल्याने तसेच या चारही विभागांत चांगले समन्वय असल्याने भविष्यात क्‍लस्टरच्या विषयात काम करताना गतिमान निर्णयप्रक्रिया राबविण्यास मदत होणार आहे. अडीच एकर जमीन सलग विकासासाठी मिळण्यासाठी थोडी अडचण निर्माण होणार असली तरी या अडचणींवरदेखील मात करण्याच्या दृष्टीने प्रशासन तयारी करीत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीने एकेकाळी क्लस्टरचा विषय आम्ही मार्गी लावू, असे म्हणून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असताना आता मात्र केवळ राजकारणासाठी क्लस्टर योजना कशी चुकीची आहे, हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. नागरिक मात्र क्लस्टरच्या योजनेच्या अंमलबजावणीची वाट पाहात आहे.

गावठाणांना क्लस्टर योजनेत स्थगिती देण्यात आली आहे, ती गरजेची होती, कारण महापालिका होण्यापूर्वी ज्यांची घरं होती, त्यांना न्याय मिळायला हवा. समूह विकास योजना राबवायची झाल्यास लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची गरज आहे. केवळ अधिकारी स्तरावर ही योजना रेटायचा प्रयत्न केला तर जागोजागी जे प्रश्न उभे राहतात ते सोडविण्यासाठी अधिकार्‍यांसोबत लोकप्रतिनिधी असतील तर ही योजना अधिक प्रभावीपणे राबविता येईल. यासाठी एक स्वतंत्र कमिटी बनवायला हवी, अशी भूमिका सेनेचे नरेश म्हस्के, सभागृहनेते, ठामपा ठाणे, शिवसेना ठाणे शहर जिल्हाप्रमुख यांनी व्यक्त केली.

दरम्यान, समूह विकास योजना यायला हवी, असे वातावरण लोकांमध्ये जोर पकडत होते. अनधिकृतपणाचा शिक्का पुसला जावा, झोपडपट्टीतून पक्क्या घरात जावे किंवा धोकादायक इमारतीतून सुरक्षित निवार्‍याच्या ठिकाणी जावे यासाठी नागरिकांच्या आशा समूह विकास योजनेतून पल्लवित झाल्या खर्‍या मात्र ठाण्यातील क्लस्टर योजना जी मुख्यमंत्र्यांना अपेक्षित आहे, तशी राबविली जाईलच की नाही, अशी शंका वाटते. जे क्लस्टर प्रस्तावित करण्यात आले ते बहुतांशी काही वजनदार स्थानिक नेत्यांच्या सूचनेनुसार प्रशासनाकडून बनविण्यात आले आहेत की काय अशी शंका घेण्यास जागा आहे. ४४ क्लस्टरला मान्यता देत असताना प्रत्यक्षात केवळ ५ क्लस्टरचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट न्यायालयाला सादर करण्यात आला आहे. एमआयडीसीची जागा असूनही त्यांचा ना हरकत परवाना घेतलेला नाही. समूह विकास योजना ही कल्पना चांगली असली तरी आणि मुख्यमंत्र्यांचा उद्देश चांगला असला तरी स्थानिक स्तरावर ती राबविताना मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील क्लस्टर साकारण्यासाठी या योजनेत अनेक धोरणात्मक बदल करावे लागणार आहेत; अन्यथा क्लस्टर योजना ही अजून एक भ्रष्टाचाराचे अड्डे निर्माण करेल की काय अशी भीती वाटते, असे मत भाजपचे गटनेते मिलिंद पाटणकर यांनी व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@