अनपेक्षिताचे प्रारब्ध..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |

 

 
 
 
कधी भूतकाळात तर कधी भविष्याच्या विचारात हरवतो. मन सुन्न होते. यात कुणीतरी अचानक दिलेला धोका, अचानक उद्भवलेला आजार, हातातली अनमोल गोष्ट अचानक गायब झालेली, अपेक्षित असलेली गोष्ट निसटून गेलेली. आपण खरेच थिजून जातो या क्षणी. आपण त्यावेळेला, त्या घटनेमुळे उद्विग्न होऊन जातो. सगळे संपल्यासारखे वाटते.

आयुष्यात काय, कधी, केव्हा आणि कसे घडेल हे कुणीच सांगू शकत नाही. पण, गोष्टी अचानक घडतात. त्या घडतात तेव्हा ज्यासंबंधी त्या घडतात, त्या व्यक्तीला असं का व कसं घडू शकते, याची दुरान्वयेही कल्पना नसते. ‘जिंदगी’ किंवा ज्याला आपण ‘जीवन’ म्हणतो, ते असंच आहे. अनेक गोष्टी अशा अनपेक्षितपणे कल्पनेच्या पलीकडे जाऊन घडत असतात. या घटनांशी, प्रसंगांशी त्यातून अनपेक्षितपणे समोर येणार्‍या व्यक्तीशी मग त्या आपल्या ओळखीच्या असतील किंवा अनोळखी असतील, पण आपण त्या प्रसंगांना, व्यक्तींना सामोरे कसे जावे, हेच कळत नाही. अर्थात, निसर्गाच्या किमयेतून मग ते सुंदर असो वा क्रूर असो. आपण मात्र नि:शब्द होऊन जातो, अवाक् होऊन जातो, भिरभिरतो. आयुष्य कधी कधी तसे दमछाक करणारे वाटू लागते. भयानक आहे, पण घाबरविणारे आहे. तसे जगात घडणारे प्रत्येक घटित घडेपर्यंत अनपेक्षितच असते आणि ते तसे असणारच. माणूस म्हणून आपली प्रतिक्रिया मात्र बदलत राहते, हे खरे. पण, खरे तर अशा अवघडवेळी या अनपेक्षित क्षणांना वा प्रसंगांना आपण सामोरे कसे जावे, हे कळत नाही. अनपेक्षितपणे जेव्हा एखादी लॉटरी लागण्यासारखी घटना भाग्योदय करणारी असते, तेव्हा गोड ‘शॉक’ बसतो. असला ‘शॉक’ खरंतर विद्युतऊर्जाच असते. यामुळे आपल्या आयुष्यात दिव्याचा झगमगाट होतो. आयुष्य लखलखणारी चंदेरी दुनिया होऊन जाते. कठीण, अनपेक्षित प्रसंग वा दुर्दैवी घटना जेव्हा घडतात, तेव्हा खरे तर आपल्याला काहीच सुचत नाही. आयुष्य अगदी अंधःकारमय होऊन जाते. मन उदास होते. काहींच्या आयुष्यात हे असे सतत होत राहाते. एका शायरने म्हटलेच आहे की,

बहुत छालें है

उसके पैरों मे...

कम्बख्त वो जरुर

उसूलो पर चला होगा।

आयुष्यात जेव्हा खरेच तत्त्वाने व निष्ठेने माणसं चालतात, तेव्हा चालताना मिळालेले धक्के व ठोकरांनी आयुष्यच कुठेतरी गोठल्यासारखे होते, हे खरेच आहे. अशावेळी गरज असते ती आसमंतातून लखाणणार्‍या विद्युतऊर्जेची. ती कशी, कोठून येते समजत नाही, पण अवतीभोवती पसरलेल्या अंधाराला ती ऊर्जा गिळूनच टाकते. कुठे गेला तो अंधार आणि कुठून आला हो पुढची वाट दाखवणारा प्रकाश? खरंच काही कळत नाही, पण ऊर मात्र आनंदाने भरून येतो.

