पाण्याचा जागर -जलसाक्षरता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jun-2018
Total Views |



 

जमिनीची गाळणाची क्षमता, झाडांची शुद्ध आणि जैविक पाण्याची शोषणक्षमता, प्रवाहित पाण्यातील क्षारांच्या प्रक्रियेने तसचे सूर्यकिरणांमधील अतिनील किरणांमुळे होणारे निर्जंतुकीकरण.. या सर्व नैसर्गिक शुद्धीकरण यंत्रणांवर येणारा ताण आपण कमी केला, तरी ही पाण्याची शुद्धता आणि शुद्ध पाण्याची उपलब्धता अधिक होईल.

`तूफान आलयाऽ’च्या जयघोषामधे गावागावामधे सुरू असलेले ‘वॉटरकप’चे अभियान रंगात आले आहे. भूजलस्तर, ’पाणी अडवा, पाणी जिरवा’, नाला बडींग, शेततळे, पाझर तलाव ट्रेंचेस अशा अनेकविध शब्दांची कृतीसकट ओळख करून देणार्‍या या अभियानाला आमिर खान व चंदेरी दुनियेतील इतर अनेक जणांच्या उपस्थितिने व दृकश्राव्य माध्यमातील अविरत प्रसिद्धीमुळे हे तुफान ग्लॅमरस झाले आहे.

सुमारे १५ वर्षांपूर्वी ’जलसाक्षरता अभियान’ सुरू करताना ’पाणी वाचवा’ अभियान सुरु झाले. शहरी जीवनामधे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जलसंचय व वितरणाच्या योजना आकाराला येऊन, पाणी घरपोच यायला लागले आणि मग मुबलकतेमुळे व कष्ट न घेता केवळ पैसे खर्च करून मिळणार्‍या पाण्याचे ‘मूल्य’ कमी झाले. बाटलीबंद मिळणार्‍या पिण्याच्या पाण्याची सवय हळू हळू सर्वांना लागायला सुरुवात झाली होती. पाण्याकरिता पैसे मोजण्याची मानसिक तयारी हळू हळू होऊ लागली होती.

पाण्याचा वापर अनिर्बंधपणे वाढत जात होता. स्वच्छतेची संकल्पना पाण्याच्या वापराशी जोडल्यामुळे अधिक पाणी वापरले, म्हणजे आपण अधिक स्वच्छ झालो असे वाटू लागले. पाण्याच्या घरातील एका नळाऐवजी घरामधे विविध ठिकाणी चार-पाच नळ बंद बाथरूम स्वतंत्र शौचालये ही सर्वव्यवस्था पाण्याच्या अधिक उपयोगावरच आधारित होती. मग पाण्याचे नैसर्गिक व निरंतर स्रोत हळू हळू कमी वापरले जाऊन, नळाचे पाणी शुद्ध पाणी ही संकल्पना प्रचलित झाली आणि स्थिरावली. विहिरी तळी व कूपनलिका यांच्या पाण्याच्या शुद्धतेबद्दल प्रश्न उभे राहिले व पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतातून या सर्व गोष्टी हळू हळू अदृश्य झाल्या. ही सर्व व्यवस्था थोड्या फार फरकाने सर्व गावांच्या शहरांकडे, शहरांच्या महानगरकडे व महानगरांच्या मेट्रोकडे चाललेल्या प्रवासात सर्वत्र आढळत असते.

पाण्याच्या उपलब्धतेबद्दलची जाणीव जागृती मोहीम पूर्वापारपणे सुरू असली, तरीही पावसाच्या प्रमाणावर या मोहिमेची तीव्रता व परिणामकारकता अवलंबून राहते. दुष्काळ सदृश परिस्थितीमधे पाण्याची कमतरता सर्व प्रसारमाध्यमातून व प्रचारयंत्रणातून वारंवार सांगितले गेल्याने काही प्रमाणात पाण्याच्या वापरण्याच्या पद्धतीमधे काही फरक पडतो. पण पाऊस पडताक्षणी या संकल्पना गळून जातात आणि पुन्हा पाण्याच्या गैरवापर सुरु होतो. विशेषत: गाडी वा जागा धुणे, झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी घालणे, गळणारे नळ वा फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करणे या सर्व बाबतीत आपण लगेचच दुर्लक्ष करू लागतो.

