मतदानासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

विभागीय आयुक्त राजाराम माने यांची माहिती

 
 
धुळे :
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेस छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक आहे. त्यानुसार मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित कर्मचार्‍यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने यांनी येथे दिले.
 
 
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०१८ चा आढावा घेण्यासाठी शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे (निवडणूक), उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), तहसीलदार अमोल मोरे (धुळे), संदीप भोसले (साक्री), सुदाम महाजन (शिंदखेडा), प्रशांत पाटील (शिरपूर), रोहिदास वारुडे (दोंडाईचा), शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे (माध्यमिक) यांच्यासह मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित होते.
 
 
निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त माने यांनी सांगितले, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदानासाठी छायाचित्र असलेले ओळखपत्र आवश्यक आहे. मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असणार आहे. मतदानासाठी शिक्षक मतदारांना नैमित्तिक सुटी मिळणार आहे. याबाबतची माहिती शिक्षणाधिकारी यांनी शैक्षणिक संस्थांना द्यावी. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी माने यांनी निवडणूक प्रशिक्षण, मतपेटी, मतपत्रिका, मतदान कर्मचारी प्रशिक्षण आदींचा सविस्तर आढावा घेतला.
 
 
उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. त्यांनी सांगितले, निवडणुकीची घोषणा झाल्यावर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हास्तरावर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर फिरती पथके गठित करण्यात आली आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात साक्री, शिंदखेडा येथे प्रत्येकी दोन, शिरपूर येथे तीन, तर धुळे येथे पाच मतदान केंद्र असतील. यासाठी एकूण मतदारांची संख्या ८२५६ एवढी आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या ६६२९, तर स्त्री मतदारांची संख्या १६२७ असल्याचे उपजिल्हाधिकारी हुलवळे यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@