इंग्रजी माध्यमाकडून तब्बल दीड हजार विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळातील शिक्षणाचा दर्जा वाढवून विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी सुरू असलेल्या अभियानात प्रत्येक तालुक्यात दोन हजार असे एकूण तीस हजार विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत वळविण्याचे उद्दिष्ट असून त्यातील सुमारे दीड हजार मुले यंदा चक्क इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून मराठी जिल्हा परिषदेच्या शाळेत येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वैशाली झणकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. याबाबत यंदाची आकडेवारी अद्याप हाती यायची आहे. जुलैमध्ये याबाबत अधिक स्पष्टता येईल, मात्र, प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषद शाळांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या नाशिक जिल्ह्यातील एकट्या चांदवड तालुक्यातल्याच विद्यार्थ्यांची संख्या ६२० इतकी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळा वरवरच्या देखाव्यापेक्षा शिक्षणावर लक्ष केंद्रित करतात. प्रशिक्षित शिक्षक, शालेय पोषण आहार, संगणकीकरण, गणवेश, पाठ्यपुस्तकांचं विद्यार्थ्यांना वाटप यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेशाचा कल वाढला आहे, असे आढळून आले. “खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी होणारा खर्च, आई अशिक्षित असेल तर घरी मुलांना इंग्रजी भाषेत शिकवताना येणाऱ्या अडचणी, त्यासाठी वेगळ्या शिकवण्यांचा भुर्दंड, मुख्य म्हणजे मुलांनाच शिकण्यात येणाऱ्या अडचणी ही कारणं त्यामागे असू शकतात. मातृभाषेत शिकणारे मूल शिकताना पटकन आकलन करतं, विचार करायला लागते, ही विचारप्रक्रिया दीर्घकाळ शिक्षणासाठी अधिक उपयोगी असते,” असे मत वैशाली झणकर यांनी मांडले.

 

याबाबत माहिती देताना गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण म्हणाले, “विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांकडं कसे वळतील यासाठी ‘लेट्स स्पीक’ हा उपक्रम राबविला जात आहे. पहिली ते चौथीच्या मुलांना इंग्रजी संभाषण करता यावे म्हणून हा उपक्रम आहे. तसेच आमच्या शाळा डिजिटल झाल्याने मध्यमवर्गीय पालकही आता जि.प.च्या शाळेला प्राधान्य देत आहेत, ही निश्चितच आनंदाची बाब आहे.” जिल्हा परिषदेच्या शाळांनी मुलांची संख्या वाढावी म्हणून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव, पहिलं पाऊल, शाब्बास गुरुजी, शालेय पोषण आहार, प्रत्येक वर्गाला संगणक आणि इंग्रजी संभाषण कौशल्य हे ते उपक्रम आहेत. त्यामुळे निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. भावी काळ मराठी शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुवर्णकाळ ठरेल, अशी आशा आहे.

 

चांदवड तालुक्यातील भोयेगाव येथील शाळेची ‘ओजस’ या आंतरराष्ट्रीय पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या उपक्रमासाठी निवड झाली आहे. ‘ओजस’अंतर्गत महाराष्ट्रभरात तेरा शाळांची निवड झाली असून त्यात भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सहा शाळांमधून ही निवड करण्यात आली. येथे शिकवणाऱ्या शिक्षकांना एआयएबी शिक्षण विद्याप्राधिकरण येथे प्रशिक्षण दिले जाते. भाषांबरोबर इतर विषय वेगळ्या पद्धतीने विकसित करण्यासाठीचा हा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. उदा. मराठीमध्ये सांगितलेले छोटं वाक्य मुले इंग्रजी भाषेत कसे तयार करतील, विज्ञानाचे वेगळे प्रयोग असे अनेक अभिनव प्रयोग केले जात आहेत. भोयेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती आहेर आहेत.

 

दर्जा सुधारल्याने यश

 

ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे पालकांना वाटू लागले आहे , ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे काही पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचा दर्जा इंग्रजी शाळांपेक्षा अधिक ठेवल्यास मराठी माध्यमांकडे कल वाढेल आणि पालकांनादेखील परवडणाऱ्या खर्चात दर्जेदार शिक्षण मिळू शकेल.

वैशाली झणकर, शिक्षणाधिकारी, जि.प. नाशिक

 

भारतीय शिक्षण मंडळाचे प्रांताध्यक्ष महेश दाबक यांच्या विचारांना पुष्टी

भारतीय शिक्षण मंडळाची राष्ट्रीय बैठक कालच मुक्त विद्यापीठात पार पडली. यावेळी मंडळाचे प्रांत अध्यक्ष महेश दाबक यांनी मुक्त चर्चेत मराठी माध्यमांना चांगले दिवस येतील, हे एक चक्र असून मराठी माध्यमांनी चांगल्या सुविधा दिल्यास प्रवेशाकडे कल वाढेल,असे आवर्जून सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यास या घटनेमुळे पुष्टी मिळाली आहे.

@@AUTHORINFO_V1@@