चोपडा शहरात भीषण पाणीटंचाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

१२ दिवसाआड पुरवठा, भरवसा टँकरवरच, पावसाचीही प्रतीक्षा

 
चोपडा :
शहर व तालुका पाण्याबाबत एकेकाळी सुजलाम सुफलाम म्हणून ओळखला जात होता. ४०-५० वर्षापूर्वी चोपडा शहराच्या दक्षिण दिशेने खळखळून वाहणारी रत्नावती नदी शहराच्या वाढत्या विस्तारामुळे आता मधोमध आली आहे, शहरातील विहिरी व आडांना तेव्हा १५ ते २५ फुटांवर पाणी होते, त्याचा तळ कधी लागत नसे, पण आता नदीत सांडपाण्याशिवाय काहीही नाही, हे वास्तव आहे.
 
शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल होत गेली. तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना यावर्षी तब्बल १२ दिवसाने पिण्याचा पाणीपुरवठा न.पा. कडून होत आहे. पाण्याची भीषण पाणीटंचाई भासत असल्याने अनेक नगरसेवकांनी वाढदिवस साजरा न करता पाण्याचा टँकर पुरवणे व्यवहार्य मानले आहे.
 
 
चोपडा न.पा.कडे ५ ते ६ टँकर देवून शहरात गल्लोगल्लीत मोफत पाणी पुरवठा केला जात आहे. चोपडा नगरपालिकेतील आवारातील बोरवेलद्वारे २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. काही भागात शहरवासीयांनी खाजगी बोरवेल करण्यात भर दिला आहे, सध्या ५०० फुटापर्यंत पाण्याची पातळी खोल गेली आहेे. गेल्या तीन महिन्यापासून शहरवासी भीषण जलटंचाईला सामोरे जात आहेत. आता पावसाचे वेध लागले आहे. शेतकरी मशागतीत व्यस्त आहे. नांगरटी, वखरणीची कामे जोरात सुरु आहेत, काहींनी मे महिन्याची बागायत कापसाची लागवड केली आहे. शेतकरी राजा बी-बियाणे खते, खरेदी करण्यास बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे.
 
नदी-नाले खोलीकरण व बंधारे बांधण्यासाठी हालचाली
काही गावी नदी, नाले खोलीकरण व बंधारे बांधण्यासाठी हालचाली सुरु आहेत. पावसाची अनियमिता, कमी पर्जन्यमान, शेतमालाची परवड आणि पेयजल टंचाईचे तीव्र होणारे संकट लक्षात घेऊन लोकसहभागातून जलसंधारण अर्थात ‘पाणी आडवा-पाणी जिरवा’ मोहिमेवर यावर भर दिला जात आहे. निदान पुढच्या वर्षी तरी शासनापेक्षा लोकसहभागाला पर्याय नाही, असा विचार बळावत आहे.
 
शेतीची कामे पूर्णतेकडे
यावर्षी ७ जून अगोदर चोपडा शहरात व तालुक्यात बर्‍याच ठिकाणी पावसाने कमीअधिक हजेरी दिली. मशागतीची कामे पूर्ण होवून आता पावसाच्या दमदार हजेरीकडे शेतकरी राजा डोळे लावून आहे. चटके देणारे आता तापमान कमी होवू लागले आहे. सकाळ-सायंकाळी हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे. बरेच जण बाहेर अंगणात झोपणे पसंत करीत आहेत.
सर्वच व्यवहार मंदावले...
अर्धा जून उलटूनही पावसाचे चिन्ह जाणवत नसल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार मंदावले आहेत. आता पाऊस केव्हा येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@