काश्मिरी हिंदूंसाठी आशेचा किरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



 
खिरा भवानीची यात्रा हिंदूंसाठी पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न उत्तमच मानावा लागेल. आस्तेकदम या पद्धतीनेच या विषयात पुढे जावे लागेल.
 

२८ वर्षांपूर्वी ज्या काश्मिरी हिंदूंना आपले सर्वस्व सोडून आपली कर्मभूमी सोडावी लागली होती, त्यांच्यासाठी आता आशेचा किरण निर्माण झाला आहे. ‘खीर भवानी’ ही जम्मूतील हिंदूंचे श्रद्धास्थान मानली जाते. आता ‘खीर भवानी’चे मंदिर बंदोबस्तात असले तरीही तिथे पूर्वीसारखा लोकांचा राबता नाही. त्याचे मुख्य कारण इथे राबविला गेलेला वंशविच्छेद होय. हा कुणाचा होता, हे पुन्हा पुन्हा सांगावे लागते याचे मुख्य कारण आपल्या देशातले दुटप्पी विचारवंत आणि माध्यमवीर. ‘सेक्युलॅरिझम’च्या नावाखाली आपल्या देशात अनेक गोेष्टी गृहीत धरल्या गेल्या आणि तितक्याच गोष्टी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये म्हणून दडपल्या गेल्या. या सगळ्याचे बळी ठरले ते म्हणजे हिंदू. काश्मिरी हिंदूंची जमात तर छद्म सेक्युलरांच्या दृष्टीने सगळ्यात पापी असावी, कारण त्यांच्या वेदनांना कुणाच्याही पुस्तकांमध्ये, लेखांमध्ये, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादर केल्या जाणाऱ्या शोधनिबंधांमध्ये स्थान नाही. तेलासाठी अमेरिकेने कसे दहशतवादी उभे केले आणि मुसलमानांना कसे दहशतवादी बनविले गेले, यावर प्रवचन झोडणारे लोक काश्मिरी हिंदूंचे साधे स्मरणही करीत नाहीत. आपल्याच देशातले, आपल्याच भवतालचे हे लोक आपली सुसंपन्न स्थिती सोडून विपन्नावस्थेचे आयुष्य जगण्यासाठी कोणामुळे कारणीभूत ठरले, याचे रोखठोक विश्लेषण करण्याचे धाडस आपल्याकडे अद्याप कुणाकडेही नाही. गाझा पट्टीत काही घडले तर मुंब्र्यात मोर्चे काढणारे काश्मिरी हिंदूंच्या बाबतीत कसे दृष्टीहीन होतात, ते आपण पाहिलेच आहे. लांगूलचालनाचा हा रोग इतका भयंकर आहे आणि तो भयंकर फक्त आणि फक्त हिंदूंसाठीच आहे. त्याचे कारण त्याचे परिणाम फक्त हिंदूंना भोगावे लागतात.

 

१४ सप्टेंबर १९८९ साली भाजपचे प्रदेशाध्यक्ष टिक्कू लाल टप्पू यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर जम्मू-काश्मीर लिबरेशनचा म्होरक्या मकबुल भट याला शिक्षा सुनावणारे नीलकंठ गंजू यांचीही हत्या करण्यात आली. यानंतर हिंदूंच्या संहाराचा जो काही सिलसिला सुरू झाला तो गंभीर होता. इतका गंभीर की, १९ जानेवारी १९९० रोजी तब्बल तीन लाख काश्मिरी हिंदूंना आपले घरदार सोडावे लागले. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील हिंदूंची जी काही स्थिती झाली होती, तशीच काहीशी स्थिती या मंडळींची झाली. याचा परिणाम म्हणजेच घाटीतील अनेकांनी या मंडळींची घरे आणि मालमत्ता ताब्यात घेतल्या. आजही अशी काही घरे त्या भागात आहेत, जी पाहिली की त्यात राहणारे लोक ही घरे बांधू किंवा विकत घेऊ शकत नाहीत, हे लक्षात येते. मुळात जम्मू-काश्मीरमध्ये आज जे काही सुरू आहे, ते पाहिले की काश्मिरी हिंदूंच्याच काय, पण मुस्लिमांच्या हिताचेही काही तिथे सुरू आहे, असे म्हणायला वाव नाही. फुटीरवादी नेत्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अव्यवस्थेच्या शिळ्या कढीला दिलेली धर्माची फोडणी कशी काम करते, हे आज जम्मू-काश्मीरकडे पाहिल्यावर कळते. खरेतर काश्मिरी हिंदूच्या विरोधात ज्यांना उभे केले गेले, त्यांचाही उत्तम वापरच केला गेला.

