नाशिक-पुण्याच्या कंपन्या करणार मुंबईच्या प्लास्टिकचे विघटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



मुंबई: मुंबईत येत्या २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या ठोस अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये दुकानदारांसह ग्राहकांकडून आढळून आलेले प्लास्टिक जप्त करण्यात येणार आहे. या जमा होणार्‍या प्लास्टिकच्या विघटनाचे काम नाशिक, पुणे येथील कंपन्यांना दिले जाणार आहे. या कंपन्यांशी पालिकेने चर्चा केली असून लवकरच या कंपन्यांना कामे दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंबंधीच्या सूचना राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. प्लास्टिक व थर्माकोलसारख्या अविघटनशील वस्तूंचे (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसूचना, २०१८ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेने ठोस उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांना संकलनाचे काम दिले जाणार आहे. त्यानुसार नाशिक, पुणे येथील दोन कंपन्यांनी पालिकेकडे संपर्क साधला असून त्यांची ई निविदाद्वारे निवड केली जाणार आहे. दरम्यान, “एक किलो कचर्‍यामागे पालिकेला किती रुपये मिळणार हे अद्याप निश्चित झाले नसून येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल,” असे पालिका उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी सांगितले. येत्या २३ जूनपासून प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार होता. ग्राहक किंवा दुकानदारांकडे प्लास्टिक आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून ते जमा केले जाणार आहेत. पालिकेने सर्वसामान्य ग्राहकांची दंडाची रक्कम २०० रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका विधी समितीकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला असून समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दिल्यास दोनशे रुपये दंड आकारला जाईल; अन्यथा पाच हजार दंड पालिकेला वसूल करावाच लागेल, अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे

मुंबईत ६८ ठिकाणी प्लास्टिक संकलन केंद्रे पालिकेने कार्यान्वित केली आहेत. येथे आतापर्यंत १ .४२ लाख किलो प्लास्टिक जमा झाले असून वांद्रे येथे सर्वाधिक ३० हजार ४६० किलो प्लास्टिक जमा झाले आहे. यात प्लास्टिक पिशव्या, प्लेट, कप आणि कटोर्‍यांचा समावेश आहे.

@@AUTHORINFO_V1@@