प्रयोगशील शिक्षणाचे दूरदर्शी संदीप विद्यापीठ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jun-2018
Total Views |




जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देणारे, प्रयोगशील शिक्षणाचे दूरदर्शी विद्यापीठ अशी महिरावणी, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील संदीप फाऊंडेशन आणि संदीप विद्यापीठ यांची देशभरात ख्याती. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात नावलौकिकप्राप्त असे हे विद्यापीठ. तेव्हा, अशा या सुप्रसिद्ध संदीप विद्यापीठाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी संदीप विद्यापीठाचे अध्यक्ष संदीपकुमार झा यांच्याशी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी प्रवर देशपांडे यांनी केलेली ही खास बातचीत...

 

सर्वप्रथम तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी आणि एकूणच जीवनप्रवासाविषयी जाणून घ्यायला आम्हाला आवडेल...

आम्ही मूळचे बिहारमधील मिथिला येथील सिजोन गावचे. माझे तिसरीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. माझे वडील शाळेत शिक्षक असल्याने त्यांची बदली कोलकात्याला झाली. तिथेच माझे माध्यमिक आणि विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षणही झाले. त्यानंतर मी सहा महिने सरकारी नोकरी केली खरी, पण नोकरी करण्याची कला मला काही जमली नाही आणि माझी महत्त्वाकांक्षा ‘लेनेवाला नही देनेवाला’ बनण्याची होती. त्यानंतर मी २००३ मध्ये मुंबईत मुलुंड येथे संदीप अकादमी सुरू केली. तेथे मी अभियांत्रिकीचे क्लास सुरू केले. त्यानंतर २००८ मध्ये नाशिक येथे ‘संदीप फाऊंडेशन’ नावाने अभियांत्रिकी महाविद्यालयही सुरू केले. त्यालाही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. २०१५ मध्ये दोन अभियांत्रिकी महाविद्यालये, दोन पदविका महाविद्यालये, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, व्यवसाय व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालय सुरू केले. २०१६ मध्ये आम्हाला महाराष्ट्र सरकारने उत्तर महाराष्ट्रातील पहिले स्व-अर्थासहित विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली.

 

यशस्वीपणे ‘संदीप फाऊंडेशन’ची स्थापना, वाटचाल सुरू असताना स्वतंत्र असे संदीप विद्यापीठ स्थापन करावेसे का वाटले? आणि या विद्यापीठाचे वैशिष्ट्य काय सांगाल?

आजमितीस जागतिक गरजा आणि स्पर्धा व विद्यापीठात शिकवला जाणारा अभ्यासक्रम यांच्यात मोठी तफावत आढळते. भारतात केवळ २५ टक्के अभियंते हे रोजगारक्षम आहेत. ही दरी भरून काढण्यासाठी व रोजगारक्षम शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही संदीप विद्यापीठाची स्थापना केली. केवळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास संलग्न राहून, हे कार्य करणे शक्य नव्हते. आम्हाला अभ्यासक्रम नियोजनाचे स्वातंत्र्य हवे होते. आमच्या विद्यापीठात संशोधनास चालना देणारे, प्राप्त केलेल्या ज्ञानाची व्यावहारिक उपलब्धी देणारे आणि प्रयोगशील प्रात्यक्षिकांवर भर देणारे शिक्षण संदीप विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येते. आम्ही विविध औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करतो. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना नेहमीच उद्यमशील वातावरणाचा अनुभव घेता येतो, हे आमचे वैशिष्ट्य.

 

संदीप विद्यापीठाच्या नेमक्या स्वरूपाविषयी काय सांगाल?

आधी सांगितल्याप्रमाणे हे एक स्व-अर्थासहित विद्यापीठ आहे. तसेच संदीप विद्यापीठ आणि संदीप फाऊंडेशन अशी दोन्ही शैक्षणिक केंद्र आम्ही चालवितो. संदीप फाऊंडेशन हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे व त्याचे अभ्यासक्रम येथे चालविले जातात. संदीप विद्यापीठात आम्ही तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण दिले जाते. आजमितीस संदीप विद्यापीठात अभियांत्रिकी, व्यवसाय व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, विधी, फॅशन डिझायनिंग, सौंदर्य प्रसाधन आदी अभ्यासक्रम सुरू आहेत. संदीप विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी एसयु-जेईई (संदीप युनिव्हर्सिटी जॉईंट एन्ट्रस एक्झाम) नावाने स्वतंत्र प्रवेश परीक्षाही घेतली जाते.