 

नॅशनल कॉन्फरन्स असो किंवा अन्य कुठलाही पक्ष, ही मंडळी नेहमी दुहेरी राजकारण खेळत असतात. दिल्लीत कुणाचेही सरकार असो, या मंडळींना त्याच्या मनासारखे उद्योग करायला मोकळीक दिली की लोकशाही आपले पुरखे, भारतीयता याचे गुणगान करायला लागतात. मात्र, जसे ‘दिल्ली’ यांचे ऐकेनासे होते, तसे ही मंडळी आपला फणा काढून कामाला लागतात. ‘आम्हाला अन्य मार्गावर जायला मजबूर करू नका,’ अशा आशयाची लिहिलेली पत्रेच जगमोहन यांच्या ‘धुमसते बर्फ’ या पुस्तकात दिली आहेत. हा ‘दुसरा मार्ग’ कोणता, तर पाकिस्तानात जाण्याचा. आता जिथे राज्यव्यवस्था कोणती, हे माहीत नाही, देशाचा प्रमुख कोण हा प्रश्न आपापसात सोडविला जात नाही, पंतप्रधान भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पदच्युत केला जातो, अशा देशात यांना आपल्या काश्मिरी समर्थकांसह जायचे आहे. खरं तर यांना भारतातच राहायचे आहे, पण स्वत:च्या अटींवर. मूळ काश्मिरी युवक अंधारात राहाणे यांच्यासाठी सोईचे आहे. जुने सगळे जागतिक संदर्भ आता बदलले आहेत. मात्र, अद्याप काश्मिरी युवकाला त्याची जाण होऊ न देणे, हेच सध्याच्या फुटीरवादी नेत्यांचे काम आहे.

 

८०च्या दशकात खलिस्तानवादी चळवळ जोरात होती. इतकी की, या चळवळीने इंदिरा गांधींचा बळी घेतला. फुटीरतावादी चळवळीतून आपण काहीही साधू शकतो, असा विश्वास त्यावेळी काश्मिरी फुटीरवाद्यांना आला होता. अफगाणिस्तानात उभे राहणारे दहशतवादी या मंडळींना आपले ‘हिरो’ वाटत होते. इस्लाम हे जनमानस असून तेच राष्ट्र आहे, असा समज मुस्लीम फुटीरतावादी तरुणांच्या मनात पूर्णपणे रुजविण्यात या मंडळींना यश आल्याने हे सगळे ताबूत नाचवून एक विशिष्ट मुस्लीम जनमानस एका विशिष्ट वर्गात निर्माण केले गेले आहे. लादेनसारख्यांचा खात्मा करून अमेरिकेने ज्या प्रकारे ‘अल-कायदा’ खिळखिळी केली, त्याचा धक्का नाही म्हटला तरी या मंडळींना लागलाच. जगभरात चाललेला जिहादी उन्माद आज अन्य राष्ट्रांपेक्षा इस्लामी राष्ट्रांनाच त्रासदायक ठरला आहे. त्याकडेही इस्लामी युवक कशाप्रकारे पाहतात, हे पाहणे कुतूहलाचे ठरेल. शिवसेनेसारख्या पोपटपंची करणाऱ्यांनी मागेही ही मागणी करून मोदी सरकारला पिंजऱ्यात ओढण्याचा प्रयत्न केला असला तरीही काळाचे भान ठेवून राज्य सरकार जे काही करीत आहे, त्याचे कौतुकच केले पाहिजे. एकाएकी हिंदूंच्या पुनर्वसनाच्या वसाहती उभ्या करण्याच्या कल्पना तावातावाने मांडायला ठीक असतात, मात्र त्यांचा उपयोग होत नाही. बदलत्या परिस्थितीमध्ये असे काही होऊ शकते, हेही काही कमी नाही. वर उल्लेखलेल्या परिस्थितीचा परिपाक म्हणून काश्मीर आघाडीतून हिंदूंना बाहेर ढकलण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आता या दरम्यान पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. संथपणे सुरू झालेली ही प्रक्रिया कायमस्वरूपी व्हावी, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

@@AUTHORINFO_V1@@