पण थोडंसं कळलं ना की, हा आशेचा प्रकाश येतो कुठून तर आयुष्याला बर्‍याच गोष्टींतून विशेषतः कठीण प्रसंगातून मार्ग काढता येईल; किंबहुना काढता येणे शक्य आहे. माझे एक रुग्ण आहेत. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. त्यांची दोन्ही मुले अपघातात हे जग सोडून गेली. पत्नीला सदैव आजाराने घेेरलेले. तेही आता वयोवृद्ध. काळ काही कुणासाठी थांबत नाही खरा. जसजशी वर्षे निघून जातात, तसतशी काळाची छाप माणसाच्या तनावर व मनावर पडत जाते. ते तसे होणारच, कारण जग माणसाच्या स्वप्नावर नाही तर निसर्गाच्या नियमांप्रमाणेच चालते. पण, हे गृहस्थ मला नेहमी एकच उत्तर देत की, ”या सगळ्या घडणार्‍या गोष्टींचे किंवा घटनांचे मी काय करू शकतो? जे जसे घडले तसे मी सहन करतो. जे करण्यासारखे आहे ते करत राहतो.”

खरेच, किती समर्पक उत्तर व त्या अनुषंगाने समर्पक वागणेसुद्धा! खरेच, माणूस काय करू शकतो? ज्या गोष्टी घडून गेल्या त्याबद्दल आपण काय करू शकतो? त्या बदलू शकतो? नक्कीच नाही. त्या टाळू शकतो? शक्यच नाही. मग ज्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, ज्या गोष्टींचा मार्ग आपण बदलू शकत नाही त्याचं आपण काय करणार? या अनपेक्षित गोष्टींना स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे उत्तम पर्याय नक्कीच नाही. अर्थात, काही इतर माणसे त्यांचा ‘नर्व्हस ब्रेकडाऊन’ होतो. कारण, या सगळ्या अनपेक्षित घटना त्यांना पचविता आल्या नाहीत. याच्या अगदी विरुद्ध ध्रुवावर जाऊन काहीजण जे होते आहे ते स्वीकारणे व आपल्याला जे जे जसे जसे जमेल ते करीत राहावं, हा भावनिक पर्याय स्वीकारतात. तो खूप मोलाचा ठरतो. अर्थात, प्रत्येकाची भावनिक क्षमता वेगवेगळी असते.

आयुष्यात अशा अनपेक्षित क्षणांना आपल्याला पेलता येईल. थोड्याशा कष्टांनी का होईना, आपण या कठीण प्रसंगांशी सामना करूही शकू. जर या क्षणाचे आकस्मिक व अनपेक्षित असणं, अचानक न सांगता आपल्या आयुष्यात आगंतुकासारखं प्रवेश करणं आपल्या पचनी पडलं तरच... आपण संकटाशिवाय आयुष्याची कल्पना केली तर बळी आपलाच जाणार आहे. कारण, ज्याला आपण ‘दैव’ म्हणतो ते काहीतरी करतच राहणार ना! ट्रॅजेडी तर होतच राहणार ना! मग काही सुखाच्या, समाधानाच्या क्षणानंतर एखादी दुर्दैवी घटना घडेल याची जाणीव आपण आपल्या मनात ठेवली तर आयुष्य तेवढे कठीण वाटणार नाही. कारण, त्या कठीण मार्गावर चालायची तयारी आपण मनात अजाणतेपणी का होईना, पण केलेली असणार. आपली चांगली मित्रमंडळी, कुटुंबीय आपल्याभोवती असतातच. तशीही आपण कठीण दिवसांसाठी, येणार्‍या दुष्काळासाठी काहीतरी साठवण करून ठेवतो, तसेच आयुष्याचे कठीण प्रसंग येतच राहतात. आपण आतून, अगदी मनाच्या गाभ्यातून आयुष्याची वेडीवाकडी वळणं स्वीकारली तर आपणही तयार असूच. ते कठीण प्रसंग आपल्याला वाटतात तितके कठीण भासणार नाहीत. कारण, आता आपण तयार आहोत. आपण आता स्वीकारले आहे की, ते कठीण प्रसंग आपल्या आयुष्याचा भाग आहेत. त्यांचे येणे जरी अनपेक्षित असले तरी त्याचीही कल्पना आपल्याला एक माणूस म्हणून असायलाच हवी, नाही का?

डॉ. शुभांगी पारकर

@@AUTHORINFO_V1@@