 

संदीप विद्यापीठातील विविध कोर्सेसचा अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी आपण कशाप्रकारे नियोजन केले?

अभ्यासक्रम निश्चितीसाठी आम्ही सर्वप्रथम स्वतंत्र अभ्यास मंडळ स्थापन केले. त्यात विविध उद्योजक, मान्यवर विद्यापीठांचे प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ यांचा समावेश होता. या व अशा सर्व तज्ज्ञांनी एकत्र येऊन, या अभ्यासक्रमाची दिशा ठरविली. भविष्यातील गरजा, तंत्रज्ञान आणि रोजगार उपलब्धी यावर आधारित आमचा अभ्यासक्रम आहे.

 

भारतात विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळते, असे आपल्याला वाटते का?

होय, आजमितीस भारतात विविध क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळते, असे आपण म्हणून शकतो. कारण, संशोधन आणि तांत्रिक विकास याबाबत सरकारचे धोरण अनुकूल आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होत आहे.

 

आजच्या शिक्षण पद्धतीबाबत आपल्याला काय वाटते? प्राचीन काळातील गुरुकुल पद्धत सद्यपरिस्थितीत योग्य ठरु शकते का?

आजच्या शिक्षणपद्धतीबाबत भाष्य करताना आपल्याला थोडंसं इतिहासात डोकावून पाहावं लागेल. आपल्या देशात पूर्वजांनी तयार केलेले शैक्षणिक धोरण हे सर्वोत्तम होते. पुढे भारतात ब्रिटिश आले. त्यांनी १८८५ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई अशा तीन विद्यापीठांची स्थापना केली. पण, तत्पूर्वी त्यांनी युरोपात हार्वर्ड आणि केंब्रिज विद्यापीठांची स्थापना केली. तेथे त्यांनी प्रगत दृष्टिकोन बाळगला. मात्र, भारतात केवळ लिपिक बनतील असा अभ्यासक्रम, धोरण त्यांनी राबविली आणि दुर्दैवाने आजही आपण त्याच पथावर मार्गक्रमण करत आहोत. आपल्याकडे नालंदा व तक्षशिलासारखी प्रयोगशील विद्यापीठं होती. म्हणून आपण समृद्ध होतो. पण, आपण त्यांचा आदर्श आज बाळगत नाही, हे खरं तर दुर्दैवच आहे. त्यामुळे गुरुकुल पद्धती असावी. आपला वारसाच समृद्ध आहे आणि तोच आपण पुढे न्यायला हवा.

 

सध्याचा अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम हा जागतिकीकरणास अनुकूल आहे का?

खरं सांगायचं तर नाही. अभियांत्रिकी असो वा कोणतेही क्षेत्र, शिक्षण हे प्रकाल्पाधिष्ठित आणि प्रयोगशील असावे. देशात प्रतिवर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण होतात. पण, त्यांना रोजगार मिळणेही तितकेच आवश्यक आहे. त्यांना जर महाविद्यालयीन काळातच प्रयोगशील शिक्षण मिळाले आणि त्यातील केवळ दहा टक्के अभियंत्यांनी ते प्रत्यक्षात आणले, तरी बदल घडू शकतो. पण, तसे होताना मात्र दिसत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रकल्प, प्रयोग, चिंतन यांवर आधारित शिक्षण मिळणार नाही, तोपर्यंत संशोधन होणार नाही. आजचे शिक्षण गुण पद्धतीवर अवलंबून असल्याने विद्यार्थी केवळ घोकंपट्टी करतात. त्यामुळे व्यवहारमूलक अभियंते घडताना दिसत नाहीत.

 

आजच्या शिक्षण पद्धतीवर वारंवार ताशेरे ओढले जातात, टीका केली जाते. पण, त्यात सुधारणा मात्र होताना दिसत नाही. तेव्हा, शिक्षण पद्धतीचे भवितव्य काय असेल, असे आपल्याला वाटते?

