व्यर्थ न हो हे बलिदान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018   
Total Views |



काश्मीर खोऱ्यातल्या सालीना गावच्या औरंगजेबचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेक प्रश्नांना, विचारांना वाटा फुटल्या. खरे तर ‘औरंगजेब’ हे नाव उच्चारले तरी आपले रक्त क्रोधाने, संतापाने सळसळते, पण आज याच नावाने मनात एक काहूर माजले आहे. कारण, ‘औरंगजेब’ या भारतीय जवानाचे अपहरण करून त्याचे हाल हाल करून दहशतवाद्यांनी त्याची काश्मीरमध्ये हत्या केली. ज्या काश्मीर खोऱ्यात असिफाला न्याय देण्यापेक्षा बलात्काऱ्याच्या समर्थनार्थ मोर्चे निघत होते, त्याच खोऱ्यात असे हजारो औरंगजेब नक्कीच असतील, जे देशाच्या रक्षणासाठी जीव ओवाळून टाकत आहेत. अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या दहशतवादविरोधी पथकात औरंगजेब होता. औरंगजेबचे घराणेच भारतभूमीला अर्पण आहे. वडील भारतीय लष्करातून निवृत्त. भाऊ आजही भारतीय लष्करात कार्यरत आहेच. सन २००० मध्ये त्याच्या सख्ख्या काकांची हत्या करण्यात आली. असे असले तरी, ”माझ्या मुलाचा मृत्यू झाला, पण अन्य पालकांनी त्यांच्या मुलांना लष्करात पाठवायचे थांबवले तर मग देशासाठी कोण लढेल?,” हे उद्गार आहेत मोहम्मद हनीफ यांचे. हनीफ यांचा चौथा मुलगा औरंगजेब लष्करी सेवेत होता. मुलाच्या मृत्यूनंतरही मोहम्मद हनीफ खचले नसून आपल्या विचारांतून त्यांनी इतरांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. हिजबुल कमांडर समीर टायगरला मारण्यात आलेल्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होता. तो ‘४४ राष्ट्रीय रायफल्स’ बटालियनमध्ये रायफलमॅन म्हणून शोपियाँ जिल्ह्यात तैनात होता. ईदच्या सुट्टीसाठी तो घरी जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करून हत्या केली. औरंगजेब हा दहशतवादविरोधी पथकाचा सदस्यही होता. खोऱ्यातील वातावरण खरंतर वेगळं आहे. अशा परिस्थितीत औरंगजेब आणि त्याच्या कुटुंबीयांनी केलेला त्याग कौतुकास्पद आहे. भारताच्या रक्षणासाठी धर्म महत्त्वाचा नसून ते आपले कर्तव्य आहे. ही भावना दृढ झाल्यास खोऱ्यातील घराघरांमधून भारतभूमीच्या आणि काश्मीरच्या रक्षणासाठी अनेक औरंगजेब आपसूकच तयार होतील. औरंगजेबचे हे बलिदान निश्चितच भारतीय लष्कर व्यर्थ जाऊ देणार नाही आणि लवकरच त्या दहशतवाद्यांचाही खात्मा करण्यात येईल. औरंगजेबच्या वडिलांचीदेखील हीच इच्छा आहे. औरंगजेबचा मृत्यू आणि त्याने बजावलेले कर्तव्य मातृभूमीबाबत येणाऱ्या भविष्यात नक्कीच सकारात्मकता आणेल आणि जात, धर्म विसरून केवळ भारतभूमीच्या रक्षणासाठी तो लढेल. औरंगजेब तुला सलाम! आम्ही तुझे बलिदान विसरणार नाही.

 

अपेक्षाभंग

 

२०१४चं वर्ष, फुटबॉलप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरलं. तोच उत्साह, तीच आशा आणि उत्कंठा ताणून जर्मनीच्या मायदेशातील आणि परदेशातील चाहत्यांनी रविवारची संध्याकाळ घरातील टीव्ही, स्पोर्ट्स क्लब, मोबाईल अशा मिळेल त्या माध्यमांच्या स्क्रिनसमोर बसून घालवली. पण, पदरी सपशेल निराशाच पडली. ९० मिनिटांच्या खेळातील ३४ मिनिटे उलटली आणि नंतर ३५व्या मिनिटाला हर्विंग लोझानोने रशियातल्या ल्युझिन्की स्टेडियमवर गोल झळकावला आणि मेक्सिकोत जल्लोषाचा भूकंप झाला. २०१८च्या विश्वचषकातील मेक्सिकोने गतविजेत्या जर्मनीचा केलेला पराभव अनेक गोष्टी सांगून जातो. या सामन्यामुळे दिग्गज संघांसाठी ही स्पर्धा आता सोपी जाणार नाही, ही बाबदेखील पुन्हा एकदा अधोरेखित झाली. फिफा विश्वचषकात मेक्सिकोने जर्मनीवर मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला, तर मेक्सिकोने १९८५ नंतर जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला. इतकंच नाही तर एकसंध जर्मनीला प्रथमच फिफा विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. १९९० साली पूर्व आणि पश्चिम जर्मनी एकत्र आले होते. त्यानंतर जर्मनीने प्रत्येक विश्वचषकात विजयी सलामी दिली होती. मेक्सिकोला या सामन्यात बॉलवर म्हणावं तसं वर्चस्व मिळवता आलं नसलं तरी मिळालेल्या प्रत्येक संधीचं ते सोनं करण्याचा प्रयत्न करताना दिसले. अगदी सामन्याच्या पहिल्या मिनिटालाच मेक्सिकोने जर्मनीवर आक्रमण चढवलं. प्रशिक्षक जोकेम लो यांच्या जर्मनी संघात अनुभव हा ठासून भरलेला आहे. पण, मेक्सिको प्रत्येक बाबतीत वरचढ ठरताना दिसला. जर्मनीचा ढिसाळ बचाव हे यातील मुख्य कारण ठरलं. जेरोमी बोएटेंग, मॅट हमल्स, जोशुआ खिमिच आणि मर्विन प्लॅटेनहार्टसारखे खेळाडू जर्मनीच्या बचावफळीत होते. मेक्सिकोचा काऊंटर अटॅक रोखण्यात जर्मनीच्या खेळाडूंना वारंवार अपयश येत होतं किंवा त्यांना मेक्सिको इतक्या वेगाने आक्रमण चढवेल याची जाणीवही झाली नसावी. याचाच फायदा हर्विंग लोझानोने ३५व्या मिनिटाला घेतला, आधी मेसूत ओझिल आणि मग टोनी क्रूसला चकवून लोझानोने मॅन्यूएल नोया नावाची अभेद्य भिंत भेदण्याचा पराक्रम गाजवून दाखवला. कट्टर जर्मन चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. हा पहिलाच सामना होता. त्यामुळे आगामी सामन्यात जर्मनीला सूर गवसतो का हे पाहावं लागेल. तोपर्यंत ‘लिबे डोईचलँड’!

@@AUTHORINFO_V1@@