होमियोपॅथीबद्दलचे समज-गैरसमज (9)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



होमियोपॅथीबद्दल नीट माहिती घेतली तर ते लोक कधीच असे गैरसमज पसरवणार नाहीत. होमियोपॅथीच्या औषधांमध्ये कधीही उत्तेजके किंवा स्टिरॉईड्स नसतात. होमियोपॅथीत स्टिरॉईड्स हा प्रकारच नसतो.

होमियोपॅथीबद्दलच्या आपल्या या लेखमालेत आपण आजपर्यंत अनेक शंकांचे निरसन केले व अनेक गैरसमज दूर केले. आजच्या भागात आपण काही गैरसमजुतींचेही निरसन करुया.

इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर मी असे पाहातो की, अजूनही रुग्ण जेव्हा औषध घ्यायला येतात, तेव्हा काही वेळा त्यांचा एक प्रश्‍न असतो की, "होमिओपॅथीच्या औषधांमध्ये स्टिरॉईड्स असतात का?” हा होमियोपॅथी व त्याच्या औषधांवर केला गेलेला अतिशय गंभीर असा आरोप आहे. बरेचदा हे असले शंका वजा आरोप अशा लोकांकडून केले जातात, ज्यांना मुख्यतः स्टिरॉईड्स म्हणजे काय, हेदेखील ठाऊक नसते. उगाच कोणाचे तरी ऐकून हे प्रश्‍न विचारले जातात. याशिवाय हा गैरसमज पसरविणारे लोक हे अर्धवट ज्ञान असलेले असतात. जर त्यांनी होमियोपॅथीची औषधे ही निसर्गातील सर्व उपलब्ध पदार्थांपासून नैसर्गिकरित्या बनवली जातात.

होमियोपॅथीचे औषध हे निसर्गनियमानुसार दिले गेले असता ते माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते व त्यामुळे शरीराचा सर्वांगीण विकास होऊन माणूस तजेलदार दिसू लागतो. याचा अर्थ काही अर्धवट ज्ञान असलेले लोक असा काढतात की, होमियोपॅथीत स्टिरॉईड्स असतात. दुसरे असे की, काही विघ्नसंतोषी मंडळीसुद्धा होमियोपॅथीच्या विरुद्ध नेहमी आग ओकत असतात. त्यामागे त्यांचे फायद्या-तोट्याचे गणित असते. जर सर्व लोक होमियोपॅथीचे उपचार घेऊ लागले, तर या लोकांचे नफ्याचे गणित चुकते व अशी मंडळी जगभरात मग एक लॉबी उभारून उगाचच होमियोपॅथीला बदनाम करतात. याबाबत सूज्ञ वाचकांना अजून खोलात शिरून सांगायलाच नको.

संपूर्ण जगभरात व भारतातील आयआयटी, (मुंबई) या जगप्रसिद्ध संस्थेने डॉ. बेल्‍लारे यांच्या मार्गदर्शनाखाली होमियोपॅथीच्या औषधांवर अनेक प्रयोग व चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये असे सिद्ध झाले की, होमियोपॅथीची औषधे ही नॅनो टेक्नॉलॉजीवर काम करतात. होमियोपॅथीच्या औषधांमध्ये कुठल्याही प्रकारचे उत्तेजक किंवा कुठल्याही प्रकारचे स्टिरॉईड्स नसतात, हे प्रयोगाने सिद्ध झालेले आहे. त्यामुळे अशा शंका-कुशंका उपस्थित करणार्‍या लोकांनी प्रथम कृपया या प्रयोगाबद्दल व आयआयटीच्या संशोधनाबद्दल नीट माहिती करून घ्यावी आणि मगच होमियोपॅथीबद्दल बोलावे. वैज्ञानिकदृष्ट्याच जर सांगायचे झाले तर जेव्हा रुग्ण हा स्टिरॉईड्सचे सेवन करत असतो, तेव्हा अचानक वजन वाढणे, नुसते वजन नाही तर माणूस अनैसर्गिकरित्या अक्षरशः फुगतो, अंगावर, चेहर्‍यावर केसांची वाढ होणे, चेहरा चंद्रासारखा गोल होणे ही आणि अशाप्रकारची अनेक लक्षणे रुग्णामध्ये दिसू लागतात.

औषधामध्ये स्टिरॉईड्स आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी अनेक प्रयोग करता येतात. पण, तेसुद्धा नीट जाणून घेऊन करावेत. त्यातही कोलोरीमेट्रीक पद्धत जी आहे ती साखर व अल्डीहाईड यांच्यावरच्या प्रयोगानंतर चुकीचे सिद्धांत देते म्हणूनच सर्वात खात्रीशीर पद्धत म्हणजे Liberman Buchard Tbin Layer Chromography Method v Absorbtion Method.

या प्रयोग पद्धतीमुळे औषधांमध्ये उत्तेजके किंवा स्टिरॉईड्स आहेत की नाही याची तपासणी करता येते व या प्रयोगांनी सिद्ध केलंय की, होमियोपॅथीच्या औषधांमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टिरॉईड्स नसतात. त्यामुळे काही रुग्णांच्या मनात जो गैरसमज आहे तो कृपया त्यांनी दूर करावा. पुढील भागात आपण होमियोपॅथीच्या उपचार पद्धतीबद्दल अजून काही माहिती जाणून घेऊया.

डॉ. मंदार नि. पाटकर

@@AUTHORINFO_V1@@