मुंबईसह उपनगरांमध्ये कोसळल्या सरींवर सरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



आजही दमदार पावसाची शक्यता

मुंबई: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. रविवारी पहाटेपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, मुंबई आणि उपनगरांप्रमाणेच कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. तसेच सोमवार मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रविवारच्या दिवशी पावसाचे आगमन झाल्याने मुंबईकरांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला. मुंबईमध्ये दि. ९ ते ११ जूनच्या दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता, परंतु या दरम्यान फक्‍त एकच दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर हवामान खात्याने जारी केलेला ’हाय अर्लट’ मागे घेण्यात आला होता. ’इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट’ने शुक्रवारी मुंबईसह कोकण पट्ट्यात १७ आणि १८ जूनला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

आज मुंबईतील लोअर परळ, वरळी, दादर आदी भागात पावसाचा जोर होता. तसेच उपनगरातील अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडुप येथेही पावसाच्या मुसळधार सरी कोसळल्या. तसेच मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, वसई आणि विरार या भागातही पावसाने दमदार हजेरी लावली होती. दरम्यान पावसामुळे जोगेश्वरी परिसरात इमारतीची संरक्षण भिंत कोसळून, झालेल्या दुर्घटनेत सहा कार आणि एका दुचाकीचे नुकसान झाले आहे. मात्र, या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाहीत. तसेच ठाण्यातील तीन हात नाका परिसरात एक झाड कोसळून, पाच वाहनांचे नुकसान झाले आहे.

@@AUTHORINFO_V1@@