नळाचे शुद्ध पाणी अतिसहजपणे शहरामधून उपलब्ध झाल्यामुळे त्याचा वापर सर्वत्र समानपणे केला जातो. पाण्याच्या सर्व प्रकारच्या उपयोगांसाठी हे एकच प्रकारचे पाणी वापरले जाते. आजही आपल्या सर्वांच्या घरामधे टॉयलेट्समधून सर्वाधिक स्वच्छ पाणी वापरले जाते. मुंबईसारख्या आधुनिक महानगरामधेही राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरसारख्या संस्थेने शुद्ध केलेल्या सांडपाण्याला खरेदी करून, वापरायला गिर्‍हाईक नाही. सांडपाण्याचा पुनर्वापर ही संकल्पना जलसाक्षरतेशी जोडून, आम्ही जेव्हा जनसंवाद सुरू केला तेव्हा मानवी मनातील शुद्ध/अशुद्ध, पवित्र/अपवित्र अशा संकल्पनांचे द्वंद्व समोर आले. विज्ञानावर ठाम विश्वास असलेला माणूसही तंत्रज्ञानाने पाणी अतिशुद्ध व पिण्यालायक होऊ शकते यावर व्यवहारात विश्वास ठेवत नाही. यापुढील काळात वाढत्या लोकसंख्येप्रमाणे पावसाचे प्रमाण वाढत नसल्याने प्रतिव्यक्ती पाण्याची उपलब्धता घटू लागल्यानंतर नजीकच्या उद्याला सांडपाण्याचा पुनर्वापर करणे अनिवार्य होणार आहे.

रेनवॉटर हार्वेस्टिंग

पावसाच्या पाण्याची शेती करण्याची संकल्पना पूर्वापार आहे. निसर्गतः पाऊसच शुद्ध पाण्याचा दूरवरच्या भागातील मूलस्त्रोत आहे. आकाशातून पडून समुद्रापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासात पाण्याचे विविध स्रोत व संचय हे पुढील पावसाळ्यापर्यंत आपल्याला पाणी देतात. या संचयनात मानवी प्रयत्नांनी केलेली वाढ म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग.

रेनवॉटर हार्वेस्टिंग करताना आकाशातून पडणारे सर्वपाणी साठवायचे नाही, तर आपल्याला आवश्यक आहे, तेवढेच साठवायचे आहे हा विचार प्रामुख्याने करायचा. या व्यवस्था उभारून, आजच्या लौकिक जगातील आर्थिक विचारात आपला किती फायदा होईल! हा विचारही गौण असावा. पाण्याच्या नैसर्गिक अभिसरणामधे मी ‘मानव’ म्हणून अनेक अडथळे निर्माण केले आहेत.त्या अडथळ्यावर मात करून पाण्याचे नैसर्गिक अभिसरण सुरू राहवे म्हणून केलेले वैज्ञानिक प्रयत्न म्हणजे वर्षाजलसंधारण किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंग. या प्रयत्नादरम्यान साठलेले वा मुरलेले पाणी आपण आपल्या कामाला वापरतो हा आपला फायदा.

पाण्याच्या योग्य वापराची संस्कृती म्हणजे पद्धतीत सर्वसामान्य जनतेत उत्पन्न करणे ही जलसाक्षरतेची फलनिष्पत्ती मानता येईल. पाणी हे स्वच्छतेचे साधन आहे, परंतु त्याचा अधिक उपयोग म्हणजे अधिक स्वच्छता हे समीकरण पुसून टाकले पाहिजे. अधिक पाण्याच्या उपयोगातून अधिक सांडपाणी तयार होते. सांडपाणी त्याचे व्यवस्थापन व जलस्रोतांचे त्यामधून होणारे प्रदूषण ही जागतिक समस्या आहे. सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन हे सर्व विकसनशील देशासमोरचे मोठे आव्हान आहे. या पाण्यामुळे स्वच्छ पाण्याचे जमिनीवरील व जमिनीतील स्त्रोत मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात आणि जलसमृद्ध असलेल्या भागांमध्येही स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेची समस्या उभी राहते.

