नंदुरबार नगरपालिकेत २०० कोटींचा अपहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

भाजपा गटनेते डॉ.रविंद्र चौधरी यांचा पत्रपरिषदेत आरोप

 
नंदुरबार, १८ जून :
शासनाच्या विविध योजनांच्या निधीतून नंदुरबार नगरपालिकेत २०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते डॉ. रवींद्र चौधरी यांनी पत्रपरिषदेत केला. यावेळी खा.डॉ. हिना गावित, नंदुरबार नगरपालिकेतील विरोधीपक्ष गटनेते ऍड.चारुदत्त कळवंदकर, भाजपा शहराध्यक्ष मोहन खानवाणी, नगरसेवक आनंदा माळी उपस्थित होते. पत्रपरिषदेत डॉ.चौधरी यांनी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा चांगलाच समाचार घेतला.
 
 
यासंदर्भात डॉ.चौधरी यंानी माहिती देतांना सांगितले की, नगरपालिकेच्या प्रत्येक विभागात अपहार झाला असून गटनेते ऍड.चारुदत्त यांनी अपहाराच्या पुराव्यांसह तक्रार केली आहे. या तक्रारीला संलग्न लेखापरीक्षणाची कागदपत्रेसुध्दा जोडली आहेत. २००५ ते २०१८ दरम्यान शासनाच्या योजनांमध्ये झालेल्या या गैरप्रकारातील रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत वसुलीचे निर्देश लेखापरीक्षणात देण्यात आले होते, पण तसे झाले नाही. पालिकेने अनेक वर्षांपासून केवळ ४ ते ५ कंत्राटदारांनाच नियमित कंत्राट दिले आहे.
 
 
२००५ ला शासनाने राज्यातील सर्व नगरपरिषदांना विकास कसा करावा याचे निर्देश व निकष दिले होते. त्यात रस्ते, गटार, पथदिवे, पाणीपुरवठा आदींचा समावेश होता. २००५ ते २०१८ या कालखंडात शहरात १४३ ले-आऊट मंजूर करण्यात आले. त्याला परिपूर्ण सुविधा देणे ले-आऊटधारकाचे काम असते. त्या ले-आऊटमध्ये परिपूर्ण सुविधा (रस्ते, गटार, पथदिवे, पाणीपुरवठा) यासाठी शासन पैसे खर्च करत नसते. परंतु अशाही ले-आऊटमध्ये आमदार निधीतून खर्च करीत सुविधा करण्यात आल्या. ४२ ले-आऊटमध्ये न.पा.ने पैसे खर्च करुन सुविधा निर्माण केल्या. त्यावर लेखा परीक्षणात ताशेरे ओढण्यात आले आहेत. ले-आऊटधारकाकडून या सुविधा अपेक्षित असताना नगरपालिकेने तेथे निधी का खर्च केला असा प्रश्‍न पडतो. शहरात भूमीगत गटारांचे काम १२ वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु पालिकेने कंंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले नाही किंवा त्याच्यावर कारवाईही केली नाही. अशाप्रकारे पालिकेच्या विविध विभागात शासकीय योजनांमध्ये २०० कोटींचा अपहार झाला असून तशी तक्रार पुराव्यांसह केल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
 
 
विविध कारणांनी नंदुरबार नगरपालिका गाजत असून २०० कोटींच्या या अपहाराच्या आरोपांमुळे डॉ.रवींद्र चौधरी यांनी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर निशाणा साधला आहे. या आरोपांबाबत आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबई येथे असून आरोपांबाबत अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@