वर्तमान शिक्षण पद्धतीशी मी अजिबात समाधानी नाही. मला असे वाटते की, आज शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र विद्यार्थ्यांना चमच्याने भरविण्याचा प्रकार चालू आहे. स्वयंअध्ययन आणि समस्या निवारण यांचा दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या शिक्षणाचा सगळा भार हा कोचिंग क्लासेसवरच दिसून येतो. माझ्या मते, शिक्षकविरहित वर्ग असणे हे शिक्षणाचे भविष्य असेल. या संकल्पनेत आपण शिक्षकांची संख्या कमी करणार नाही, तर त्यांचा वेळ वाचविणार आहोत, त्यांचं केवळ काम बदलणार आहोत, यामुळे विद्यार्थ्यांना संबंधित विषयाचे पूर्व ज्ञान असेल. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थी संवाद वाढेल. त्याला एक नवीन आयाम प्राप्त होईल आणि सर्वसमावेशक असे प्रात्यक्षिक शिक्षण यामुळे उपलब्ध होण्यास मदत होईल.

 

आपले विद्यापीठ प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारे आहे. मग तरीही अॅवरोनॉटीकल, अवकाश संशोधन यांसारखे अभ्यासक्रम आपणाकडे अजून उपलब्ध का नाहीत?

या वर्षापासून संदीप विद्यापीठात वरील अभ्यासक्रम आम्ही सुरू करणार आहोत. त्याचबरोबर अग्निशमन आणि सुरक्षा, रसायन अभियांत्रिकी, सूक्ष्मतंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमदेखील आम्ही सुरू करणार आहोत. तसेच, इंटरनेट सुरक्षेसाठी देखील अभ्यासक्रम आम्ही उपलब्ध करून देणार आहोत.

 

संदीप विद्यापीठाचे स्वतःचे असे अवकाश यान लवकरच झेपावणार आहे. त्याबाबत काय सांगाल?

होय, हवामान आणि कृषी उत्पादनाच्या अभ्यासासाठी आम्ही एक लहान अवकाश यान लवकरच प्रक्षेपित करणार आहोत.

 

हल्लीच्या पिढीमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना दुणावत चालल्याची टीका होत असते. तेव्हा, एक शैक्षणिक संस्था म्हणून संदीप विद्यापीठ राष्ट्रीयत्वाची भावना कशी जोपासते?

आम्ही राष्ट्र बांधणीच्या जाणिवेतून कार्य करत आहोत. आमचा प्रत्येक विद्यार्थी हा राष्ट्रसेवेत सहभागी व्हावा, हाच आमचा उद्देश आहे. त्यामुळे राष्ट्रीय गरजा व आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान यांचा संगत साधून आम्ही विद्यार्थ्यांना विविध व्यासपीठं उपलब्ध करून देत आहोत. आजमितीस टोयोटा, सीडॅक, आयबीएम, भाभा अणुसंशोधन केंद्राचा आकृती प्रकल्प, भारतीय अवकाश संशोधन केंद्र यांच्याबरोबर आमचे करार झाले आहेत.

 

देशाचे शैक्षणिक धोरण कोणी ठरवावे, असे आपल्याला वाटते?

देशाचे शैक्षणिक धोरण हे विविध क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या मान्यवरांनी ठरवावे असे मला प्रामाणिकपणे वाटते. आजमितीस धोरण निश्चिती ही नोकरशहा करत व त्यांना नेमक्या परिस्थितीची जाणीव नसते. त्यामुळे शैक्षणिक धोरण विस्कळीत झालेले दिसते. तेव्हा, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, विद्यार्थी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊनच शिक्षण धोरण ठरवावे.

 

संदीप विद्यापीठाचे वर्णन एका वाक्यात कसे कराल?

जागतिक दर्जाचे शिक्षण आणि सुविधा देणारे, प्रयोगशील शिक्षणाचे दूरदर्शी विद्यापीठ.

 

दहा वर्षांनंतर संदीप विद्यापीठाचे भविष्य काय असेल, असे आपल्याला वाटते?

प्रकल्प, संशोधन आणि नवनिर्मितीचा ध्यास या आमच्या बलस्थानांच्या जोरावर संदीप विद्यापीठ हे एक नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठ असेल.

@@AUTHORINFO_V1@@