सोमवार ठरला घातवार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



एकाच दिवशी रेल्वे अपघाताच्या दोन घटना

ठाणे: आठवड्याचा पहिला दिवस हा घातवार ठरला. दिवा स्थानकातील रेल्वे फाटक ओलांडून जाणार्‍या दोन तरुणांना भरधाव मेल एक्सप्रेसने उडवले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍या घटनेत मालगाडीवर चढून सेल्फी काढण्याची हौस एका तरुणाच्या जीवावर बेतली. त्यामुळे सोमवार हा घातवार ठरला.

मालगाडीवर सेल्फी काढणे पडले महागात

कल्याण: मालगाडीवर उभे राहून फोटो काढण्याचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. ओव्हरहेड वायरचा जोरदार झटका लागल्याने तो गंभीर जखमी झाला. ठाकुर्ली रेल्वेस्थानक ते पत्रीपुलादरम्यान ही घटना घडली. जखमी तरुणाच्या अंगावरील कपडे जळून खाक झाले आहेत.

ऋषिकेश प्रशांत केळकर (वय २०) असे जखमी तरुणाचे नाव आहे. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या ऋषिकेशला वेळेवर मदत मिळू शकली नाही. घटनेनंतर १० ते २० मिनिटे ऋषिकेश रेल्वे रूळावर मदतीसाठी याचना करत होता. लोहमार्ग पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यास रुग्णालयात हलविण्यात आले.जखमी ऋषिकेश हा डोंबिवलीच्या पश्चिमेकडे असलेल्या ठाकूरवाडी श्री साईप्रसाद सोसायटीमध्ये राहणारा आहे. सोलापूर येथील मेडिकल कॉलेजचा तो विद्यार्थी असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली. ४० टक्के होरपळून जखमी झालेल्या ऋषिकेशची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिवा स्थानकात एक्सप्रेसने दुचाकीला उडवले, दोघांचा मृत्यू

ठाणे: रेल्वेचे फाटक निष्काळजीपणे ओलांडणे किती जीवघेणे असू शकते, याचे उदाहरण सोमवारी ठाणे-कल्याणदरम्यान दिवा स्थानकात पाहायला मिळाले. फाटकाच्या खालून रेल्वे फाटक ओलांडण्याचा प्रयत्न करणार्‍या दोन तरुणांना ट्रेनच्या धडकेने आपला जीव गमवावा लागला. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. दिवा स्थानकामध्ये बंद फाटक ओलांडून जात असलेल्या दुचाकीला भरधाव एक्सप्रेसने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास दिवा स्थानकातील फाटक बंद असताना दोन दुचाकीस्वार तरुणांनी फाटक ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यादरम्यान ट्रॅकवरून जात असलेल्या भरधाव एक्सप्रेसने दुचाकीला उडवले. या अपघातात दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

@@AUTHORINFO_V1@@