एमआरआय मशीन दुरुस्तीसाठी महापालिका १.५३ कोटींचा खर्च करणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Jun-2018
Total Views |



मुंबई : नायर रुग्णालयात जानेवारीमध्ये एमआरआय यंत्र दुर्घटनेत राजेश मारू या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेपासून हे यंत्र बंद पडले असून त्यामुळे रुग्णांना या यंत्राचा लाभ मिळत नाही. या यंत्राच्या दुरुस्तीसाठी आता १.५३ कोटी रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

महापालिकेने मे. फिलिप्स इं. लि. या कंपनीकडून हे एमआरआय यंत्र ३ वर्षांच्या हमी कालावधीसह व ५ वर्षांच्या परिरक्षण कालावधीसह २००८ मधील मंजुरीनुसार ७ कोटी ८९ लाख २८ हजार ८१३ रुपयांना खरेदी केले होते. दि. २१ जानेवारी २०१७ रोजी या यंत्राचा एकूण ८ वर्षांचा कालावधी संपला होता. त्यानंतर रुग्णसेवेकरिता वाढीव एक वर्षाचा परिरक्षण करार फिलिप्स कंपनीसोबत करण्यात आला होता. मात्र आणखी पुढील १० वर्षांसाठी परिरक्षण करार करण्यापूर्वीच २८ जानेवारी रोजी ही दुर्घटना घडली व हे यंत्र तेव्हापासून बंद पडले होते. आता रुग्णांची गरज व अडचण लक्षात घेता प्रशासनाने हे यंत्र दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. हे एमआरआय यंत्र फिलिप्स कंपनीचे असल्याने याच कंपनीकडून ते दुरुस्त करण्यात येणार आहे. या दुरुस्ती अंतर्गत स्पेअर पार्ट्सचा खर्च ५ कोटी, ६६ लाख, ७४ हजार, २४२ रुपये, सर्व्हिस अ‍ॅक्टिव्हिटी खर्च २३ लाख ६० हजार रुपये, हेलियम भरण्याचा खर्च १३ लाख, ७९ हजार, १८४ रुपये असा एकूण खर्च ९४ लाख, ६ हजार, ६०८ रुपये इतका असणार आहे. तसेच वार्षिक परिरक्षणाचा खर्च ५९ लाख, २७ हजार, १२८ रुपये इतका येणार आहे. यामुळे सर्व प्रकारचा एकूण खर्च हा १ कोटी, ५३ लाख, ३३ हजार, ७३६ रुपये इतका येणार आहे.

दि. २८ जानेवारी २०१८ रोजी नायर रुग्णालयात एका रुग्णाचा नातेवाईक राजेश मारू या व्यक्तीचा रुग्णासोबत असलेल्या ऑक्सिजन गॅस सिलेंडरसह एमआरआय यंत्रामध्ये ओढले गेल्याने त्यातच अडकून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका सभागृहात उमटले होते. पालिकेने ज्या ठिकाणी एमआरआय यंत्र ठेवले होते तेथे प्रशिक्षित कर्मचारी, सुरक्षारक्षक न ठेवल्याने व आवश्यक दक्षता न बाळगल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक व मृत राजेश मारू यांच्या नातेवाईकांनी केला होता.

@@AUTHORINFO_V1@@