कपिल पाटील यांचा आठवडाभरात शेकडो गावांचा झंझावाती दौरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |




ग्रामस्थांच्या समस्या थेट सोडविण्याला प्राधान्य

 

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदारसंघातील तब्बल १२५ गावांचा दौरा करीत खा. कपिल पाटील यांनी हजारो ग्रामस्थांशी संपर्क साधला. विशेषतः ग्रामीण भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करत, त्या सोडविण्याला प्राधान्य दिल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

 

मतदार संपर्क अभियानांतर्गत खा. कपिल पाटील यांनी वाडा तालुक्यातील झंझावाती दौऱ्यांना सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांनी नागरिकांचे प्रश्न थेट समजावून घेतले. वाडा शहरासह तालुक्यातील ६५ गावांमध्ये दौरा करण्यात आला. त्यात दलित वस्तीपासून डोंगरी वस्तीपर्यंत जास्तीत जास्त ग्रामस्थांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाडा तालुक्यापाठोपाठ दोन दिवसांपासून शहापूर तालुक्यातील ६० गावांमध्ये संपर्क साधण्यात आला. त्यात काही प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर काही प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. या दौऱ्यात तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, जिल्हा नेते अशोक इरणक, माजी जिल्हा परिषद सदस्या रंजना उघडा, तालुका सरचिटणीस राम माळी, काशिनाथ भाकरे, राम जागरे, गुरुनाथ भोईर, शशांक हरड, कमलाकर घरत, विनायक सावंत आदी मान्यवर सहभागी झाले होते.

 

शहापूर तालुक्यातील दोन दिवसांच्या दौऱ्यात खासदार पाटील यांनी कसारा परिसरासह आदिवासी पाड्यांना प्राधान्य दिले. मोखावणे व कसारा येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जाऊन खा. पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या. दलित वस्ती सुधार योजनेची कामे, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, बारा बंगला येथील रस्ता, धावडो बाबा येथील स्मशानभूमीची दुरवस्था यांच्याकडे लक्ष वेधण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष साजिद शेख, शहराध्य्क्ष विनायक सावंत उपस्थित होते. वाशाळा, फुगाला, टोकरखण्ड, तेलमपाडा भागातील गावांनाही खा. पाटील यांनी भेट दिली.

 

डोळखांब, हेदवली, साकुर्ली, डेहणे-वरपडी, कांबे-निवार, गुंडे, वालशेत-गुंडा, पाचघर-रसळपाडा, खराडे, मांजरे, बेहलोली, चांग्याचा पाडा आदी गावांमध्ये मुख्यत्वे पाणी, रस्ते आणि विजेच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त होते. अखेर नागरिकांच्या मागणीनुसार पाटील यांनी बोरिंग, नळपाणीयोजना, विहिरी, विजेचे खांब बदलण्यासाठी निधी आदी मंजूर केला.

 

खासदार निधीतून पाच लाखांची कामे मंजूर

 

कसाऱ्यातील मिलिंद नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दीड लाख रुपये मंजूर केल्याचे पत्र खा. पाटील यांनी दिले. जामा मस्जिद येथे पत्र्याच्या शेडसाठी एक लाख रुपये व शिवशक्तिनगर येथील रस्त्यासाठी तीन लाख मंजूर करण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@