मी मला आवश्यक तेवढेच पाणी वापरेन आणि पारिस्थितिक स्थित्यंतरामध्ये अनावश्यक पाण्याचा वापर कमी करून, पाणी जपून वापरायचे असते असा भाव माझ्या व परिवारातील वा परिसरातील इतरांच्या मनात जागृत करण्याचा प्रयत्न करेन. पाण्यापासून सहजपणे विलग न होणार्‍या रसायनांना पाण्यात मिसळण्याचे काम मी करणार नाही. पाणी वापरानंतर प्रदूषित होणार नाही याची काळजी घेईन. माझ्यामुळे प्रदूषित झालेले पाणी स्वच्छ, शुद्ध केल्याशिवाय इतस्तत: निसर्गामधे परत सोडणार नाही. जमिनीची गाळणाची क्षमता, झाडांची शुद्ध आणि जैविक पाण्याची शोषणक्षमता, प्रवाहित पाण्यातील क्षारांच्या प्रक्रियेने तसचे सूर्यकिरणांमधील अतिनील किरणांमुळे होणारे निर्जंतुकीकरण.. या सर्व नैसर्गिक शुद्धीकरण यंत्रणांवर येणारा ताण आपण कमी केला, तरी ही पाण्याची शुद्धता आणि शुद्ध पाण्याची उपलब्धता अधिक होईल.

पंचमहाभूतांपैकी एक असलेले पाणी आज सहजपणे नैसर्गिकरीत्या आपल्याला उपलब्ध होत नाही. पाण्याचा पुरवठा हा मोठ्या शहरांमधून व अनेक गावातून आजही वीजेच्या उपलबद्धतेवर अवलंबून आहे. पाण्याचे व त्या वरील मालकी हक्काचे व्यापारीकरण सुरू झाले आहे. पाणी आता विकत कुठेही मिळण्याचा पर्याय निर्माण झाला आहे. कच्च्या पाण्यातून खर्चिक शुद्धीकरण प्रक्रियेने अतिशुद्ध, क्षाररहित बाटलीबंद पाणी उपलब्ध झाले आहे. आपल्या सर्वांच्या अगदी सर्व आर्थिक स्तरांमधील सर्वांच्या हे आता अंगवळणी पडलं आहे.‘पाणी’ ही आता विक्रेय वस्तू म्हणून आपण मान्य केले आहे.

पाण्याला जीवन म्हणतात. हे जीवन फक्त आपलं नाही, तर सर्व सजीव सृष्टी आपापल्या अस्तित्वासाठी पाण्यावर अवलंबून आहे. किंबहुना पाण्याच्या अस्तित्वावर जीवसृष्टीचे अस्तित्व निर्भर आहे. तरीही पाणी, पाण्याची शुद्धता, पाण्याचे परिसरातील स्त्रोत. या सर्व गोष्टीबद्दल आपण अनभिज्ञ असतो. कुठल्या तरी प्रेरणेने स्वत:चे पाणी शोधून, साठवून, वापरणार्‍या गावकर्‍याच्या मदतीला आपण धावून गेला. तेथील सर्वसामान्य माणसातील अभियांत्रिकीला मान देऊन, वैज्ञानिक पद्धतीने तेथे श्रमदान केले आणि पाण्याच्या अभियानातील आपले फोटो सर्वत्र टाकून, वाहवा मिळवली. आता त्यापुढे जाऊन, शहरात महानगरातही पाण्याची बचत करायची आहे. आवश्यक तेवढे पावसाचे पाणी साठवायचे आहे. पाणी आवश्यक तेवढेच वापरायचे आहे.

कुठलेही पाणी कायमचे प्रदूषित होईल असे मानवी उपद्व्याप करायचे नाहीत आणि ऊर्जेचा उपयोग न करता, उपलब्ध होईल अशा पाण्याच्या स्त्रोतासाठी प्रयत्न करावयाचे हा जलसाक्षरतेचा खरा अर्थ आहे. चला जलसाक्षरतेच्या चळवळीत तनमनधनपूर्वक सहभागी होऊ!


विद्याधर वालावलकर

@@AUTHORINFO_V1@@