संत मुक्ताबाई पालखीचे उत्साहात पंढरपूरला प्रस्थान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

दिंड्या आणि हजारो भाविकांची उपस्थिती

 
मुक्ताईनगर, १८ जून :
‘संपदा सोहळा नावडे मनाला!
लागला टकळा पंढरीचा!!
जावे पंढरीसी आवडे मनासी !
कधी एकादशी आषाढी हे !!’
 
 महाराष्ट्राचे आराध्यदैवत भगवान पांडूरंगाच्या भेटीसाठी आषाढी वारी करिता प्रमुख मानाच्या संत मुक्ताबाई पालखीचे कोथळी-मुक्ताईनगर समाधीस्थळ येथून लवाजम्यासह भक्तीपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले.  सुमारे ३०९ वर्षापासून वै.राम महाराज दुधलगावकर यांनी सुरू केलेल्या मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यभरातून व शेजारच्या मध्यप्रदेशातून आलेल्या भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.
 
 
पहाटे काकडारती मंगलमय वातावरणात सौ.सायली व कुणाल भोसले (नाशिक) यांनी महापूजा केली. प्रस्थान सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. ‘निर्मल वारी हरित वारी’ या अभियानांतर्गत वारकर्‍यांना बियाणांची पाकिटे वाटण्यात आली. हे बियाणे वारकर्‍यांनी आणि सोबतच्या भाविकांनी मुक्कामाच्या गावी योग्य जागी लावावी, जेणेकरून तेथील भाविक मुक्ताबाईचे झाड म्हणून संगोपन करतील अशी आशा शिवाजीराव महाराज मोरे (पंढरपूर) यांनी यावेळी केली.
 
 
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे जिल्हा परिषद आणि जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष रवींद्र प्रल्हादराव पाटील, ऍड.माधवी निगडे यांनी समयोचित विचार व्यक्त केले. मुक्ताबाई संस्थानचे मानकरी रवींद्र पाटील यांनी पादुकांना पंचामृत अभिषेक केला व विधीवत पादुका पालखीत स्थानापन्न केल्या. पौरोहित्य विनायक व्यवहारे यांनी केले. पंचपदी भजनानंतर आरती करित ‘मुक्ताबाई- मुक्ताबाई’ असा जयघोष करीत प्रचंड भक्तीमय वातावरणात पालखी मंदिर परिक्रमा करीत रथात ठेवून प्रस्थान पार पडले.
 
गावोगावीच्या दिंड्या व हजारो वारकरी
रणरणत्या उन्हातही भजनात तल्लीन
गावोगावीच्या दिंड्या व हजारो वारकरी रणरणत्या उन्हातही मुक्ताबाई भजनात तल्लीन झाले होते. जुन्या शहरात ठिकठिकाणी स्वागत करीत मुख्य बाजारपेठेतून नवीन मुक्ताबाई मंदिरात विसावा घेतला. संपूर्ण शहर भक्तीमय झाले होते. पुंडलिक पवार चापोरा, वासुदेव महाजन मुक्ताईनगर यांनी निर्मल वारी हरित वारीही संकल्पनेला दाद देत वारकर्‍यांना केळीच्या पानावर जेवण दिले. कुठेही प्लास्टिकच्या वापर केला नाही. सोहळ्याचा आजचा पहिला मुक्काम सातोड गावी असून उद्या सोहळा बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
 
मान्यवरांचे वारकर्‍यांसमवेत वॄक्षारोपण
एकनाथराव खडसे, महानंद अध्यक्ष मंदाताई खडसे, रवींद्र प्रल्हादराव पाटील, मुक्ताबाई संस्थानचे विश्वस्त पंजाबराव प्रल्हादराव पाटील, संदीप रवींद्र पाटील, सम्राट पाटील, अशोकराव पवार, तहसीलदार देशमुख, माधवी निगडे, सुर्यकांत भिसे, वन विभागाचे वराडे यांनी वारकर्‍यांसमवेत वॄक्षारोपण केले. मुक्ताबाई फडावरील सर्व दिंडी प्रमुख कीर्तनकार भाविकासोबतच, पी.एस.आय. सचिन इंगळे, नरेंद्र नारखेडे, विनायक हरणे, कोलते, ईश्वर रहाणे, पुंडलिक पवार आदी उपस्थित होते.
 
 
@@AUTHORINFO_V1@@